31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीच्या उमेदवारावर काँग्रेसचे पदाधिकारी नाराज

राष्ट्रवादीच्या उमेदवारावर काँग्रेसचे पदाधिकारी नाराज

राजू थोरात : लय भारी न्यूज नेटवर्क 

तासगाव :  काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाली आहे. परंतु तासगाव मतदारसंघात या दोन्ही पक्षांमध्ये बिघाडी आहे. कै. आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत. पण त्या विश्वासात घेत नसल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनीच सुमनताईंवर तोफ डागली आहे. मतदार संघात काँग्रेस पक्षाला अथवा पक्षाच्या नेत्यांना राष्ट्रवादीकडून विश्वासात घेतले जात नाही. राष्ट्रवादीकडून कायमच सापत्नपणाची वागणूक मिळते. पंचायत समिती, नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेसला  सामावून घेतले जा नाही. त्यावेळी त्यांना काँग्रेस पक्ष दिसत नाही. पण विधानसभा निवडणूक आली की, काँग्रेस पक्ष दिसतो. सन 2004 पासून 2014 पर्यत काँग्रेस पक्ष फक्त विधानसभा निवडणुकीतच त्यांना दिसत आला आहे. राष्ट्रवादीकडून आघाडी धर्म पाळला जात नाही. हे पुतणा मावशीचे प्रेम राष्ट्रवादीकडून काँग्रेसला मिळत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.

महादेव पाटील पुढे म्हणाले, सन 2004 मध्ये आर. आर. पाटील विरुद्ध संजयकाका पाटील यांच्यात लढत झाली होती. त्यात महत्वाची भूमिका मी बजावली होती. सन 2004  च्या विधानसभा निवडणुकीत माझा पुरेपुर वापर केला. मी व काँग्रेस पक्षाने 2004  ची विधानसभा एकट्याने ओढून काढली. सर्वात जास्त मी सभा घेतल्या होत्या. त्यावेळी आबा काटावर निवडून आले. ती मते काँग्रेसचीच होती. आता फक्त काँग्रेसने यांच्यासाठी मदतच करायची का? असा सवालही महादेव पाटील यांनी केला. यांच्यासाठी मी खासदार संजयकाका पाटील यांच्याशी वाईट झालो. गेल्या लोकसभेला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर हे खुलेआम भाषणात आमदार सुमनताई या माझ्या बहिण आहेत असे सांगत होते. त्याचा परिणाम आमचे नेते विशालदादा पाटील यांच्या मतावर झाला. पुढे पाटील म्हणाले की, सुमनताई पाटील या छोट्या गावात प्रचार करताना माझा लहानभाऊ काँग्रेसचे महादेव पाटील असे सांगतात. अड़चणीत असताना लहान भाऊ दिसतो. मग आता गोपीचंद पड़ळकर हे भाऊ कुठे आहेत. तेच पडळकरभाऊ बारामतीला अजित पवार यांना पाडायला गेले आहेत. काँग्रेसने मतदार संघात व तासगाव तालुक्यात प्रचार केला नाही व करणारही नाही, असेही त्यांनी ठणकावले.

काँग्रेसचे नेते रवींद्र साळुंखे, नेताजी घाटगे, माजी नगराध्यक्ष अजय पवार व इतर पदाधिकारी कुठेही प्रचारात नाहीत व राष्ट्रवादीचा प्रचार करणारही नाहीत. आम्ही तटस्थ राहू अशी ठाम भूमिका पाटील यांनी मांडली आहे.

महादेव पाटील यांचा सुरेशभाऊ पाटील यांच्यावर घणाघात

गेल्या लोकसभेला आमचे नेते विशालदादा पाटील हे उभे होते. पण आमदार सुमनवहिनी पाटील यांच्या दिराने (सुरेशभाऊ पाटील) यांनी विशालदादा पाटील यांचा प्रचार केला नाही. आतून दूसऱ्या उमेदवाराचा प्रचार केला. हे जगजाहीर आहे. सुरेशभाऊ पाटील व त्यांचे बगलबच्चे यांनी आमचे नेते विशालदादा पाटील यांचा प्रचार केला नाही व विशालदादा पाटील हे तासगाव तालुक्यात मतामध्ये 3 नंबरवर गेले. काँग्रेस पक्षाची मते महत्वाची आहेत. बहुजन नेते व दलित महासंघाचे नेतेही प्रचारात नसल्यामुळे राष्ट्रवादी धोक्यात आलेली आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी