33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
HomeराजकीयVIDEO : रोहित पवारांचे विधानसभेत पहिलेच भाषण, भाजपवर केला हल्लाबोल

VIDEO : रोहित पवारांचे विधानसभेत पहिलेच भाषण, भाजपवर केला हल्लाबोल

लय भारी न्यूज नेटवर्क

नागपूर : विधानसभेत पहिल्यांदाच नव्याने आलेले आमदार रोहित पवार यांनी एखाद्या कसलेल्या नेत्याप्रमाणे आज भाषण केले. आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी शेती, शिक्षण, बेरोजगारी, उद्योग, महाराष्ट्राचा विकास अशा विविध क्षेत्रातील आकडेवारी सादर करीत भाजपवर हल्लाबोल केला. गेल्या पाच वर्षांत भाजपच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची अधोगती झाल्याची मांडणी त्यांनी सभागृहात केली.

आमदार रोहित पवार यांचे भाषण ऐका जसेच्या तसे

ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षात भाजपने सत्ता कशी चालवली याचे आकडे वाचले, अन् खूप वाईट वाटले. गेल्या पाच वर्षांत सामान्य लोकांपर्यंत विकासाच्या योजना पोचल्या नाहीत. आपले राज्य विकासापासून वंचित राहिले. महाविकास आघाडीचे नवे सरकार हे शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज यांच्या विचाराने चालणारे, संविधानाच्या तत्वावर चालणारे असेल असे राज्यपालांच्या भाषणात नमूद केले होते. हे खरेच आहे. परंतु राज्यपालांच्या अभिभाषणावर राजकीय हेतूने विरोधी पक्षाचे नेते बोलले. त्यामुळे त्यांना उत्तर देणे गरजेचे आहे. मला लहानपण आठवले. मला क्रिकेट खेळायले आवडायचे. माझा एक भाऊ नेहमीच कॅप्टन असायचा. तो नेहमी रडीचा डाव खेळायचा. तो आऊट झाला की, बॅट – स्टम्प्स घेऊन निघून जायचा. तशा पद्धतीने विरोधी पक्षाचे नेते सतत रडीचा डाव खेळत असल्याची बोचरी टीका पवार यांनी यावेळी केली.

ते पुढे म्हणाले की, शिवसेनेचे मी अभिनंदन करतो. भाजपचे नेते भाषणातून वारंवार शिवसेनेला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करीत असताना दिसत होते. शिवसेना तुटेल पण भाजपसमोर वाकणार नाही. ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य मी वारंवार ऐकले होते. ‘मी पुन्हा येईन’ हे एका व्यक्तीबद्दल बोलले गेले. त्या ऐवजी ‘आम्ही पुन्हा येईन’ असे बोलायला हवे होते. त्यातून तुम्हाला शिवसेनेची सोबतही मिळाली असती असा चिमटा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेत काढला. मुनगंटीवारांच्या आवडत्या अभिनेत्री, त्यांना आवडणारी गाणीही आम्हाला त्यांच्या भाषणातून कळली अशीही पुस्ती पवार यांनी जोडली.

पवार म्हणाले की, राज्यात बेरोजगारीचा प्रश्न महत्वाचा आहे. उद्योगांना असणाऱ्या अडचणींवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. देशात ४० वयोगटाखालील ६० टक्के लोकसंख्या आहे. गेल्या पाच वर्षांत राज्य सरकारमध्ये २६ टक्के पदे रिक्त आहेत. यापूर्वीच्या सरकारमध्ये १५ टक्के पदे रिक्त होती. पण भाजपने गेल्या पाच वर्षांत भरती केली नाही. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून महापोर्टल सुरू केले. पण हे महापोर्टल भयंकर आहे. ते तातडीने बंद करायला हवे. पूर्वीप्रमाणेच किंवा नव्या पद्धतीने भरती व्हायला हवी. स्कील डेव्हलपमेंट महत्वाचा विषय आहे. दहावी – बारावी नापास तरूणांची संख्या वाढत आहे. त्यांच्या हाताला रोजगार देण्यासाठी स्कील डेव्हलपमेंटवर भर द्यायला हवा. ३००० ते ४००० कोटी रूपये खर्च करून राज्यात २२०० सेंटर्स सुरू केली होती. ती आता बंद आहेत. ती पुन्हा सुरू व्हायला हवीत. ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’मध्ये महाराष्ट्र मागे आहे. पूर्वी आपले राज्य तिसऱ्या ते चौथ्या स्थानावर असायचे. आता तेराव्या स्थानावर आहे. परकीय गुंतवणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्र मागे पडला आहे.

पदवीधर व पदव्युत्तर झालेले तरूण सुद्धा बेरोजगार आहेत. ३६ लाख तरूणांना नोकऱ्या दिल्याचे भाजपचे नेते सांगतात. पण हा आकडा खरा नाही. २०११ ते २०१८ पासून दरवर्षी १० टक्के कारखाने बंद होत चालले आहेत. नीती आयोगाच्या अहवालानुसार महाराष्ट्र शिक्षणात तिसऱ्या क्रमांकावर होता. २०१८ मध्ये तो सहाव्या क्रमाकांवर घसरला आहे. १ लाख २२ हजार मुले – मुली शिक्षणापासून वंचित आहेत असेही नीती आयोगाच्या अहवालात दिसत असल्याकडे पवार यांनी लक्ष वेधले.

हे सुद्धा वाचा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी सुद्धा अंगावर धावून जायचो

एकनाथ खडसे म्हणाले, मी भाजपमध्येच राहणार

उद्धव ठाकरेंच्या मदतीला शरद पवार धावले

रोहित पवारांनी घेतली वन अधिकाऱ्यांची भेट

VIDEO : आमदार रोहित पवार मंत्रीपदाबाबत म्हणतात, मतदारसंघासह राज्याची सेवा करता आली तर आनंदच

आमदार रोहित पवार लागले कामाला : मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वरिष्ठ अधिकार्यांसोबत भेटींचा सपाटा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी