34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयशरद पवार यांना खुले पत्र...

शरद पवार यांना खुले पत्र…

साहेब,

डायरेक्ट मुद्यालाच हात घालतो. साहेब, महाराष्ट्राच्या भल्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा फक्त एकदाच मुख्यमंत्रीपद धारण करा. व्हा पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री !

साहेब, आपला महाराष्ट्र सगळा कसा भकास होत चाललाय हो. या लोकांनी महाराष्ट्र गेल्या पाच वर्षात कुठे नेऊन ठेवलाय ? सगळ्या सगळ्या आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरलंय. सतत खोटं वागणं, खोटं बोलणं, खोटी आश्वासनं, खोटी आकडेवारी, खोटं, खोटं आणि फक्त खोटं… या खोटरडेपणामुळे जनता विटलीय यांना.

राज्यात कोणीही समाधानी नाही. कामगार, शेतकरी, सरकारी कर्मचारी, बिन सरकारी कर्मचारी, फुटपाथवरील विक्रेते, मजूर, व्यापारी सर्व वैतागलेत या सरकारला.

राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. त्यांच्यावर सरकार म्हणून कोणाचाही धाक राहिलेला नाही. गुन्हेगार मोकाट सुटलेत. खऱ्या आणि सच्या लोकांनाच कायद्याचा धाक दाखविला जातोय. ते ‘आरे’ प्रकरण पहा ना. त्या तरुणांचा काय दोष होता ? पण नाही. त्यांच्यावर अट्टल गुन्हेगारांना लावतात तशी कलमे लावून त्यांचे भविष्य अंधकारमय करून टाकले या सरकारने.

तरुणांना नोकऱ्या नाहीत. जे नोकरदार आहेत ते एक एक दिवसाआड बेरोजगार होत चालले आहेत. शिक्षण इतकं महाग करून ठेवलंय की ते कोणासाठी आहे असा मोठा प्रश्न पडावा. तरुणांची माथी सतत भडकत राहतील याची पुरेपूर काळजी घेतली जातेय.

लोकल मधील प्रवासी सरकारविरुद्ध एकतरी कमेंट पास केल्याशिवाय तो त्याचा प्रवास पूर्णच करत नाही. इतकी चीड, प्रचंड खदखद प्रत्येकाच्या मनात भरलेली आहे.

रस्त्यावरून चालणं म्हणजे कुठंतरी अंतराळात चालण्यासारखं झालं आहे. या खड्यांमुळे दररोज अनेक अपघात होऊन त्यात अनेक कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त होत आहेत. रस्ते तयार करणाऱ्या ठेकेदारांवर सरकार म्हणून कोणाचा वचकच नाही. काळ्या यादीतील ठेकेदार पुन्हा पुन्हा टाळुवरचे लोणी खाण्यास तयार आहेत. अशा ठेकेदारांवर जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अशी हजारो कुटुंब उध्वस्त होत राहतील.

सध्याच्या सरकारी प्रशासनात राज्यकर्त्यांनी वाईट प्रकारची दहशत तयार केली आहे. सरकारच्या वाईट धोरणाला जो कोणी विरोध करेल त्याला सळो की पळो करून सोडले जात आहे. त्याचे रेकॉर्ड खराब केले जात आहेत. त्यामुळे वरिष्ठ नोकरशहा घाबरलेले आहेत. ते फक्त स्वतःच्या खुर्च्या सांभाळण्याव्यतिरिक्त काहीही काम करत नाहीत.

साहेब, या सर्वांवर एकच उपाय म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर आपण विराजमान होणे.

साहेब, तुमच्या हातात जादूची कांडी नाही हे आम्ही मान्य करतो. पण सरकार चालविण्यासाठी असल्या कांडीची गरजच लागत नाही. सरकार चालविण्यासाठी लागते ती फक्त संवेदनशीलता, योग्य प्रागतिक विचार, पुरोगामी परंपरा, जनतेच्या हितासाठी कठोर प्रशासक, महाराष्ट्राच्या इतिहास भुगोलाची खडान् खडा माहिती असणारा, लोकांच्या मनातील भावना समजणारा, सर्व क्षेत्रातील माहिती असणारा जाणकार, सामाजिक बांधिलकी जपणारा, शेतकऱ्यांच्या प्रती असणारी निष्ठा, सर्वधर्मसमभाव आणि सर्वश्रेष्ठ असणारी राज्यघटना मानणारा, विशेष म्हणजे, स्वकियांसहित विरोधकांना सुद्धा सोबत घेऊन काम करणारा राज्यकर्ता आणि इतर बरंच काही… साहेब, हे सर्व गुण आपल्या नेतृत्वात आहेत.

साहेब, तुम्ही २४/२५ वर्षांअगोदर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता. त्यामुळे या नवीन मतदार पिढीला आपल्या नेतृत्वाखालचे सरकार पाहण्याचे भाग्य मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी एक आदर्श शासनकर्ता कसा असावा याचा वस्तुपाठ दाखविण्यासाठी का होईना पण आपण मुख्यमंत्री झालेच पाहिजे. ही पिढी त्यांच्या पुढच्या पिढीला सांगेल, मुख्यमंत्री असावा तर शरद पावरांसारखा.

साहेब, तुम्हाला मुख्यमंत्री व्हावेच लागेल. आम्हा जनतेसाठी, उज्वल महाराष्ट्राच्या भविष्यासाठी, राज्याच्या प्रगतीसाठी, महाराष्ट्रातल्या तरुण पिढीसाठी, शेतकऱ्यांसाठी,  उद्योगधंद्यासाठी, शैक्षणिक धोरणांसाठी, सामाजिक सलोखा राखण्यासाठी, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा महाराष्ट्र भविष्यात जिवंत ठेवण्यासाठी…

साहेब तुम्हाला मुख्यमंत्री व्हावेच लागेल .

साहेब, मतदानाला शेवटचे ५/६ दिवस राहिले आहेत. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून स्वतःला घोषित करा. उभा आडवा महाराष्ट्र, संपूर्ण मराठी माणूस आपल्यासाठी जीव ओतून काम करेल. आजच्या घडीला महाराष्ट्राला फक्त आपल्या आणि आपल्याच नेतृत्वाची गरज आहे.

साहेब, महाराष्ट्र आपल्या हातातच सुरक्षित राहील. अन्य कोणीही सध्याच्या महाराष्ट्राला वाचवू शकणार नाही. तेव्हा साहेब महाराष्ट्राच्या हितासाठी, भविष्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री व्हावेच लागेल .

आपला,

अॅड. विश्वास काश्यप,

माजी पोलीस अधिकारी

मुंबई

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी