31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयअजित पवार गटांकडून ऑफर्स येत आहेत; एकनाथ खडसे यांचा दावा

अजित पवार गटांकडून ऑफर्स येत आहेत; एकनाथ खडसे यांचा दावा

२ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी आठ आमदारासह राष्ट्रवादीत बंड करून राज्य मंत्रीमंडळात स्थान मिळवले. यानंतर शरद पवार यांचा राष्ट्रवादी कॉँग्रेसचा गट फोडण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. असे असताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून ऑफर्स येत आहेत, असा खळबळजनक दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसे हे रावेर लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादीचे प्रबळ दावेदार मानले जातात.

‘मला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा अजित पवार यांच्या वतीने फोन आला होता आणि त्यांनी मला त्यांच्या गटात येण्यास सांगितले होते. मी शरद पवारांशी एकनिष्ठ असल्याने मी त्यांना  सोडणार नाही; असे मिटकरी यांना बोललो होतो,’ असे खडसे यांनी पत्रकारांना सांगितले.

खडसे हे ४० वर्ष भाजपामध्ये होते. शिवसेना भाजपा सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. नंतर ते राज्याचे विरोधी पक्षनेतेही होते. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांचे खच्चीकरण करण्यात आले होते. पक्षात डावलले जात असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी २०२० मध्ये भाजपा सोडून राष्ट्रवादीची वाट धरली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर, त्यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर निवड झाली.

हे सुद्धा वाचा 

या मुद्द्यावर भाष्य करताना, खडसेंचे जळगाव जिल्ह्यातील राजकीय प्रतिस्पर्धी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन म्हणाले, ‘खडसे अजित पवारांच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे मला समजले, पण माझा त्यांना सल्ला आहे की शरद पवारांना सोडू नका. त्यांनी ज्येष्ठ पवारांच्या सोबत राहावे.’ अजित पवार आणि इतर आठ आमदार या वर्षी जुलैमध्ये शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील झाले आणि त्यांचे काका आणि राष्ट्रवादीचे संस्थापक/ अध्यक्ष शरद पवार यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पक्ष फुटला नसून आमचीच  खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे दोन्ही गट सांगत आहेत.

दरम्यान, एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीतून रावेर लोकसभा मतदार संघातून लोकसभेसाठी उभे केले जाण्याची शक्यता आहे. सध्या या मतदार संघाच्या खासदार त्यांची सून रक्षा निखिल खडसे या आहेत. एकनाथ खडसे यांचे जळगाव जिल्ह्यात प्रस्थ आहे. त्यामुळेच की काय रक्षा खडसे दोनदा या लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या आहेत. आता सासरा (एकनाथ खडसे ) यांना रावेर लोकसभेची जागा मिळाल्यावर सून (रक्षा खडसे) निवडणूक लढवणार का, हे पहावे लागणार आहे. पण भाजपने यंदा राज्यातील ४८ पैकी ४८ लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचा चंग बांधला असताना रक्षा खडसे यांना भाजपा तिकीट देणारच, त्यामुळे खडसे कुटुंबात आगामी काळात काय राजकारण होणार हे पहावे लागणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी