29 C
Mumbai
Monday, December 4, 2023
घरमहाराष्ट्रशरद पवार-प्रकाश आंबेडकर भेटीत फक्त कॉफीपान?

शरद पवार-प्रकाश आंबेडकर भेटीत फक्त कॉफीपान?

शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर आज एकत्र कॉफी प्यायले. आणि तरीही त्यांच्यात राजकीय चर्चा झाली नाही, हे खरे वाटते का? यावर प्रकाश आंबेडकरांनीही मिश्कील उत्तर दिले आहे. आता प्रश्न आहे शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली कशासाठी? कुणी घडवून आणली या दोन दिग्गज नेत्यांची भेट? प्रकाश आंबेडकर म्हणाले, आमच्या गप्पा झाल्या पण चर्चा झाली नाही. याचा अर्थ काय यावरून आता राजकीय चर्चा रंगू लागलीय. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला ‘इंडिया’ आघाडीचे दरवाजे खुले झाले का? या सर्व प्रश्नांवर प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांना नेमके उत्तर दिले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ ग्रंथाचा शताब्दी वर्ष सोहळा आज (२१ ऑक्टोबर २०२३ रोजी) मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात साजरा करण्यात आला. यासाठी वक्ते होते प्रकाश आंबेडकर. पहिल्या सत्रात शरद पवार तर तिसऱ्या सत्रात प्रकाश आंबेडकरांचे भाषण झाले. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रकाश आंबेडकर यांना कॉफी पिण्याचे आमंत्रण दिले आणि आंबेडकरांनीही कुठलेही आढेवेढे न घेता आमंत्रणाचा मान राखला.

साखर टाकून कॉफी गोड केली, असे सूचक वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी त्यानंतर माध्यमांशी बोलताना केले. यावर माध्यमांनी छेडल्यावर ‘कॉफी पिताना सोबत १२ जण होते. एवढे जण असताना चर्चा कशी होणार? अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी दिली. इंडिया आघाडीतील समावेशाबद्दल बोलताना, किमान पाच राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत काही होईल, असे वाटत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि महाविकास आघाडी यांच्या यापूर्वीच युती झाली आहे. तरीही महाविकास आघाडीमध्ये ‘वंचित’ला अजून सामावून घेतलेले नाही. शिवाय इंडिया आघाडीमध्येही विचार झालेला नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना इंडियाची दारे उघडणार की ते भविष्यातही ‘वंचित’ राहणार, या प्रश्नाला अजून उत्तर मिळालेले नाही.

समष्टी फाउंडेशन, आंबेडकर लॅब इनिशिएटिव्ह आणि एन.आय.सी.ई. यांनी आयोजित केलेला हा सोहळा स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे ट्रस्टच्या सहकार्याने झाला. या सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर प्रथमच एका मंचावर आले होते.

‘प्रॉब्लेम ऑफ रूपी’ या ग्रंथाला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला होता. दादाभाई नवरोजी यांनी इंग्रजांवर भारताची लूट केल्याचा गंभीर आरोप केला होता. पण ही लूट कशी केली, याची मांडणी त्यांनी केली नव्हती. दादाभाई नवरोजींना अपेक्षित असलेली मांडणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘प्रॉब्लेम ऑफ रूपी’ या पुस्तकातून केली. रुपयाची किमत स्थिर राहिली तर देशातील गरीबी थांबू शकते. आर्थिक परिस्थिती बदलू शकते, अशी मांडणी बाबासाहेबांनी केल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी