30 C
Mumbai
Wednesday, November 15, 2023
घरमुंबईएकनाथ शिंदेंच्या गटापेक्षा आमचा पक्ष मोठा, तरीही बैठकीला आमंत्रण का नाही?

एकनाथ शिंदेंच्या गटापेक्षा आमचा पक्ष मोठा, तरीही बैठकीला आमंत्रण का नाही?

मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाने राज्यातले वातावरण तापू लागले आहे. आंदोलन हिंसक होत असल्याचे निदर्शनास येताच सरकार सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी उद्या (1 नोव्हेंबर) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर सकाळी साडेदहा वाजता ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्यातल्या लहान लहान पक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे. पण बहुजन समाज पक्ष (बसपा) या सगळ्या प्रक्रियेपासून दूर आहे. नव्हे तर या पक्षाला अजूनही या बैठकीचे आमंत्रण मिळाले नाही.एकनाथ शिंदेंच्या गटापेक्षा आमचा पक्ष मोठा, तरीही बैठकीला आमंत्रण का नाही?  असा सवाल बसपा महाराष्ट्र प्रभारी डॉ. प्रशांत इंगळे यांनी केला आहे.

आरक्षणासाठी मराठा समाजाचे 50 हून अधिक मोर्चे निघाले. पण सरकारला काही जाग आली नाही. मात्र मराठा  आरक्षण आंदोलन 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे-पाटील यांच्या गावी अर्थात अंतरवली सराटी येथे  सुरू झाले. आणि हळूहळू या आंदोलनाचे लोण राज्यभर पसरले. पहिल्यावेळी जरांगे यांनी 17 दिवस आंदोलन केले. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी-मराठा हे जात प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी त्यांनी लावून घरली. त्यामुळे सरकार अडचणीत आले. आणि सरकारने सर्वपक्षीयांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलावली. या बैठकीला बहुजन समाज पक्ष वगळता राज्यातील लंगोटी पक्षांना निमंत्रण देण्यात आले होते.

नव्वदच्या दशकात कांशीराम यांच्या नेतृत्वाखाली बसपाने उत्तर प्रदेशात आपली ताकद दाखवायला सुरुवात केली. नंतर बसपा दोनदा उत्तर प्रदेशात सत्तेवर आली या पक्षाचा हत्ती हळूहळू देशभरात जावू लागला. विविध राज्यात या पक्षाचे खासदार निवडून आले. महाराष्ट्रात बसपाचे आमदार, खासदार अद्याप निवडून आले नाहीत, पण स्थानिक स्तरावर अनेक ठिकाणी या पक्षाचे नगरसेवक आहेत. बहुजनाचा विचार समाजात पोहचवून सत्ताधारी जमात होण्याचे स्वप्न या पक्षाचे कार्यकर्ते पाहत असतात. असे असताना सरकार जेव्हा जेव्हा अडचणीत येते तेव्हा तेव्हा विरोधकांची मदत ते घेतात. आता मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला अडचणीत आणले असल्याने रविवारी विरोधकांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवली आहे. पण नेहमीसारखे या बैठकीला बसपाला निमंत्रण काही देण्यात आले नाही.

या संदर्भात बसपाचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. प्रशांत इंगळे यांच्याशी संपर्क साधता, बसपा हा राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष आहे. पण राज्यकर्ते विरोधी पक्षांना जेव्हा एखाद्या बैठकीला बोलवतात, तेव्हा आम्हाला निमंत्रण नसते. कायम बसपाला टाळले का जाते याचे उत्तर काही मिळत नाही. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात समतेचा विचार पोहचवणे सोपे काम नाही. त्यातल्या त्यात या राज्यावर सत्ता मिळवणे हे स्वप्न होते, ते कांशीराम आणि मायावती यांनी पूर्ण केले. देशातील बहुजन ‘समाजात राज्यकर्ते व्हा’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार कृतिशीलपणे पोहचवण्याचे काम केले. त्या पक्षाला पुरोगामी महाराष्ट्रात सरकारकडून डावलले जाणे ही मोठी शोकांतिका आहे, की आमच्या पक्षाची सत्ताधाऱ्यांना दहशत आहे; असा सवालही इंगळे यांनी ‘लय भारी’शी बोलताना उपस्थित केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी