30 C
Mumbai
Friday, November 17, 2023
घरमंत्रालयमंत्रालयातील कुत्र्यांनी करायचे काय?

मंत्रालयातील कुत्र्यांनी करायचे काय?

मंत्रालयातील रोजच्या वाढत्या गर्दीला आवर घालण्यासाठी काल (26 सप्टेंबर) सरकारकडून काही नियम करण्यात आले आहेत. त्यात भटके कुत्रे, मांजरी यांना अटकाव करण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मंत्रालय परिसरातील भटक्या कुत्र्यांना, तसेच मांजरी आणि इतर पाळीव प्राण्यांना अटकाव करण्यासाठी मुंबई महापालिकेने उपाययोजना करावी, असे नमूद करण्यात आले आहे. गंमत म्हणजे मंत्रालयात अनेकदा भटक्या कुत्र्यांचा वावर दिसतो. ‘लय भारी’च्या कॅमेऱ्यात आम्ही मंत्रालयातील भटक्या कुत्र्यांची दृष्ये टिपली आहेत. आता प्रश्न आहे, या भटक्या कुत्र्यांनी करायचं तरी काय?मंत्रालयात कॅन्टीन आहेत. त्यातील उरलेले अन्न अनेकदा बाहेर भटकणाऱ्या कुत्र्यांना तसेच मांजरांना दिले जाते. त्यामुळे मंत्रालयाच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वापर सर्रास दिसतो. आता या एकप्रकारे पाळलेल्या भटक्या प्राण्यांना आवर घालण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेवर सोपवण्यात आली आहे.

मंत्रालय परिसरात भटके कुत्रे, मांजरांना अटकाव केल्यास त्यांनी जगायचे कसे, असाही प्रश्न आता काही जण उपस्थित करत आहेत. कारण त्यांची उपजीविकाच मुळी मंत्रालयातील कॅन्टीनवर पूर्णपणे अवलंबून आहे. शिवाय काही श्वानप्रेमी मंत्रालय परिसरात भटकणाऱ्या अशा कुत्र्यांना आवर्जून खानपान सेवा पुरवतात. त्यामुळे या कुत्र्यांची खानपानाची व्यवस्था रोज होते. आता सरकारच्या या नव्या नियमांमुळे या श्वानप्रेमींचीही एक प्रकारे गोची होणार आहे. या प्राणीप्रेमींनी भूतदया दाखवयाची तरी कुणावर, हाही सवाल आहेच

असो, मंत्रालयात आता केवळ मनुष्य प्राण्यालाच प्रवेश मिळणार, एवढे नक्की. त्यामुळे इतरांच्या भूतदयेवर वाढणाऱ्या कुत्र्यांच्या जगण्यामरण्याचा प्रश्न यापुढे गंभीर होणार, यात शंका नाही. कदाचित सरकारच्या या नियमाला काही श्वानप्रेमी आव्हान देण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

मंत्रालयात रोज सुमारे साडेतीन हजार लोक विविध कामांसाठी येतात. आणि ज्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक असते त्यादिवशी मंत्रालयात येणाऱ्यांची संख्या पाच हजारांवर जाते. भेटीसाठी येणारी माणसे, त्यांच्या गाड्या यामुळे मंत्रालय परिसरात गर्दी होते. अशातच भटक्या कुत्र्यांचीही वाढ होताना दिसत आहे. म्हणूनच माणसांच्या गर्दीला आवर घालतानाच मंत्रालय परिसरात येणाऱ्या भटक्या कुत्र्यांनाही अटकाव घालण्याचा सरकारने विचार केलाय. त्यासाठी नियम करून मंत्रालय परिसरातील भटक्या कुत्र्यांची जबाबदारी मुंबई महापालिकेवर सोपवण्यात आली आहे.

आता मुंबई महापालिका या मंत्रालय परिसरातील भटक्या कुत्रे तसेच इतर प्राण्यांचा कायमचा बंदोबस्त कसा करणार, याची उत्सुकता आता  मंत्रालयात येणाऱ्या लोकांबरोबरच श्वानप्रेमींनाही लागून राहिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी