30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeटॉप न्यूजधक्कादायक बातमी : देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी घेतली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ...

धक्कादायक बातमी : देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी घेतली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ : भाजप, राष्ट्रवादी एकत्र

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : देशातील राजकीय क्षेत्रात धमाका उडवून देणारी अनपेक्षित घडामोड आज सकाळी घडली आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या हालचाली सुरू असतानाच भाजपने मोठी खेळी केली आहे. रातोरात मोठे राजकारण घडून आले आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. स्वप्न असल्याप्रमाणे भाजपने अजित पवारांना सोबत घेऊन धमाका उडवला आहे.

सकाळी 8 वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी फडणवीस व पवार यांना शपथ दिली. फडणवीस व पवार या दोघांनीच शपथ घेतली आहे. कुणाच्या स्वप्नातही नसताना रातोरात राजकीय घडामोड घडली, आणि भाजप व राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले आहे. शरद पवार यांनीच ही खेळी केली असल्याच्या चर्चेला आता उधाण आले आहे. गेल्या आठवड्यात शरद पवार हे नरेंद्र मोदी यांना भेटले होते. त्यावेळीच सरकार स्थापन करण्याबाबत हा ‘खेळ’ रंगवला गेला असेल असे बोलले जात आहे.

दुसऱ्या बाजूला अशीही चर्चा रंगली आहे की, शरद पवारांना विचारत न घेताच अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा एक गट फोडून भाजपला पाठिंबा दिला असू शकेल.

शपथविधीनंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, 24 तारखेला निकाल लागला. अजून सरकार स्थापन झाले नाही. सरकार लवकर स्थापन होत नव्हते. सरकार लवकर स्थापन केले तरच शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या जातील. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीमधील वेगवेगळ्या चर्चा संपत नव्हत्या. नुसतीच चर्चा होत होती. नको त्या गोष्टींची मागणी वाढत होती. असे असेल तर स्थिर सरकार कसे होणार. त्यामुळे आम्ही स्थिर सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. लोकांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. महाराष्ट्राला चांगला कारभार देऊ. मी पवार साहेबांनाही सांगत होतो. स्थिर सरकार देण्याबाबत निर्णय घेणे गरजेचे होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमचे नेते नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे मी आभार मानतो. जनतेने शिवसेनेला व आम्हाला स्पष्ट बहुमत दिले होते. पण शिवसेनेने ते मानले नाही. ते इतर पक्षांच्या सोबत गेले. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली. खिचडी सरकार स्थापन करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता. हे चांगले नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांच्या सोबतीने सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. इतरही काहीजण आमच्या सोबत आहेत. आम्ही सरकार स्थापन करण्याबाबत राज्यपालांना भेटलो. त्यांनी बहुमताची खातरजमा केली. राष्ट्रपतींना कळवले. राष्ट्रपतींनी मग राष्ट्रपती राजवट उठविण्याचा निर्णय घेतला, आणि सत्ता स्थापन केली आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्यासोबत निर्णय घेतला आहे. परंतु शरद पवारांच्या पाठिंब्यानेच अजितदादांनी ही खेळी केली आहे किंवा नाही याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी