31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयअजितदादा गायब, 7 आमदारही संपर्काबाहेर; चर्चा-अफवांना ऊत

अजितदादा गायब, 7 आमदारही संपर्काबाहेर; चर्चा-अफवांना ऊत

मध्यरात्रीपासून सोशल मीडियात ही कंडी जोरात पिकवली जात आहे. त्यात वेळीच राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत स्पष्टीकरण न आल्याने उलट-सुलट तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, अजित पवारांचा शनिवारी दुपारी 2 वाजता पुणे श्रमिक पत्रकार संघात कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. पुस्तक प्रकाशन.संबंधी हा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. अजितदादा या कार्यक्रमात आल्यास या अफवा व चर्चांसंबंधी भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार गायब असून 7 आमदारही संपर्काबाहेर आहेत, अशा चर्चा-अफवांना ऊत आला आहे. मध्यरात्रीपासून सोशल मीडियात ही कंडी जोरात पिकवली जात आहे. त्यात वेळीच राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत स्पष्टीकरण न आल्याने उलट-सुलट तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. सकाळी याबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. आधीच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी गौतम अदानी चौकशी प्रकरणात भलतीच भूमिका जाहीर करून गुगली टाकली होती. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर निघाले असतानाच NCP च्या दादांचा संपर्क होत नसल्याने चर्चांनी जोर धरला.

दरम्यान, पहाटे हाती आलेल्या माहितीनुसार, अजित पवारांचा शनिवारी दुपारी 2 वाजता पुणे श्रमिक पत्रकार संघात कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. पुस्तक प्रकाशन.संबंधी हा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. अजितदादा या कार्यक्रमात आल्यास या अफवा व चर्चांसंबंधी भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.

“न्यू इंडियन एक्सप्रेस”चे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी रात्री 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काका-पुतण्यात काहीतरी खिचडी पकत असल्याचे ट्विट करून धमाल उडवून दिली. तत्पूर्वीच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला फॉलो करतात, असा दावा करणाऱ्या समीत ठक्कर यांनी थेट अजित पवार गायब असल्याचे ट्विट करून जबरदस्त धमाका केला होता. हे ट्विट शेअर करत सोशल मीडियावर चर्चा रंगू लागल्या. त्यातच अजित पवार यांचा इतिहास वादग्रस्त असल्याने चर्चांच्या फोडणीला, अफवांच्या सणसणीत तडक्याने भलत्याच उकळ्या फुटू लागल्या.

चर्चांना काही संदर्भ आणि संशयास्पद भूमिकाही जोडल्या गेल्या. मुख्य तर शरद पवार यांची अदानी प्रकरणातील भूमिका आधीच अनेकांना धक्का देऊन गेली होती. त्यापूर्वी रोहित पवार यांनीही अदानी यांची वकिली केली होतीच. सावरकर विषयावरील राष्ट्रवादीचे मौनही बुचकळ्यात टाकणारे होते. अदानी विषयी शरद पवारांच्या सारवासारव व भाजपची पाठराखण करण्याच्या भूमिकेमुळे, या पवारांवर भरवसा कसा ठेवायचा? हा प्रश्न आधीच उपस्थित केला गेला होता. अदानी भ्रष्टाचार चौकशीसाठी संसदेच्या JPC ची आवश्यकता नसल्याची आश्चर्यकारक भूमिका पवारांनी मांडल्याने शरद पवार हे भ्रष्ट अदानीच्या पाठीशी असल्याचा संदेश गेला. त्यांनी याविषयीच्या काँग्रेसच्या आक्रमक मागणीत खोडा घातला. यामुळे विरोधी ऐक्यालाही तडा जाणार, अशी भीती व्यक्त केली. अदानी कांडात बॅकफूटवर ढकलल्या गेलेल्या भाजपशी पवारांनी हातमिळवणी केली की काय, अशी शंका उपस्थित केली गेली. पवारांना अचानक देशाच्या अर्थव्यवस्थेचा उमाळा का आला, हाही सवाल केला गेला.

या साऱ्या संशयास्पद आणि संभ्रमित करणाऱ्या वातावरणात अजित पवार आणि 7 आमदार नॉट रिचेबल झाले. मग तर चर्चा-अफवा इथवर पोहोचल्या, की राज्यातील सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार जात असून अजितदादा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. “एकनाथ अनाथ होतोय, येत्या 12 तारखेला, अजित पवार मुख्यमंत्री, 12 ला शपथविधी” अशा पोस्ट सोशल मीडियातून व्हायरल झाल्या.

शिंदे फडणवीस सरकार पडणार ? स्थिर सरकार, निवडणूका टाळण्यासाठी भाजपला बाहेरुन पाठींबा? अशा सोशल ब्रेकिंग आल्या. आधीच मोदींच्या पदवीवरुन अजित पवार यांचे वक्तव्य, शरद पवार-रोहित पवार यांचे अदानीबाबतचे वक्तव्य याचे अर्थ काढले जाऊ लागले. विधान भवनात झालेली फडणवीस-ठाकरे भेट, परवाचे आदित्य ठाकरे यांचे सरकार काही तासातच पडणार असल्याचे वक्तव्य, याची गुंफण घातली गेली. नेमके शिंदे सेना अयोध्या दौऱ्यावर जात असताना राज्यात “पहाटेच्या शपथविधी”सारखा जांगडगुत्ता सुरू झाला.

सकाळी पुण्यात असलेले अजित पवार नंतर सात आमदारांसह संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. अजितदादा हे कोविडमुळे महाराष्ट्रबाहेर गेल्याची माहिती सोशल मीडियातून दिली गेली. पण मग सात आमदार सोबत कशासाठी, अशी शंकाही व्यक्त केली गेली. अजित पवारांसह गेलेल्या सात आमदारांची माहिती कोणत्याही चर्चा-अफवातून पुढे आली नाही. फक्त 7 हा आकडा रेटला गेला. हे आमदार पुणे जिल्हा व परिसरातीलच असावेत, अशी शक्यता काहींनी वर्तविली. 7 ही काही छोटी संख्या नाही. राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून आणायला ती पुरेशी आहे, असेही भाकीत सांगितले गेले.

राज्याचे राजकारण गेल्या तीन वर्षांत टीव्ही वरील मालिकांनाही मागे टाकेल, इतक्या अनाकलनीय ट्विस्टसनी भरलेले आहे. काहीही, केव्हाही होऊ शकेल, अशी राज्यातील सध्याची स्थिती आहे. परवाच मंत्रिमंडळ बैठकीत भाजपाच्या कारखान्यांच्या थकहमीचा 1,000 कोटींचा निधी शिंदे सेनेने रोखला. भाजपाच्या आमदारांना किंमत नाही, शिंदे हे फडणवीस यांना जुमानत नाहीत, त्यामुळे फडणवीस कमालीचे नाराज आहेत, अशाही चर्चा होतच होत्या. शिंदे सेना सोबत असल्याचा भाजपलाच मुंबईसह राज्यातील आगामी निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो, अशी भीती भाजप कार्यकर्तेच व्यक्त करत असतात. अशा स्थितीत काहीही होऊ शकते, हाच चर्चा व अफवांचा आधार आहे. सकाळी राष्ट्रवादीकडून अधिकृत स्पष्टीकरण आल्यानंतर किंवा खुद्द अजितदादाच समोर आल्यानंतर कदाचित या विषयावर तात्पुरता पडदा पडू शकेल.

हे सुध्दा वाचा :

पहाटेचे सरकार गेल्याने भारतीय जनता पक्षाची सत्तेसाठी तडफड : नाना पटोले

एक पुस्तक लिहिणार असून त्यामध्ये त्या शपथविधीच्या सर्व घटना उघड करणार – देवेंद्र फडणवीस

बाळासाहेब ठाकरेंचे इंदिरा गांधींना पत्र, पहाटे 4.30 वाजता शिवसेना प्रमुखांना झाली होती अटक

न्यूज 18 लोकमत या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा ट्वीस्ट येणार का? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत, कारण अजित पवारांनी आज आणि उद्याचे कार्यक्रम अचानक रद्द केले आहेत. अजित पवारांनी आज दुपारी 4 वाजल्यापासूनचे कार्यक्रम रद्द केले आहेत. अजित पवारांनी दुपारीच त्यांचा कॉनव्हॉय आणि स्टाफ सोडला आणि ते खासगी गाडीतून रवाना झाले आहेत. पण ते नेमके कुठे गेले आहेत, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोन आला आणि त्यांनी सगळे कार्यक्रम रद्द केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. अजित पवार हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे त्यांना कॉनव्हॉय म्हणजेच गाड्यांचा ताफा आणि स्टाफ असतो. हा कॉनव्हॉय आणि स्टाफ अजित पवारांनी सोडून दिला आहे, त्यामुळे दादा नेमके कुठे गेले? याबाबत पुन्हा एकदा चर्चांना तोंड फुटले आहे.

2019 विधानसभा निवडणुकीनंतरही राज्यात सत्तासंघर्ष झाला होता, तेव्हाही महाविकासआघाडी सरकार स्थापनेची चर्चा सुरू असताना अजित पवार अचानक बैठक सोडून निघून गेले. यानंतर थेट सकाळी राजभवनावर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत महाराष्ट्राला धक्का दिला. फडणवीस आणि अजितदादांचा हा प्रयोग यशस्वी ठरला नसला तरी यानंतर कायमच या दोघांच्या मैत्रीची चर्चा राजकीय वर्तुळात कायम असते.

Ajitdada Gayab,7 MLA not reachable,Talk rumors spreading, ajit pawar press conference, Sharad Pawar adani

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी