29 C
Mumbai
Tuesday, August 29, 2023
घरक्रीडानीरजच्या आईने जिंकली करोडो भारतीयांची मनं, पाकिस्तानी खेळाडुबद्दलचं व्यक्तव्य चर्चेत

नीरजच्या आईने जिंकली करोडो भारतीयांची मनं, पाकिस्तानी खेळाडुबद्दलचं व्यक्तव्य चर्चेत

भारताच्या नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये नवा इतिहास रचत भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक आपल्या नावे केले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर निरजच्या कुटुंबियांनी मध्यमांसमोर येऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी नीरज चोप्रा यांची आई सरोज देवी यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरला असून त्याचा विडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. या विडियोतून नीरजच्या आईने पत्रकाराच्या एका प्रश्नावर दिलेल्या उत्तराचे देशभरातून कौतुक होत आहे. भालाफेकीच्या अंतिम फेरीत नीरज चोप्रा विरुद्ध पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीम हादेखील होता. त्या पाकिस्तानी खेळाडूला मात दिल्याप्रकरणी एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता.

निरजने ८८.१७ मीटर लांब भाला फेकून सुवर्णपदक आपल्या नावावर केले तर पाकिस्तानच्या अर्शद नदीम याने ८७.८२ मीटर ची भालाफेक करून रौप्यपदक पटकावले. ह्या दोन्ही स्पर्धकांमध्ये नेहमीच विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तुल्यबळ लढत पाहायला मिळते. यास्पर्धेतदेखील नदीमने उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. परंतु, निराजने केलेल्या सुवर्ण कामगिरीमुळे नदीमला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

काय म्हणाल्या सरोज देवी?

याच पार्श्वभूमीवर, सरोज देवी आपल्या मुलाच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर मीडियाला मुलाखत देताना दिसल्या. पाकिस्तानच्या अर्शद नदीमवर नीरजच्या विजयाबद्दलच्या त्यांच्या भावनांबद्दल एका पत्रकाराने प्रश्न विचारला. यावर स्पष्टपणे उत्तर देत सरोज देवी म्हणाल्या, “प्रत्येकजण मैदानात खेळायला आला आहे. त्यापैकी कोणीतरी एक नक्कीच जिंकेल. त्यामुळे पाकिस्तान किंवा हरियाणाचा असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”

त्या पुढे म्हणाल्या, “ही खूप आनंदाची बाब आहे. तो पाकिस्तानी खेळाडू जिंकला असता तरी खूप आनंद झाला असता.”

हे ही वाचा

नीरजच्या सुवर्ण कामगिरीवर आनंद महिंद्राची ट्विटर पोस्ट चर्चेत

Exclusive: दांडग्या मलईदार पदावर ‘विद्वान’ अधिकाऱ्याची नियुक्ती!

बांधकाम मजुराची पोरगी गाजवतेय लावणीचा महामंच

कसा झाला नीरज वर्ल्ड चॅम्पियन?

हंगेरीतील बुडापेस्ट येथे होत असलेल्या अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप २०२३ मध्ये सुवर्ण कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी भारताच्या अंजु बॉबी जॉर्ज हिने २००३ जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपच्या लांब उडी स्पर्धेत रौप्य पटकावले होते. त्यानंतर, २०२२ च्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप मध्ये निरजने रौप्य पदक पटकावून या स्पर्धेत पदक मिळवणारा तो दूसरा भारतीय ठरला होता. पण यावेळी, थेट सुवर्णपदकाला गवसणी घालून त्याने कोट्यवधी भारतीयांना सुवर्णभेट दिली आहे.

निरजने दुसऱ्या फेरीत ८८.१७ मीटर लांब भाला फेकून सुवर्णपदक आपल्या नावावर केले तर पाकिस्तानच्या अर्शद नदीम याने ८७.८२ मीटर ची भालाफेक करून रौप्यपदक पटकावले. झेक रिपब्लिकच्या जेकब वॅडलेच याने ८४.१८ मीटर लांब भालाफेक केली. त्याला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

निरजचा पहिला प्रयत्न फाउल ठरल्याने पहिल्या फेरीत तो १२ व्या स्थानी राहिला होता. स्पर्धेत इतक्या मागे पडूनही खचून न जाता फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेत दुसऱ्या प्रयत्नात निराजने ८८.१७ मीटरचा थ्रो केला. त्याच्याइतका लांब थ्रो अन्य कोणत्याही स्पर्धकाला करता न आल्यामुळे विजयाची माळ आपसुकच निरजच्या गळ्यात पडली. निरजने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात ८६.३२ मीटर लांब भाला फेकला.

स्पर्धेच्या अंतिम फेरीत नीरजव्यतिरिक्त डी. पी. मनू आणि किशोर जैना या भारतीय खेळाडूंचा देखील समावेश होता. यात किशोरने पाचवे तर मनूने सहावे स्थान पटकावले. किशोर जैना पाचव्या प्रयत्नात ८४.७७ मीटर भालाफेक करू शकला तर डी. पी. मनूने सहाव्या प्रयत्नात ८४.१४ मीटर चा थ्रो केला.

निराजने टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. २०२२ च्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. याशिवाय, डायमंड लीग २०२२, आशियाई स्पर्धा २०१८, राष्ट्रकुल स्पर्धा २०१८, आशियाई चॅम्पियनशीप २०१७, दक्षिण आशियाई स्पर्धा २०१६ आणि वर्ल्ड जुनीयर चॅम्पियनशीप २०१६ या स्पर्धांमध्ये निरज चोप्राने सुवर्णपदक पटकावले होते.

निरजच्या या सुवर्ण कामगिरीमुळे भारतासह जगभरातून त्यांचे कौतुक होत आहे. या ऐतिहासिक कामगिरीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना नीरज म्हणाला, ” हेच एक पदक राहिले असल्याविषयी सर्वजन बोलत होते आणि आज तेही पूर्ण झाले. मी ९० मीटरचं टार्गेट अजूनही पूर्ण करू शकलो नाही, पण सुवर्णपदक जिंकलो. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आता पुढे अजून बऱ्याच स्पर्धा आहेत आणि त्यात ९० मीटर भाला फेकण्याचा प्रयत्न नक्की करेन. त्या स्पर्धांमध्ये आणखी जास्त जोर लावेन.”

”पहिला थ्रो फेकताना तांत्रिक फाऊल झाला. त्यानंतर थोडा निराश झालो, परंतु मी स्वतःला अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी पूश केलं. भारतवासीयांना हे सांगू इच्छितो की, हे तुमचं पदक आहे. आज जागे राहून माझी मॅच पाहणाऱ्या प्रत्येक भारतीयाचे मी आभार मानतो,” असेही तो म्हणाला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी