31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमुंबईअजित पवारांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला, रात्री 9 वाजल्यानंतर झाले होते...

अजित पवारांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला, रात्री 9 वाजल्यानंतर झाले होते गायब

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीतील 21 आमदार फुटले आहेत. या 21 आमदारांच्या पाठिंब्यावर अजित पवारांनी भाजपसोबत घरोबा केल्याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांच्या या खेळीबद्दल शरद पवार यांना काहीही माहित नसल्याचेही आता उघड झाले आहे.

अजित पवार यांच्या या खेळीची कल्पना पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नवाब मलिक, छगन भुजबळ यांनाही माहित नाही. शरद पवार यांच्याशी बोलूनच आम्ही पुढील भूमिका स्पष्ट करू असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे शरद पवार यांनी ट्विटद्वारे जाहीर केले आहे.

संजय राऊत यांनीही अजित पवारांवर तोफ डागली आहे. राऊत म्हणाले की,  अजित पवारांनी जे केलं आहे त्याच्याशी शरद पवारांचा काहीही संबंध नाही. पवार व उद्धव ठाकरे यांच्यात बोलणे झाले आहे. ते दोघे आज भेटतील. आज एकत्र पत्रकार परिषदही घेतील. अजित पवार काल आमच्याबरोबर होते. त्यांची बॉडी लॅग्वेज संशयास्पद होती. ते आमच्या व पवारांच्याही लक्षात आले होते. त्यांचा फोन बंद होता. ते वकिलाकडे बसले होते असे सांगण्यात आले. ते कोणत्या वकिलांकडे बसले होते ते आता समजले. ईडीच्या प्रकरणात शरद पवार यांची लोकप्रियता महाराष्ट्रात शिखरावर पोचली. तेव्हाच अजित पवार यांच्या मनात काळंबेरं सुरू झाले. अजित पवारांनी शरद पवारांना दगा दिला. फडणवीस म्हणायचे, अजित पवारांची जागा ऑर्थर रोड जेलममध्ये आहे. पुढची कॅबिनेट बैठका ऑर्थर रोड जेलमध्ये घेणार आहात का. महाआघाडीमुळे देशातील वातावरण बदलणार होते. पण अंधारात पाप केले गेले. ढाका घातला गेला.

संजय राऊत आता तरी बोलणं बंद कर. शिवसेनेची वाट लावली. पाठित खंजीर खुपसल्याचे तुम्हाला सोबत नाही. आम्ही मातोश्रीवर जात असायचो. संजय राऊत तुम्ही शिवसेनेची, महाराष्ट्राची वाट लावली. आता तरी गप्प बसा.

– चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष

 

संजय राऊत पुढे म्हणाले की, अजित पवार काल रात्री 9 वाजेपर्यंत आमच्यासोबत होते. आम्हाला सूचनाही करीत होते. अचानक ते गायब झाले. मला त्यांचा संशय आला होता. ते नजरेत नजर घालून बोलत नव्हते. भाजपने राजभवनाचा गैरवापर केला. सत्ता, पैसा व मस्तीचा भाजपने गैरवापर केला. देशाला त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. अंधारात चोरी केली आहे. अंधारात शपथ दिली गेली. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी शिवाजी महाराजांचे नाव बदनाम केले. अजित पवारांबरोबर गेलेल्या लोकांनी गद्दारी केली आहे. यांना राज्यात फिरू देणार नाही.

अजित पवार यांच्याशी काल रात्री बैठकीतच बोलणे झाले होते. त्यांच्याशी माजे नॉर्मल बोलणे झाले होते. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा हा घोळ लवकर संपला पाहीजे असे अजितदादा म्हणत होते.

– जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार फुटेलला नाही. आमदार फुटल्याच्या चर्चेत तथ्य नाही .

– जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

अजित पवार म्हणाले, मी शरद पवारांना सांगत होतो…

भाजपसोबत अजित पवारांनी घरोबा केला. यासाठी शरद पवार यांचा पाठिंबा होता का असा प्रश्न अजित पवार यांना विचारला असता ते म्हणाले की, सुरूवातीला पवार साहेबांना हे माहित होतं. त्यानंतर मी त्यांना सांगत होतो की, स्थिर सरकार द्यायला हवे. शिवसेनेसोबत काँग्रेस, राष्ट्रवादीची सुरू असलेली चर्चा संपतच नव्हती. त्यामुळे मी या ठिकाणी स्थिर सरकार देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला. भाजपसोबत जाण्यासाठी शरद पवार यांचा पाठिंबा आहे किंवा नाही याबाबत मात्र अजितदादांनी काहीही वक्तव्य केलेले नाही. परंतु मी पवार साहेब यांना सांगत होतो एवढेच सुचक विधान अजितदादांनी केले आहे.

अजितदादा म्हणाले की, 24 तारखेला निकाल लागला. पण अजूनही सरकार स्थापन झालेले नाही. सरकार लवकर स्थापन होत नव्हते. सरकार लवकर स्थापन केले तरच शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या जातील. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीमधील वेगवेगळ्या चर्चा संपत नव्हत्या. नुसतीच चर्चा होत होती. नको त्या गोष्टींची मागणी वाढत होती. असे असेल तर स्थिर सरकार कसे होणार. त्यामुळे आम्ही स्थिर सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. लोकांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. महाराष्ट्राला चांगला कारभार देऊ. मी पवार साहेबांनाही सांगत होतो. स्थिर सरकार देण्याबाबत निर्णय घेणे गरजेचे होते.

अजितदादा रात्री उशिरापर्यंत काँग्रेस नेत्यांबरोबर होते

महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करण्याबाबतची शेवटची चर्चा शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चालू होती. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे प्रमुख नेते या बैठकीला होते. उद्धव ठाकरे, शरद पवार, अहमद पटेल, मल्लिकार्जून खर्गे, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील हे सगळे नेते उपस्थित होते. अजितदादा पवार सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमत झाले. परंतु विधानसभेच्या अध्यक्षपदारून काँग्रेस व राष्ट्रवादीची रस्सीखेच सुरू होती. चर्चेदरम्यान शरद पवार घरी निघून गेले. त्यानंतर उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेही निघून गेले. नंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचीही उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. या चर्चेत अजितदादा पवार सुद्धा होते. जवळपास 9 वाजेपर्यंत अजितदादा पवार काँग्रेसच्या नेत्यांसोबत होते. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना स्वप्नातही वाटले नाही की, उद्या सकाळी अजित पवार भाजपच्या तंबूत गेलेले असतील.

हे सुद्धा वाचा

धक्कादायक बातमी : देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी घेतली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ : भाजप, राष्ट्रवादी एकत्र

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी