33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमुंबईमुंबई पालिका आयुक्तांचा 'हा' नवा आदेश

मुंबई पालिका आयुक्तांचा ‘हा’ नवा आदेश

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईत पुन्हा कोरोनाने डोकवर काढले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही ठिकाणी लॉकडाऊन केले आहे तर काही ठिकाणी कडक निर्बंध लागू केले आहेत. मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईतील वॉर्ड रूम सक्रिय करण्यात येणार आहेत. त्यासाठी शिक्षकांची मदत घेण्याचे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी आज दिले आहेत.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी वॉर्ड वॉर रुम पुन्हा सक्रिय करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वॉर्ड रुमला कळविल्याशिवाय थेट बेड देता येणार नाहीत. कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता बेड अॅलॉटमेंट सिस्टिम वॉर्ड रुमच्या माध्यमातूनच होणार आहे. सरकारी रुग्णालये, खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होम या ठिकाणी लक्षण नसलेल्या आणि कोणतेही दीर्घकालीन आजार नसलेल्या कोविड पेशंटला सरसकट बेड देऊ नये, अशा सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. तसेच वॉर्ड वॉर रुममधून रुग्णखाटांची उपलब्धता करून देण्यासाठी शिक्षकांची मदत घेण्यात यावी, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के बेड आणि १०० टक्के आयसीयू बडे महापालिकेच्या ताब्यात आहेत.

मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

मुंबईत काल दिवसभरात ५ हजार ८८८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३ हजार ५६१ रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात १२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी ८  रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांपैकी ७ पुरुष तर ५ महिलांचा समावेश आहे. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णाचा दर ८५ टक्क्यांवर आला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५३ दिवसांवर आला आहे.

धारावी, माहीम, दादरला विळखा

गेल्या आठ दिवसांपासून धारावी, माहीम आणि दादरमध्ये कोरोनाचा प्रचंड कहर वाढला आहे. काल धारावीत ६४ रुग्ण आढळले असून धारावीतील रुग्णसंख्या ४८३४ झाली आहे. तर दादरमध्ये ८३ रुग्ण सापडल्याने दादरमधील रुग्णसंख्या ५९३६ वर पोहोचली आहे. तसेच माहीममध्ये ९८ रुग्ण आढळल्याने माहीममधील रुग्णसंख्या ६०३४  झाली आहे. काल दिवसभरात दादर, धारावी, माहीममध्ये मिळून एकूण २४५  रुग्ण सापडल्याने या परिसरातील रुग्णसंख्या १६८०४ वर पोहोचल्याने आरोग्य प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

राज्याची परिस्थिती काय?

राज्यात काल गेल्या २४ तासांत ३१  हजार ६४३  नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर २० हजार ८५४  जण कोरोनामुक्त झाले आहेत. काल दिवसभरात १०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, काल कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसत आहे. कालच्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ७४ लाख ५ हजार ५१८  झाली आहे. त्यातील २ कोटी ३५ लाख ३  हजार ३०७  रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३  लाख ३६  हजार ५८४  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर एकूण ५४ हजार २८३  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी