31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रपंकजाताई मुंडे यांची सभा रद्द, जयकुमार गोरेंना धक्का, प्रभाकर देशमुखांना फायदा

पंकजाताई मुंडे यांची सभा रद्द, जयकुमार गोरेंना धक्का, प्रभाकर देशमुखांना फायदा

लय भारी न्यूज नेटवर्क

सातारा : भारतीय जनता पक्षाचे माण – खटावमधील उमेदवार जयकुमार गोरे यांच्या प्रचारासाठी आज (मंगळवार) जंगी सभा होणार होती. या सभेसाठी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे उपस्थित राहणार होत्या. पण आयत्या वेळी पंकजाताई मुंडे यांनी सभेला यायचेच टाळले. पंकजाताई मुंडे व प्रभाकर देशमुख यांच्यात सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळेच पंकजाताईंनी सभेला यायचे टाळले असल्याची चर्चा आता रंगली आहे.

माण – खटाव विधानसभा मतदारसंघात वंजारी समाजाचे अंदाजे 10 हजारपेक्षा जास्त मतदान आहे. पंकजाताई मुंडे यांच्या शब्दांवर हे मतदान झुकत असते. पण पंकजाताई मुंडे यांनी जयकुमार गोरे यांच्यासाठी निश्चित केलेली सभा टाळली आहे. त्यामुळे गोरे यांना पंकजाताईंचा पाठींबा नाही असा अर्थ सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात लावला जात आहे.

प्रभाकर देशमुख जलसंधारण विभागाचे सचिव असताना या खात्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे होत्या. पंकजाताई आणि देशमुख यांच्यात त्यावेळी कमालीची एकवाक्यता होती. किंबहूना देशमुख यांनी जलयुक्त शिवार अभियानाचा आराखडा तयार केल्यानंतर पंकजाताईंनी तो लगेचच मंजूर केला होता. पुढे मुख्यमंत्र्यांनीही त्या आराखड्याला तात्काळ मान्यता दिली होती. एवढेच नव्हे तर, पंकजाताई मुंडे जलयुक्त शिवार अभियानाच्या संदर्भात देशमुख यांचे जाहीर कौतुक करायच्या. जलसंधारण मंत्री असताना पंकजाताई मुंडे माण तालुका दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्या आवर्जून लोधवडे येथील देशमुख यांच्या घरी गेल्या होत्या. देशमुख यांचा पाहुणचारही घेतला होता.

प्रभाकर देशमुख, अनुराधाताई देशमुख, गावकरी व शाळकरी मुलांनी त्यावेळी पंकजाताईंचे जोरदार स्वागत केले होते. देशमुख यांनी लोधवड्यात केलेले दुष्काळमुक्तीचे काम पाहून त्या भारावून गेल्या होत्या.

देशमुख यांच्याशी असलेले सलोख्याचे संबंध पाहता पंकजाताई मुंडे यांनी या सभेला यायचे टाळले असल्याचे बोलले जात आहे.

माण – खटाव मतदारसंघात पळशी, ढाकणी, जाशी, धामणी, वडगाव, तडवळे, एनकूळ या गावांमध्ये वंजारी समाजाची संख्या फार मोठी आहे. वंजारी समाजाचे मतदान बऱ्याच प्रमाणात एकगठ्ठा होत असते. या गावातील अनेक तरूण प्रशासनात आहे. या तरूणांचे देशमुख यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत.

या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांची रद्द झालेली सभा देशमुख यांना फायद्याची ठरेल असे बोलले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी