31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयशरद पवारांना ‘त्या’ संतप्त कार्यकर्त्याचे पुन्हा पत्र !

शरद पवारांना ‘त्या’ संतप्त कार्यकर्त्याचे पुन्हा पत्र !

परम आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब,

साष्टांग दंडवत. 

त्या दिवशी अजित पवारांचा सकाळी सकाळी शपथविधी टिव्हीवर पाहिला आणि डोकंच फणफणलं साहेब. तळपायाची आग मस्तकात गेली. माझ्यासारखे लाखो कार्यकर्ते अक्षरशः वेडे झाले होते. काय करावे हे कुणालाच सुचत नव्हते. जो तो एकमेकाला फोन करून माहिती देत होता. सोबत शिव्यांची लाखोली सुद्धा वाहत होता. अजित पवारांना बोलून, लिहून काही फरकच  पडणार नव्हता. कारण आमचं कधीच जमलं नाही त्यांच्याशी. म्हणून अजित पवारांवरील जो तीव्र राग होता, तो आपल्यावर निघाला. राग नेहमी आपल्या जवळच्या प्रेमाच्या माणसावरच निघतो साहेब. सगळ्या लोकांसारखे आम्हालाही वाटले की हे सगळे साहेबांचेच काम आहे. परंतु तुमच्या दुपारच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर हळू हळू गोष्ट स्पष्ट होऊ लागली. तेव्हा संजय राऊतांचे शब्द आठवले, ‘शरद पवार समजायला १०० जन्म घ्यावे लागतील’. तत्वतः मान्य साहेब.

साहेब, त्या दिवशी रागारागात आपल्याला बरेच काही बोललो. त्यासाठी मनापासून माफी मागतो. तुम्ही आमचा जीव की प्राण. त्या भावनेतूनच आपल्याला लिहिले. साहेब, तुम्हाला सांगतो एकवेळ भाजपाचे सरकार पुन्हा चालले असते. परंतु ते पेशवे फडणवीस नको होते. तो पेशवा आम्हा सर्वांच्या डोक्यातच गेला होता. काय ती बोलण्याची मग्रुरी भाषा ? आणि पुन्हा तोच पेशवा मुख्यमंत्रीपदी आल्याने आमचा सगळा तोलच सुटला. सहन झाले नाही आम्हाला. मग तो पेशवा आणि अजित पवार या दोघांवरचा राग आपल्यावर निघाला. आपण अजितदादांना अनेकवेळा माफ केलेत. मग आम्हा सामान्य कार्यकर्त्यालाही माफ कराल ही अपेक्षा.

साहेब, आम्ही मागे लिहिल्याप्रमाणे आपणाला एक विनंती केली होती की,  या तरुण पिढीला ‘शरद पवार’ या माणसाची ताकद माहीत नाही. म्हणून आपणच मुख्यमंत्री व्हावे. परंतु आता नवीन पिढीला समजले आहे की,  ‘शरद पवार क्या चीज है’. साहेब, ही मंडळी आपल्याला चाणक्य, चाणक्य म्हणून संबोधतात. आम्हाला तो ‘चाणक्य’ नकोच आहे. आमच्या बहुजन भाषेत बोलायचे झाले तर आपण राजकारणातले  ‘बाप आहात बाप’.

निवडणूक जाहीर झाल्यापासून आणि त्या ईडी प्रकरणापासून आपली एकेक खेळी म्हणजे राजकीय क्षेत्रात अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी तो एकेक पीएचडीचा विषय आहे.

साहेब, ‘महाविकास आघाडी’च्या नव्या सरकारवर आपले लक्ष आणि नियंत्रण असेलच यात काहीही शंका नाही. परंतु हे भाजपायी आपल्या सरकारला प्रत्येक वेळी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील. ते टपूनच बसलेत. त्यांना चान्स मिळेल असे काही करूच नका. त्यांच्या शेपटीवर पाय पडल्याने ते चवताळलेत. सावध रहा. पेशव्यांवर भरोसा ठेवायचा नाही. ते उद्धव ठाकरे बिचारे – त्यांना प्रशासनातील टक्के, टोनपे, टोणगे माहीत नाहीत. त्यांना सुद्धा अप्रत्यक्षरित्या आपल्यालाच सांभाळावे लागणार आहे.

साहेब, आपल्याला भाजपवाल्यांवर पलटवार करावाच लागेल. काढा ‘आरे’ची फाईल, काढा ‘समृद्धी महामार्गा’ची फाईल, काढा नवी मुंबईतील सिडको जमिनीची फाईल, काढा न्या. लोया प्रकरणाची फाईल, काढा सामाजिक वणीकरणाची फाईल,  काढा रस्ते घोटाळ्याची फाईल, अशा अनेक फायली काढून यांना गप्प बसवावे लागेल. यांचा मुखवटा टराटरा  फाडावाच लागेल.

आणि हो, थोडे पक्षांतराबद्दल. त्या खडसे, तावडे, बावनकुळे ह्यांना आपल्या पक्षात घ्या साहेब.

साहेब, हे आता पासूनच प्रचाराला लागलेत की, किती दिवस ही तीन पायाची रिक्षा टिकणार आहे वगैरे वगैरे. आम्हाला खात्री आहे, जो पर्यंत साहेब तुम्ही आहात तोपर्यंत हे सरकार येणारे पाच वर्षे तर चालेलच. पण त्याच्या पुढील आणखी १० वर्षे भाजपायींना सत्तेत पुन्हा स्थान नाही. नाही म्हणजे नाही. साहेब हे तुमच्यामुळेच शक्य होईल.

साहेब, तुमच्यावरचा जो खंजिरचा डाग होता ना तो आता संपूर्ण धुवून निघाला आहे. आपली प्रतिमा संपूर्ण भारतभर एका वेगळ्याच उंचीवर गेली आहे. भाजपविरुद्ध आपण एकटे लढू शकता आणि जिंकू शकता हा संदेश देशभर गेला आहे. एक लढवय्ये  राजकारणी म्हणून आपण मान्यताप्राप्त झाला आहात. भाजपा म्हणजेच मोदींचे काउन्टडाऊन सुरू झाले आहे. २०२४ मध्ये केंद्रात आघाडीचे सरकार असेल आणि आपण सर्वमान्य प्रधानमंत्री पदाचे उमेदवार असणार याची आम्हाला १०० टक्के खात्री आहे. फक्त महाराष्ट्रामधूनच आपल्या तिघांचे मिळून ४८ पैकी ४५ खासदार असतील.

साहेब, आम्ही निवडणुकीच्या काळात  आपल्या राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांना खुले पत्र लिहिले होते की, भाजपाचे सरकार पुन्हा येणार नाही. थोडेसे कष्ट घ्या म्हणजे सरकार आपलेच येईल. साहेब तेच खरे झाले. आपण घेतलेले अपरिमित कष्ट, त्याला कार्यकर्ते आणि मतदारांनी दिलेली साथ. शेवटी निकाल आपल्याच बाजूने लागला.

साहेब, म्हणून सांगतोय २०२४ ला पंतप्रधान शरदचंद्र पावरसाहेबच राहणार. लिहून देतो साहेब आपल्याला.

आणि हो साहेब जाता जाता एक विनंती त्या अजितदादांना माफ करा साहेब. आता त्यांच्यावरचा आमचाही राग बराच कमी झालाय. त्यांनाही पश्चाताप झालाय असं वाटतंय.

साहेब, २०२४ च्या आपल्या प्रधानमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याला आमच्या आताच शुभेच्छा .

 

जय हिंद, जय महाराष्ट्र .

आपला एक कट्टर चाहता,

ॲड. विश्वास काश्यप

मुंबई.

हे सुद्धा वाचा

शरद पवार यांना एका संतप्त कार्यकर्त्याचे पत्र

शरद पवार यांना खुले पत्र…

काँग्रेस – राष्ट्रवादी महाआघाडीचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना खुले पत्र

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी