30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
HomeमुंबईMarathi : मराठीत बोलण्यास नकार देणा-या कुलाब्यातील ज्वेलर्स विरोधात मराठी लेखिकेचे आंदोलन

Marathi : मराठीत बोलण्यास नकार देणा-या कुलाब्यातील ज्वेलर्स विरोधात मराठी लेखिकेचे आंदोलन

टीम लय भारी

मुंबई : मराठी भाषेत (Marathi) बोलण्यास नकार देणा-या मुंबईतील कुलाबा येथील महावीर ज्वेलर्सच्या दुकानासमोर मराठी लेखिकेने ठिय्या मांडला आहे. वयाची पंचाहत्तरी पार केलेल्या शोभा देशपांडे यांनी दुकानदाराच्या आडमुठेपणाविरुद्ध आंदोलन पुकारले आहे.

कुलाब्यासारख्या दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू भागात हा प्रकार उघडकीस आला आहे. ‘महावीर ज्वेलर्स’ या दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार देऊन अरेरावी केली. दुकानाचा परवाना दाखवण्यास मनाई केली. पोलिसांना बोलवून अपमानित केले, असा आरोप करत शोभा देशपांडे यांनी दुकानाबाहेर ठिय्या मांडला.

दुकानदार आणि पोलिसांनी दुकानाबाहेर काढल्यावरुन देशपांडे काल संध्याकाळी पाच वाजल्यापासून दुकानासमोर ठाण मांडून बसल्या. पोलिसांनी अपमानित केले म्हणून मुंबई पोलीस आयुक्त स्वत: जोपर्यंत येत नाहीत आणि दुकानदार परवाना दाखवत नाही, तोपर्यंत दुकानासमोरुन न हलण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

पोलिसांचे म्हणणे ऐकून घेण्यासही त्या तयार नाहीत. मराठी एकीकरण समिती संघटनेच्या काही मराठी शिलेदारांनीही आंदोलनस्थळी हजेरी लावून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र देशपांडे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

पोलिसात तक्रार दाखल करु, असे समजावल्यानंतर त्यांनी पोलिसांवर विश्वास नसल्याचे सांगितले. मी इथून हलणारच नाही या भूमिकेवर त्या ठाम आहेत. कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. रात्री बारा वाजेपर्यंत त्या एकाच जागी ठिय्या मांडून बसल्या होत्या.

शोभा देशपांडे या लेखिका आहेत. मराठी भाषेवर त्यांचे अतोनात प्रेम असून त्या मराठीचा नेहमी आग्रह धरत असतात. त्यातूनच महावीर ज्वेलर्स दुकानाच्या गुजराती मालकासोबत त्यांचे खटके उडाले. मराठी माणसाचा अपमान केला गेला म्हणून आंदोलन करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी