30 C
Mumbai
Tuesday, May 14, 2024
Homeमुंबईराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच : प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केला समितीचा निर्णय

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच : प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केला समितीचा निर्णय

प्रफुल्ल पटेल पत्रकार परिषदेत म्हणाले - समितीने आजच्या बैठकीत एक ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे नेते पवारसाहेब यांनीच पक्षाच्या राष्ट्रीय  अध्यक्षपदी कायम राहावे, अशी सर्वानुमते आम्ही शिफारस करत आहोत. देशभरातील कोट्यवधी लोकांच्या भावनांचा आदर करून साहेबांनी राजीनाम्याचा हा निर्णय मागे घ्यावा. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी समितीचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला. 17 सदस्यीय निवड समितीने एकमताने पवारांचा राजीनामा फेटाळला असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनीच पदावर कायम राहावे, असा ठराव मंजूर केला आहे. समितीचा निर्णय पवारांना कळवला जाईल आणि त्यांना अध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली जाईल, असे पटेल यांनी सांगितले. समितीचा निर्णय आपल्याला मान्य राहील, असे पवारांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

प्रफुल्ल पटेल यांचे पत्रकार परिषदेतील निवेदन त्यांच्याच शब्दात असे –

नमस्कार मित्रांनो

2 मे रोजी मुंबईतील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात शेवटी शरद पवार साहेबांनी त्यांच्या भाषणात अचानक मोठी घोषणा केली होती. मी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असे ते म्हणाले. त्याच दिवशी त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी कोणावर सोपवावी, याचा निर्णय घेण्यासाठीची समिती जाहीर केली होती. या समितीत माझे पहिलेच नाव आहे. मी पक्षाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे. त्यामुळे समितीचा निर्णय आपल्याला कळविणे l, ही माझी जबाबदारी आहे. आम्ही सारे जण त्यादिवशी स्तब्ध झालो. पवार साहेब असा निर्णय जाहीर करतील, याची आम्हाला कुणालाही आजिबात कल्पना नव्हती. त्यानंतर सर्व कार्यकर्ते, नेत्यांच्या तीव्र भावना आपण पाहत आहात. या निर्णयानंतर माझ्यासह पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी साहेबांची भेट घेतली. एकदा नाही वारंवार भेट घेतली. आम्ही पवार साहेबांना विनंती केली, की देशाला आज तुमची गरज आहे. पवार साहेब आज देशातील एक महत्त्वाचे नेते आहेत. देशातील प्रत्येक राज्यात साहेबांचे चाहते आहेत. परवाच माजी मुख्यमंत्री बादल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही गेलो होतो. तेव्हा पंजाबातील शेतकऱ्यांनी पवार साहेबांना भेटून सांगितले, की पंजाबमधील शेतकरी कधीही आपण पंजाबच्या शेतकऱ्यांसाठी केलेले योगदान विसरु शकत नाही. देशभरातील अनेक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला साहेबांनी या निर्णयाचा फेरविचार करावा, अशा भावना व्यक्त केल्या. साहेबांच्या या निर्णयाने राज्यातील, देशभरातील प्रत्येक कार्यकर्त्याला दुःख झाले आहे, तो अस्वस्थ आहे. पुन्हा एकदा सांगतो, की पवार साहेबांनी हा निर्णय घेतांना आम्हाला कुणालाही विश्वासात घेतले नाही. साहेबांनी 2 तारखेला हा निर्णय जाहीर केल्यापासून आम्ही त्यांना वारंवार निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती करीत आहोत.

समितीने आजच्या बैठकीत एक ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे नेते पवारसाहेब यांनीच पक्षाच्या राष्ट्रीय  अध्यक्षपदी कायम राहावे, अशी सर्वानुमते आम्ही शिफारस करत आहोत. देशभरातील कोट्यवधी लोकांच्या भावनांचा आदर करून साहेबांनी राजीनाम्याचा हा निर्णय मागे घ्यावा.

महाराष्ट्राच्या राजकारणातील ही याक्षणीची सर्वात मोठी बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला गेला आहे. हा निवड समितीचा निर्णय आहे. समितीतील सर्वच्या सर्व 17 सदस्यांनी एकमताने हा राजीनामा फेटाळला आहे. त्यामुळे शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कायम राहणार आहेत. समितीचा निर्णय आपल्याला मान्य राहील, असे पवारांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

दोन दिवसांपूर्वीच “लोक माझे सांगाती” या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी पवारांनी राजीनाम्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर फक्त राष्ट्रवादीचं नव्हे तर महाविकास आघाडी आणि राज्यासह देशभरात राजकीय भूकंप झाला होता. पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा म्हणून राज्यभरातील राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांची मनधरणी सुरू केली होती. महाविकास आघाडीतील नेत्यांनीही पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष निवड समितीची बैठक आज सकाळी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात झाली. यात दुसऱ्या कोणत्याही नावावर चर्चा झाली नाही. समितीसमोर दोन पर्याय ठेवले गेले. पहिला प्रस्ताव शरद पवार यांचा राजीनामा मागे घेण्याचा आणि दुसरा प्रस्ताव शरद पवार हेच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहतील, हा होता. समितीने एकमताने दोन्ही निर्णय स्वीकारले. हे निर्णय समिती पवारांना कळविले जाणार आहेत. स्वतः शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये येणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी