31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादीला ‘छिन्न विछिन्न’ म्हणणाऱ्या फडणवीसांना शरद पवारांनी दाखविली आपली ‘पॉवर’

राष्ट्रवादीला ‘छिन्न विछिन्न’ म्हणणाऱ्या फडणवीसांना शरद पवारांनी दाखविली आपली ‘पॉवर’

आम्ही तेल लावून मैदानात उतरलो आहे, पण समोर पैलवानच नाही. राष्ट्रवादीची अवस्था छिन्न विछिन्न झाली आहे. राष्ट्रवादीत कुणी राहायला तयार नाही. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, कोही बचे तो मेरे पिछे आओ अशी शरद पवारांची अवस्था झाली आहे. पवारांचे राजकारण आता संपले आहे… हे शब्द आहेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे. विधानसभा निवडणुकीपूर्वी फडणवीसांनी पवार यांची खिल्ली उडविली होती. निवडणुकीनंतर मात्र पवारांनी आपली ‘पॉवर’ फडणवीसांना दाखवून दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20 सुद्धा जागा निवडून येणार नाहीत. काँग्रेसची अवस्था तर त्यापेक्षाही वाईट होईल. भाजप व शिवसेना युतीला 220 पेक्षा जास्त मिळतील. एकट्या भाजपला 160 जागा मिळतील, अशा कांड्या निवडणूक काळात फिरवल्या गेल्या होत्या. सगळ्याच वृत्तवाहिन्यांचे ‘एक्झिट पोल’सुद्धा भाजपचेच तळी उचलणारे होते. पण निवडणुकीचे निकाल लागले अन् पवारांनी दिलेला ‘जोर का झटका’ भाजपला हळूच लागला. राष्ट्रवादी काँग्रेस 54, तर काँग्रेस 44 जागांवर जाऊन ठेपली. भाजपचे घोडे 105 जागांवर अडले, शिवसेनेला राष्ट्रवादीपेक्षा अवघ्या दोन जागा जास्त म्हणजे 56 जागा मिळाल्या. सर्वात जास्त जागा असूनही भाजपच्या नेत्यांचे चेहरे पडले, तर कमी जागा मिळूनही काँग्रेस व राष्ट्रवादीचा विजय झाल्यासारखी निकालानंतरची परिस्थिती होती.

राष्ट्रवादीला ‘छिन्न विछिन्न’ म्हणणाऱ्या फडणवीसांना शरद पवारांनी दाखविली आपली ‘पॉवर’

भाजपच्या मनसुब्यावर त्यानंतर पाणी फेरायचे काम केले ते शिवसेनेच्या नाराजीने. मुख्यमंत्रीपद अडिच वर्षे आणि सत्तेत 50 टक्के वाटा ही मागणी शिवसेनेने केली. भाजपबरोबर झुंजण्यासाठी कोणाचा तरी खमका आधार हवा होता. शिवसेनेला हा आधार दिला शरद पवार यांनी. भाजपसोबत काडीमोड घेण्याअगोदर शिवसेनेच्या संजय राऊतांनी पवार यांच्या अनेकदा भेटी घेतल्या. या भेटीत पवारांनी महत्वाचा कानमंत्र दिला असेल, हे सांगायला नकोच. भाजपने राज्यपालांच्या आडून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची खेळी केली आहे. पण शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत येणार हे आता स्पष्ट झाले आहे. दुसऱ्या बाजूला ज्या फडणवीसांनी पवारांना डिवचले त्या फडणवीसांच्या राजकीय करिअरवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेत पुन्हा आले नाही, तर पक्षापेक्षा फडणवीसांचेच व्यक्तीगत नुकसान अधिक होणार आहे. कारण अपयशाचे खापर त्यांच्याच माथी फुटणार आहे. भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत गेला तर पुढच्या काळात अन्य नेतृत्वालाही भाजपमध्ये संधी मिळू शकते.

राष्ट्रवादी व काँग्रेसने केलेले कमबॅक केवळ शरद पवार यांच्या करिष्म्यामुळेच साध्य झाले. निवडणुकीपूर्वी भाजपचे सगळे नेते हवेत असताना पवार मात्र शांतपणे आपल्या खेळी खेळत होते. पवारांनी पहिली खेळी खेळली ती कोल्हापुरात. कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांत महापुराने थैमान घातले होते. त्यावेळी भाजपचे सगळे नेते महाजनादेश यात्रेत मश्गूल होते. गिरीष महाजन कोल्हापुरला गेले, अन् सेल्फी काढून आले. फडणवीसांनी हवेतून पाहणी केली. कोल्हापुरचेच असलेले चंद्रकांतदादा पाटील यांनाही उशिराने सवड मिळाली. पवार मात्र पुराने बाधित झालेल्या गावोगावी फिरत होते. लोकांना दिलासा देत होते. अधिकाऱ्यांनाही मार्गदर्शन करीत होते. 80 वर्ष वय असलेले पवार लोकांच्या संकट काळात त्यांच्या पाठिवर हात ठेवत होते. 15 ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन सुद्धा पवारांनी पुरग्रस्तांसोबत राष्ट्रध्वजाला सलामी देऊन साजरा केला होता.

त्यानंतर पवारांनी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण व पश्चिम महाराष्ट्र अशा भागांत दौरा काढला. जोरदार प्रचार सभा घेतल्या. त्यांच्या प्रचार सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होतो. प्रत्येक सभेला तरूणांचे जत्थेच्या जत्थे येत होते. पवारांना जनतेकडून असा प्रतिसाद मिळत असताना राष्ट्रवादीचा एकेक नेता भाजपमध्ये प्रवेश करीत होता. भ्रष्टाचारी व राजकीय स्वार्थ असलेले नेते भाजपच्या वळचणीला जाऊ लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेस फोडायचे काम फडणवीस करीत होते. तरीही पवार डगमगले नाहीत. पक्षातील अन्य नेते – अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, अमोल मिटकरी, नवाब मलिक किल्ला लढवित होतेच. पण स्वतः शरद पवारही रणांगणात उतरले होते. त्यांच्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांना बळ मिळालेच, शिवाय जनतेनेही त्यांना डोक्यावर घेतले. पवारांचा फायदा काँग्रेसलाही झाला.

हे सगळे चालू असताना भाजपने पायावर दगड पाडून घेतला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्यात पवारांचेही नाव गोवले. पवार त्या बँकेचे साधे सदस्यही नाहीत. तरीही त्यांचे नाव आले. त्याबाबत चक्क एक प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले, आणि ते प्रसारमाध्यमांपर्यंत पोचेल अशी व्यवस्था करण्यात आली. हा सगळा खेळ अत्यंत केविलवाणा होता. ईडीचे नाव काढले की, सगळे नेते डगमगायचे. पवार मात्र बिल्कूल डगमगले नाही. मी स्वतःहूनच ईडीच्या कार्यालयात जातो असे त्यांनी सांगून टाकले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. भाजपविरोधात सामान्य लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. स्वतः पोलीस आयुक्तांनी पवारांची भेट घेऊन ईडीच्या कार्यालयात जाऊ नका, अशी विनंती केली. हे ईडीअस्त्र भाजपवर चांगलेच उलटले.

साताऱ्यामध्ये पवारांनी भर पावसांत केलेले भाषण सामान्य जनतेच्या काळजाला हात घालून गेले. या भाषणाने मोठी कमाल केली. उदयनराजे भोसले यांचा दारूण पराभव झाला. सातारा हा उदयनराजे यांचा नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध झाले.

सोशल मीडियावर एक मेसेज सतत व्हायरल होत आहे. ‘भाजपने पवारांचे नेते फोडले, पण पवारांनी तुमची महायुतीच फोडली’. हा मेसेज केवळ विनोद नसून वस्तुस्थितीच आहे. निवडणूक प्रचारात फडणवीस व अमित शाह पवारांवर आरोप करीत होते, आणि पवारांना मात्र या आरोपांचा राजकीय फायदा होत होता. पवार आपली एकेक चाल खेळत होते. ही चाल ओळखायला फडणवीस यांना फार उशीर झाला एवढे मात्र खरे. खरे पैलवान आपणच असून अजूनही उत्तम कुस्ती खेळतो हे पवारांनी फडणवीसांना दाखवून दिले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी