35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयराज ठाकरेंचे संपूर्ण भाषण : भाजप - शिवसेनेच्या वचनाम्याची केली चिरफाड, शाह...

राज ठाकरेंचे संपूर्ण भाषण : भाजप – शिवसेनेच्या वचनाम्याची केली चिरफाड, शाह – मोदींवरही टिकास्त्र

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात अनेक समस्या आहेत. नोकऱ्या जाताहेत. शेतकरी आत्महत्या करतोय. पण त्यावर सरकार काहीच बोलत नाही. आजच अमित शाह महाराष्ट्रातील एका गावात भाषण करीत होते. त्यावेळी बाजूच्या गावांत शेतकरी आत्महत्या करीत होता, असा घणाघात राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर घातला.

भांडूप पश्चिम येथील सभेत राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप – शिवसेना सरकारच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडलं. पाच वर्षांपूर्वी भाजप व शिवसेनेने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांच्या पिसे राज यांनी यावेळी काढली.

राज ठाकरे यांचे भाषण जसेच्या तसे…

 

माझ्या कालच्या दोन्ही सभा तुम्ही पाहिल्या असतील. विरोधी पक्षात राहायची ही भूमिका घेण्याचं कारणच असं आहे की, निवडणुकीचा दिवस येई पर्यंत सगळे हुजरे मुजरे करतात. मतदान संपलं की, तुम्ही जिवंत आहात की मेला आहात याच्याशी कोणाला काही देणं घेणं नसतं. पण तोपर्यंत पाच वर्षे निघून गेलेली असतात. निवडणुकीच्या वेळी जाहीरनामे काढतात. वचननामे काढतात. तुम्ही कधी त्यांनी पाच वर्षांत काय सांगून ठेवलंय हे बघत नाही. जनतेचा हा विसराळूपणा हाच यांच्या पथ्यावर पडत आला आहे. चॅनेलवाले, वृतपत्रवाले यांना विचारत नाही. पाच वर्षांपूर्वी त्यांनी काय जाहीरनाम्यात म्हटलं होतं. बँकांतील पैसे बुडताहेत. गेल्या पाच वर्षांत 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. कुणाला काही पडलंय. ग्रामीण भागात आज अमित शाह भाषण करत होते. संपूर्ण भाषणात त्यांनी शेतकऱ्यांविषयी एक चकार शब्द काढला नाही. 370 कलम रद्द केले एवढेच सांगत बसले. त्यांचे भाषण चालू असतानाच बाजूच्या गावात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली.

लोकं मरताहेत, पण जनतेला राग येत नाही

गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात 14000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एवढी लोकसंख्या आहे. काहीजण गेले तर गेले. मुंबईत पूल पडले. छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळचा पडला. अंधेरीला पडला. त्याच्याखाली माणसं पडून मेली. एवढी माणसं आहेत. त्यात थोडी गेली. अशीच सरकारची वृत्ती आहे. याचा राग तुम्हाला येत नाही. वर्षानुवर्षे असंच चालू आहे.

पाच वर्षांपूर्वीचा भाजप – शिवसेनेचा जाहिरनामा काय होता ?

पाच वर्षांपूर्वी यांनी काय सांगून ठेवलं. त्यातल्या किती गोष्टी केल्या. कोणत्या गोष्टी केल्या नाहीत. किती गोष्टीत तुमच्या तोंडाला पानं पुसली. काही नाही.

मी काही गोष्टी तुमच्यासाठी आणल्यात. आठवतय का बघा. आठवणार नाहीच. शिवसेना व भारतीय जनता पक्ष यांनी गेल्या पाच वर्षांपूर्वी काय गोष्टी सांगितल्या होत्या. मी तुम्हाला त्या सांगतो. त्या झाल्यात की नाही हे तुम्ही मनातल्या मनात विचार करा.

  1. महापालिकेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना महापालिकेतील नोकरीत प्राधान्य आज उद्योगधंदे बंद होताहेत. महापालिका कर्जात गेली आहे. उद्या मुंबई महानगरपालिका कधी बंद होईल. नुसती शहरं वाढताहेत. वाहतूक कोंडी वाढतेय. रहदारी वाढतेय. फेरिवाल वाढताहेत. आम्हाला आठवतच नाही. नोकऱ्या दिल्या का ?

 

  1. आधुनिक कॉंक्रिटीकरणातील तंत्रज्ञानाचा वापर करून खड्ड्यांचा प्रश्न निकाली काढणार हे जाहीरनाम्यातील सांगतोय तुम्हाला. आता तुम्ही ठाण्यात – डोंबिवलीत – मुंबईत जा. आधुनिक तंत्रज्ञान वापरणार होते. कुठे गेले हे तंत्रज्ञान. पाऊस पडतोय. खड्डे पडताहेत. कंत्राटदारांना कामे मिळताहेत. कंत्राटदारांना मिळालेल्या कामातून आपले टक्के येताहेत. तुम्ही खड्ड्यात. तुम्हाला राग येतच नाही. नगरसेवकाला, आमदाराला, खासदाराला प्रश्नच विचारावासा वाटत नाही.

 

  1. मुंबई शहर व उपनगरांतील महत्वाच्या स्थळांपासून विमानतळापर्यंत शटल सेवा सुरू करणार – आपला विमानतळाशी फारसा संबंध येत नाही. त्यात शटलचं काय करायचं मला माहित नाही. हा शब्द आहे की, शिवी मला कळलं नाही. काही नाही झालं पुढं.

 

  1. मी भाजपाच्या जाहीरनाम्यातील फक्त पहिला परिच्छेद वाचून दाखवतो – गेल्या पंधरा वर्षांत काँग्रेस – राष्ट्रवादीच्या सरकारने महाराष्ट्राला कर्जबाजारी करून ठेवलंय. अक्षरशः भीकेला लावले आहे – इथं कोणाचीच बाजू घेण्याचा प्रश्न नाही. त्यांच्या काळातही कर्ज वाढलं. आपल्या महाराष्ट्रावरती भाजपच्या काळात आणखी कर्ज वाढले आहे.

शिवसेना – भाजपने पाच वर्षांपूर्वी जाहिरनाम्यात ज्या समस्या मांडल्या होत्या. त्या आजही तशाच आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या तशाच आहेत. किंबहूना त्या वाढल्या. बाबांनो तुम्ही हे कधी तरी वाचणार आहात का ?

संबंध महाराष्ट्रातरच दयनीय स्थिती

हे मी केवळ मनसेच्या मतदारांनाच सांगतोय असं नाही. हे महाराष्ट्रातील संबंध जनतेसाठी महत्वाचं आहे. तुमच्या घरामध्ये येणारं पाणी, दूध, धान्य, भाजीपाला.. हे सगळं येत असतं त्या मागे प्रश्नासन असते. प्रशासनाच्या मागे निवडणुका असतात. निवडून आलेली माणसे तिकडे बसतात. हीच माणसे गोष्टी ठरवत असतात. दुधाचा दर किती असावा हे ठरवते सरकार. पाणी कपात किती करायची हे ठरवते महापालिका – सरकार. शिक्षणाचे शुल्क कमी करायचे की वाढवायचे. शिक्षणाचा बोजा कमी करायचा की वाढवायचा. तुम्हाला एडमिशन मिळणार की नाही. तुम्हाला नोकऱ्या मिळणार की नाही मिळणार. नोकऱ्यांसाठी महाराष्ट्रात उद्योगधंदे वाढताहेत का. कसलेही प्रश्न तुम्हाला पडत नाहीत. अवती भवतीचं वातावरण बघून फक्त दात – ओठं खात घरी बसायचं.

महाराष्ट्र नवर्निर्माण सेनेने केली यशस्वी आंदोलने

हीच तर ती वेळ आहे. राग व्यक्त करायचा आहे. तुम्ही आमच्याशी खोटं बोललात. गेल्या पाच – दहा वर्षांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जी आंदोलने घेतली, भाजप – शिवसेनेने जाहिरनाम्यातच लिहिलंय आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू. महाराष्ट्र सैनिकांमुळे जवळपास 78 टोलनाके बंद झाले. त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजप – शिवसेनेने सांगितलं होतं, आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू. अजूनही टोल चालू आहे. टोलच्या बाहेर अजूनही वाहनांच्या रांगा आहेत.

चौथी भाषा मुंबईत आली तर बांबू..

मोबाईल फोनवर हिंदी आणि इंग्रजी भाषा होती. मनसेच्या दणक्याने मराठी सुरू झालं. पहिली भाषा मराठी आली पाहिजे अशी मागणी केली. देशात त्रिसूत्री धोरण आहे. मुंबईत परत चौथी भाषा आणायचा प्रयत्न केला तर बांबू बसेल.

मनसेने आंदोलनांतून रिझल्ट दिले

एवढी आंदोलने मनसेने केली. त्याचे रिझल्ट दिले. तरी मला लोकं विचारतात, राज ठाकरे आंदोलने अर्धवट सोडतात. एक आंदोलन दाखवा अर्धवट सोडलेलं. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इथं मुस्लिमांनी मोर्चा काढला होता. आमच्या पोलिसांना मारहाण केली होती. महिला पोलिसांच्या अंगावर हात टाकले गेले होते. त्यावेळी मनसेने पोलिसांच्या बाजूने मोर्चा काढला होता. अरूप पटनाईक यांना सरकारने त्यावेळी आयुक्त पदावरून काढून टाकलं होतं.

मनसेने ज्या ज्या वेळी आंदोलनं केली, ती सगळी आंदोलनं तडीस नेली. त्यावेळी बाकीचे राजकीय पक्ष कुठं शेपट्या घालून बसले होते.

मनातील राग व्यक्त करण्यासाठीची निवडणूक

आजची निवडणूक त्यासाठीच आहे. तुमच्या मनातील राग कुणी व्यक्त करायचा. म्हणूनच, मला विरोधी पक्षासाठी मतदान करा. मला सरकारवर अंकुश ठेवायचा आहे.

नरेंद्र मोदीने नोटबंदीचा निर्णय घेतला. तेव्हा मी सांगितलं होतं, देशावर संकट येणार. माझं हे भाषण यु ट्यूबवरती आहे. काढून बघा. या देशातील उद्योगधंदे बंद होत जाणार. भारत पेट्रोलियम नफ्यामधील प्रकल्प आज रिलायन्सला देवून टाकताहेत. उद्या तिथल्या कर्मचाऱ्यांचं काय होणार. मुंबईतील डायमंडचा व्यवसाय गेला. इतर सगळे व्यवसाय रसातळाला जात आहेत. गुजरातमधील एका बिल्डरने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

हीच ती वेळ…

लोकांच्या नोकऱ्या जाताहेत. नवीन नोकऱ्यांची तर कसलीच शक्यता नाही. शाळा कॉलेजमध्ये तुमची मुलं जी शिक्षण घेत आहेत त्यांच्या नोकरीचा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

ही वेळ आली कशी. ही वेळ आणली कोणी. त्यांच्याकडे गडगंज पैसा. निवडणुकीसाठी भरपूर पैसा खर्च होत आहे. यांच्याशी भांडायचं कोणी. यांच्यासमोर ठाम उभे राहायचे कुणी. यांना प्रश्न विचारायचे कुणी. हा हतबल महाराष्ट्र मी नाही पाहू शकत. ज्या महाराष्ट्राने – देश नावाची संकल्पना नव्हती. ज्या मराठ्यांनी – महाराष्ट्राने अटक किल्ल्यापर्यंत – पाकिस्तानात तिथंपर्यंत जाऊन आपला भगवा फडकवला. म्हणून आपण म्हणतो, अटकेपार झेंडे लावले. असा हा महाराष्ट्र गलितगात्र पडला आहे. इतका हा महाराष्ट्र कधी थंड पडला होता का ?.

तुम्हाला चीड व्यक्त करण्यासाठी एक सक्षम विरोधी पक्ष महाराष्ट्रात हवा आहे. विरोधी पक्ष नेताच भाजपात जाणार असेल तर त्याला अर्थ नाही. माझ्या शिलेदारांच्या पोटात आग आहे. ते तुमच्यातीलच आहेत. म्हणून त्यांना मतदान करा. विरोधी पक्ष नसेल तर ते रोज तुमच्यावर वरवंठा फिरवतील.

आरेतील झाडांवरून न्यायालयेही कटघऱ्यात

आरेमधील झाडे तोडताना विचारलं का ? मेट्रोसाठी दुसरी जागा होती. कुलाब्याला गोदीची जागा होती. पण माहित नाही, कोणत्या उद्योगपतीच्या घशात जमीन घालायची होती ? आपल्यावर संस्कार आहेत की, रात्री झाडांवर कुऱ्हाड चालवू नये. लहानपणापासून शिकवलं गेलं. रात्री झाडं झोपलेली असतात. त्यांना हात लावू नये. यांनी रात्रीची 2700 झाडं तोडली.

आपली न्यायालये सुद्धा सरकारला हवा तसा न्याय देवू लागली आहेत. रात्री निर्णय देता. तो सुद्धा शुक्रवारी. कारण दाद मागणाऱ्यांना शनिवार, रविवार कुठे जाता येणार नाही.

रात्रीची झाडं तोडली. ही बातमी जगभर दिसली. तिथं जे तरूण तरूणी गेल्या त्यांना पोलिसांनी गाड्यात घालून जेलमध्ये घातलं. पोलीस तरी काय करणार. वरूनच आदेश तसा असेल तर ते ऐकणारच. या प्रकारांविरोधात उभं राहायला नको का ?

आम्ही सक्षम विरोधी पक्षासाठी तयार आहोत

आम्ही रस्त्यावर उभे राहूच. पण विधानसभेतही उभे राहू. आमच्या या निर्णयावर काही कुंथत पडणारे टीका करत आहेत. सत्ता तर आम्हाला हवीच आहे. पण आता ती अवाक्यात नाही. माझ्या अवाक्यात विरोधी पक्ष आहे. या सरकारला वठणीवर आणायचं आहे. तुमच्या मनातील राग, चीड घेऊन आमचे शिलेदार विधानसभेत जाणार आहेत. म्हणून माझ्या शिलेदारांना निवडून द्या. कोणताही निर्णय घेताना सरकारला शंभर वेळा विचार करावा लागेल, असा आम्हाला त्यांच्यावर अंकुश ठेवायचा आहे. त्यासाठी विधानसभेत जाणारे शिलेदार तुम्ही निवडून द्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी