35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादी काँग्रेसचा पाय खोलात; राष्ट्रीय दर्जा रद्द झाल्याने होणार 'हा' तोटा !

राष्ट्रवादी काँग्रेसचा पाय खोलात; राष्ट्रीय दर्जा रद्द झाल्याने होणार ‘हा’ तोटा !

नागालॅंडमध्ये नुकताच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेत 4 जागा मिळाल्या होत्या. पण राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकून राहण्यासाठी तीन महत्त्वाच्या अटींची पूर्तता करावी लागते. ती पूर्ण न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा दर्जा काढून घेण्यात आला आहे.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा भूकंप म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय या तीनही पक्षांचा राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1998 साली झाली होती. तेव्हापासून सलग 15 वर्ष हा पक्ष राज्यात सत्तेत होता. तसेच या पक्षाने देशाच्या राजकारणातही ठसा उमटवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकेकाळी देशाचे केंद्रीय कृषीमंत्रीदेखील होते. असं असताना निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत घेतलेल्या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी काळातील राजकारण आणि निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा रद्द झाल्यामुळे राज्यातील पक्ष संघटनेवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. राज्यात राष्ट्रवादीला केवळ मान्यताप्राप्त पक्षाचा दर्जा राहणार असून, ‘घड्याळ’ हे चिन्हही वापरता येईल. मात्र महाराष्ट्र आणि नागालँड वगळता अन्य राज्यांमध्ये ‘घड्याळ’ चिन्ह अन्य राजकीय पक्षांना मिळण्याची मुभा असल्याने पक्षासाठी ही मोठी चिंतेची बाब आहे. तसेच पक्षाच्या स्टार प्रचारकांची संख्याही 40 वरून 20 पर्यंत खाली येणार असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा तोटा मानण्यात येत आहे.

निवडणूक आयोगाने मार्च महिन्यात राष्ट्रवादी, भाजप, तृणमूल, बसप या पक्षांच्या दर्जाचा आढावा घेतला होता. त्यानंतर काल सोमवारी निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशात तीन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला. निवडणूक आयोगाने केंद्रातील राष्ट्रीय लोकदल (उत्तर प्रदेश), भारत राष्ट्र समिती (आंध्र प्रदेश), पीडीए (मणिपूर), पीएमके (पुद्दुचेरी), राष्ट्रीय समाज पार्टी (पश्चिम बंगाल) आणि एमपीसी (मिझोराम) यांचा राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे दिल्ली, गोवा, पंजाब आणि गुजरात विधानसभा निवडणुकीतील कामगिरीच्या जोरावर आम आदमी पक्षाने राष्ट्रीय दर्जा मिळविला आहे. बहुजन समाज पक्षाचा राष्ट्रीय दर्जा कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता भाजप, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बसप नॅशनल पीपल्स पार्टी आणि आप हे सहा राष्ट्रीय पक्ष राहतील.

राष्ट्रीय दर्जाचे निकष

■ लोकसभेतील किमान 2 टक्के जागा पक्षानं तीन वेगवेगळ्या राज्यांमधून जिंकलेल्या असाव्यात.
■ लोकसभेत 4 खासदार असावेत. शिवाय, 4 राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत किमान 6 टक्के मतं मिळेलेली असावीत.
■ किमान 4 राज्यांमध्ये पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा असावा.

या तीनपैकी एका निकषाची पूर्तता केली, तरी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो. लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसने दोनच राज्यातून जागा जिंकल्या होत्या. महाराष्ट्राव्यतिरिक्त राष्ट्रवादीचा लक्षद्वीप मधून खासदार 2019 साली निवडून गेला. राष्ट्रवादी काँग्रेसचा झारखंड विधानसभेत एक आमदार आहे, केरळ विधानसभेत 2 आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या नागालॅंडच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 4 आमदार आले आहेत. नागालँडमध्ये 4 विधानसभेच्या जागा मिळाल्या असल्या तरी 4 राज्यांमध्ये किमान 6 टक्के मतं मिळालेली असण्याचा निकष पूर्ण झाला नाही, यामुळे राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा: 

राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस पक्षांचा राष्ट्रीय दर्जा रद्द

शरद पवारांच्या अदानी प्रकरणात शशी थरूर यांची उडी; केलं मोठ विधान

शरद पवारांकडून अदानी यांची पाठराखण ही त्यांच्या पक्षाची भूमिका : नाना पटोले

राष्ट्रीय पक्षाला कोणते फायदे मिळतात?

एखाद्या पक्षाला ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून दर्जा मिळाल्यानंतर त्याला काही फायदेसुद्धा मिळतात. सर्वात मोठा फायदा म्हणजे, ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून मान्यता असलेल्या पक्षाला देशभरात कुठेही निवडणूक लढवताना एकच चिन्ह राखीव मिळतं. राष्ट्रीय दर्जा मिळालेल्या पक्षाला निवडणूक आयोग मतदारांची अपडेटेड यादी निवडणुकांपूर्वी पुरवतं, तसंच या पक्षाच्या नेत्यांना उमेदवारी अर्ज भरताना एकाच अनुमोदकाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे या पक्षाला रेडिओ आणि दूरदर्शनवर प्रक्षेपणाची सोय पुरवली जाते. राष्ट्रीय पक्षाला स्टार प्रचारकांची यादी वेगळ्याने काढण्याची मुभा असते. या यादीत जास्तीत जास्त 40 नेत्यांचा समावेश केला जाऊ शकतो आणि या प्रचारकांच्या प्रवासाचा खर्च उमेदवारांच्या प्रचारासाठीच्या खर्चात मोजला जात नाही. पक्षाच्या कार्यालयासाठी सरकारकडून सवलतीच्या दरात जमीन मिळवता येऊ शकते.

 

NCP, National Congress Party National Status has revoked by Election Commission, Sharad Pawar

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी