31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
HomeमुंबईSS vs BJP : संजय राऊत व शिवसेना यांची भूमिका दुतोंडी, प्रवीण...

SS vs BJP : संजय राऊत व शिवसेना यांची भूमिका दुतोंडी, प्रवीण दरेकर यांची टीका

टीम लय भारी

मुंबई : नितीशकुमार यांचा पक्ष तिस-या नंबरवर असतानाही ते मुख्यमंत्री होणार असतील तर तिथल्या जनादेशाचा अपमान झाला असे बोलणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत व शिवसेना यांची भूमिका दुटप्पी आणि सोयीची (SS vs BJP) असल्याची टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष होता व शिवसेना दुस-या नंबरवर होती. तरीही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला. मग तेव्हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान झाला नाही का? शिवसेना व भाजपची युती असताना कमी संख्या असूनही महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा तो जनतेचा अपमान ठरत नाही का?, असा प्रतिसवाल विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

बिहारबाबत शिवसेना नेते आणि शिवसेनेचे मुखपत्र आपली भूमिका सतत बदलत आहे. नितीशकुमार यांना बिहारचे मुख्यमंत्री केले तर त्याचे सारे श्रेय शिवसेनेला जाईल, असे निकालादिवशी संजय राऊत म्हणाले होते आणि आज मात्र त्याच्या उलट भूमिका घेण्यात आली आहे. नितीशकुमार यांना मुख्यमंत्री केले तर तिथल्या जनतेचा, जनाधाराचा अपमान होईल, असे आता सामनातून म्हटले गेले आहे, असे नमूद करत शिवसेनेची ही भूमिका दुतोंडी नाही काय?, असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रात उद्योगधंदे बंद पडले आहेत, बेरोजगारीचा विषय वाढतोय आणि या सगळ्या विषयांवर जनतेचा आवाज विधिमंडळात उठवला जाणार आहे पण, या अधिवेशनापासून पळ काढण्याची भूमिका सरकारची दिसत आहे. आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हिवाळी अधिवेशाचा कालावधी ठरवू असे सांगणारे सरकार अधिवेशनापासून पळ काढण्यासाठी करोनाचा आधार घेत आहे. हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचाच त्यांचा प्रयत्न दिसतोय, असा आरोप दरेकर यांनी केला.

कोकणात निसर्ग वादळाच्याबाबतीत सरकारने जी मदत जाहीर केली ती अजूनही कोकणवासियांना पूर्ण मिळालेली नाहीत, त्यामुळे सरकारच्या फक्त घोषणाच होत आहेत, प्रत्यक्षात काहीच होत नाही असे सांगताना दरेकर म्हणाले की, एसटीची सध्याची अवस्था कठीण असतानाही परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचा-यांचे दोन महिन्याचे पगार दिले ती चांगली बाब आहे पण, दोन महिन्यांच्या पगाराने हा प्रश्न सुटणार नाही. आजचे मरण दोन महिन्यांनी पुढे ढकलले गेले आहे. मग २ महिन्यानंतर एसटीचं भवितव्य काय याचाही आघाडी सरकारने विचार करण्याची आवश्यकता आहे, असेही दरेकर यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी