30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमंत्रालय‘कोरोना’च्या आपत्कालिन कक्षात मंत्र्यांनी थाटले अनधिकृत कार्यालय

‘कोरोना’च्या आपत्कालिन कक्षात मंत्र्यांनी थाटले अनधिकृत कार्यालय

टीम लय भारी

मुंबई : राज्यात ‘कोरोना’चा ( Coronavirus ) संसर्ग वाढत चालला आहे. या साथीच्या आजाराला आवर घालण्यासाठी राज्य सरकारने आपत्कालिन कक्ष उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील एक जागा निश्चित केली आहे. पण या जागेत आपत्कालिन कक्ष सुरू करण्याच्या अगोदरच राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी स्वतःचे कार्यालय थाटले आहे.

राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी ही जागा ‘कोरोना’च्या आपत्कालिन कक्षासाठी मंजूर केली आहे. एवढेच नव्हे तर, ही जागा बनसोडे यांना देण्यास त्यांनी नकार दिलेला आहे. पण तरीही बनसोडे यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या नावाचा फलक लावला आहे. आतमध्ये मंत्र्यांचे खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) यांच्या नावाचे फलक सुद्धा लावण्यात आले आहेत. पण मुख्य सचिवांनी बनसोडे यांना ही जागा नाकारल्यामुळे त्यांना कार्यालयातील कारभार इतरत्र थाटावा लागणार आहे.

या जागेत आपले कार्यालय थाटण्यासाठी संजय बनसोडे यांनी गेल्या चार महिन्यांपासून पाण्यात देव घालून ठेवला होता. पण तिथे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे तात्पुरते कार्यालय होते. मुंडे यांचे कार्यालय दोन दिवसांपूर्वी पहिल्या मजल्यावर स्थलांतरीत करण्यात आले. त्यावर बनसोडे यांनी रिकाम्या झालेल्या सहाव्या मजल्यावरील कार्यालयात आपला संसार थाटला. पण ही जागा ‘कोरोना’च्या आपत्कालिन कक्षासाठी निश्चित करण्यात आल्यामुळे बनसोडे यांची मोठीच पंचाईत झाली आहे.

बनसोडे यांच्या नावाचा फलक दुसऱ्यांदा हटवला जाणार

संजय बनसोडे यांना हे कार्यालय तूर्त तरी मिळणार नाही असेच दिसत आहे. त्यामुळे त्यांना आपल्या नावाचा फलक काढावा लागणार असल्याचे चित्र आहे. बनसोडे यांना दोन महिन्यांपूर्वीही सुद्धा फलक काढावा लागला होता. धनंजय मुंडे यांचे तात्पुरते कार्यालय या ठिकाणी कार्यरत होते. तरीही बनसोडे यांनी स्वतःचा फलक तिथे लावला होता. त्यामुळे एकाच दालनात मुंडे व बनसोडे असे दोघांचेही फलक त्या ठिकाणी दिसत होते. पण मुंडे यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बनसोडे यांचा फलक काढून टाकला. तेव्हापासून हे कार्यालय मुंडे कधी सोडताहेत याची बनसोडे वाट पाहात होते. बनसोडे यांच्या कार्यालयाचा फलक काढून टाकला तरी गेले तीन महिने ते मुंडे यांच्या दालनातच बसत होते. तीन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर मुंडे यांचे कार्यालय पहिल्या मजल्यावर स्थलांतरीत झाले. त्यामुळे हवी ती जागा मिळाल्याचा आनंद बनसोडे यांना झाला. पण त्यांच्या या आनंदावर मुख्य सचिव अजोय मेहता यांनी विरजण टाकले. मुंडे यांनी ही जागा रिकामी करताच, मेहता यांनी ती ‘कोरोना’च्या आपत्कालिन कक्षाला देवून टाकली. त्यामुळे मंत्री संजय बनसोडे यांना आता दुसऱ्यांदा आपल्या नावाचा फलक काढावा लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

बनसोडे यांना विधानभवनात कार्यालय देण्यात आले आहे. पण त्यांना तिथे कार्यालय नको आहे. मंत्रालयातच कार्यालय हवे म्हणून त्यांचा आग्रह आहे. त्यासाठी त्यांनी उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांची संमतीही मिळविली होती. त्यानुसार धनंजय मुंडे यांचे तात्पुरते कार्यालय बनसोडे यांना मिळणार होते. पण त्यावरही आता पाणी फेरले आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यातील सर्व शिक्षकांना आळीपाळीने सुटी, आदेश जारी

सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, विजय सिंघल ठाण्याचे नवे आयुक्त

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी