34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच भाजप सोडल्याचे सांगताना खडसेंच्या डोळ्यात दाटले अश्रू

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच भाजप सोडल्याचे सांगताना खडसेंच्या डोळ्यात दाटले अश्रू

टीम लय भारी

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षाला रामराम केला आहे. माझी पक्षावर, पक्षाच्या केंद्रीय नेतृत्त्वावर कोणतीही नाराजी नाही. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मला प्रचंड त्रास झाला. त्यांच्यामुळे माझी बदनामी झाली. मला आणि माझ्या कुटुंबाला मनस्ताप झाला, अशा शब्दांत एकनाथ खडसेंनी बुधवारी फडणवीस यांच्यावर तोफ डागली. ते मुक्ताईनगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच भाजप सोडल्याचे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी खालच्या स्तरावर राजकारण केले असून त्यांनी माझे जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, असे ते म्हणाले. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

गेली ४० वर्षे मी भाजपला वाढवण्याचं काम केलं. पक्ष घराघरात नेण्यासाठी कष्ट घेतले. पक्षानं मला अनेक पदं दिली हे मी कधीही नाकारणार नाही. पण मी पक्षासाठी दिवसरात्र मेहनत केली. माझी पक्षावर नाराजी नाही. केवळ एका व्यक्तीवर आहे आणि ती व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस, असं खडसे म्हणाले. बहुजन समाजाचा नेता मुख्यमंत्री असावा असं मत मी व्यक्त केलं होतं. त्यानंतर माझ्यासोबत जे घडलं ते संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं, असं खडसे यांनी म्हटलं.

माझ्या मागे भ्रष्टाचारविरोधी विभागाचा ससेमिरा लावण्यात आला. भूखंड प्रकरणात आरोप करण्यात आले. विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. अंजली दमानिया यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. पोलीस गुन्हा दाखल करून घेत नव्हते. पण देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून पोलिसांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या, असा घणाघाती आरोप खडसेंनी केला. मी १५ दिवसांपूर्वी खोट्या खटल्यातून बाहेर पडलो. मात्र यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला गेले काही महिने प्रचंड मनस्ताप भोगावा लागला, असं खडसे म्हणाले.

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यानं माझ्या चौकशीची, राजीनाम्याची मागणी केली नव्हती. मात्र तरीही मला राजीनामा देण्यास सांगण्यात आलं. माझ्या राजीनाम्याची मागणी कोणी केली होती, हे मला दाखवा. मी लगेच राजकारण सोडेन, असं म्हणत खडसेंनी फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे आव्हान दिलं. माझ्या पीएवर ९ महिने पाळत ठेवण्यात आली. पीएच्या माध्यमातून माझ्यावरच नजर ठेवण्याचा प्रयत्न केला. इतक्या खालच्या स्तरावरचं राजकारण माझ्यासोबत करण्यात आलं, अशा शब्दांत खडसेंनी नाराजी व्यक्त केली.

मी पक्षासाठी कष्ट घेतले. त्यामुळे मला पदं मिळाली. जे मिळवलं ते स्वत:च्या ताकदीवर आणि मेहनतीवर मिळवलं. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातल्या कित्येक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते. आयारामांना पदं दिली गेली. आम्हाला पदाचा मोह कधीच नव्हता. त्यामुळेच पक्ष विरोधात असतानाही आम्ही पक्षाची साथ सोडली नाही. कोणाच्या उपकारांवर आम्ही जगलो नाही. सध्या पक्षात मिरवत असलेल्या नेत्यांचं पक्षासाठीच योगदान काय?, असा थेट सवाल खडसेंनी उपस्थित केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी