30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्र'भाजप सरकारने अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले'

‘भाजप सरकारने अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले’

लय भारी न्यूज नेटवर्क

ठाणे : भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाले आहे. उद्योग बंद पडत आहेत. बेरोजगारी व महागाई वाढली आहे. आर्थिक आघाडीवर केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, अशी टीका काँग्रेस नेते व माजी मंत्री नसीम खान यांनी केली आहे.

भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. याच देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून राज्यात वाढलेली बेरोजगारी, आर्थिक मंदी, महागाई या मुद्द्यांवर ठाणे स्थानक परिसरात माजी मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश यांच्या उपस्थितीत ठाणे काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष मनोज शिंदे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सुभाष कानडे, प्रदेश काँग्रेसच्या सचिव के. वृषाली राजेश जाधव यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

या आंदोलनामध्ये गॅसचे दर वाढल्यामुळे ठाणे स्थानक परिसरातच महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चुलीवर स्वयंपाक केला, तर तरुणांवर मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची वेळ आली असल्याने वकिलांचा वेष परिधान करून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चुलीवर पकोडे तळले. या आंदोलनात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

काँग्रेसचे आमदार फुटणार नाहीत
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माजी मंत्री नसीम खान म्हणाले की, फोडाफोडीचे राजकारण करणे हा भाजपचा जुना डाव आहे. मात्र काँग्रेसचे सर्व आमदार पक्षाशी प्रामाणिक असल्याने कोणत्याही प्रकारचा दगाफटका होणार नाही. एकही आमदार फुटणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी