34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमुंबईधक्कादायक! मुंबईत एकाच इमारतीत २२ कोरोनाबाधित रुग्ण

धक्कादायक! मुंबईत एकाच इमारतीत २२ कोरोनाबाधित रुग्ण

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मुंबईत देखील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबईच्या चेंबूर परिसरातील एका इमारतीत राहणाऱ्या २२ लोकांना एकाचवेळी कोरोनाची लागण झाली आहे. सिंधी सोसायटी परिसरात हा प्रकार घडला. त्यामुळे चेंबूर परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सिंधी सोसायटीत जवळपास ५०६ लोक वास्तव्याला आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने आता वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. पालिकेने ही इमारत आणि सिंधी सोसायटी पूर्णपणे सील केली आहे. तसेच पालिकेने घरकामासाठी येणाऱ्या महिलांनाही सोसायटीत जाण्यास मज्जाव केला आहे. या सोसायटीत कम्युनिटी किचन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईतील कोरोना स्थिती?

मुंबईतही आज दिवसभरातील वाढलेला कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनक आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १० हजार ४२८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ६ हजार ७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आज दिवसभरात २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी १६ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये १४ पुरुष तर ९ महिलांचा समावेश आहे.

मुंबई जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांचा दर ८०  टक्के झाला आहे. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता ३५  दिवसांवर येऊन ठेपला आहे. ३१ मार्च ते ६ एप्रिल पर्यंत मुंबईतील कोविड वाढीचा दर १.९१  टक्के झाला आहे.

राज्यात कोरोनाचा उद्रेक, २४ तासांत ६० हजार रुग्ण

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. पण राज्यातील कोरोनाचा वाढता प्रसार काही थांबण्याचे नाव घेत नाही. आज दिवसभरात राज्यात तब्बल ५९ हजार ९०७ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर ३२२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील ही आतापर्यंतची सर्वाधिक आकडेवारी आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाची स्थिती किती विदारक बनत चालली आहे, याचा अंदाज येऊ शकतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी