30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयउद्धव ठाकरेंनी ठणकावले, हा देश भाजपची मक्तेदारी नाही

उद्धव ठाकरेंनी ठणकावले, हा देश भाजपची मक्तेदारी नाही

टीम लय भारी

मुंबई : स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान देवून, लाठ्या काठ्या खावून १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य दिले. हे स्वातंत्र्य भाजपसाठी मिळवून दिले नव्हते. हा देश म्हणजे भाजपची मक्तेदारी नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला ( Uddhav Thackeray attacks on BJP ).

संघ विचारसरणी मानणाऱ्यांच्या डोक्यात मेंदू असेल तर त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचे आजचे भाषण ऐकावे. हिंदूत्व म्हणजे, पुजा आर्चा करणे एवढेच नव्हे. शिवसेनाप्रमुखांनी जे हिंदूत्व शिकविले आहे, तेच हिंदूत्व मोहन भागवतांनीही सांगितल्याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे ( Uddhav Thackeray appealed to listen Mohan Bhagwat’s speech ).

कंगना राणावत, अर्णव गोस्वामी व मुंबई पोलिसांवर आरोप करणाऱ्यांची उल्लेख न करता उद्धव ठाकरे यांनी खरडपट्टी काढली. महाराष्ट्राची बदनामी सहन करणार नाही. केवळ शिवसेनाप्रमुखांचा पुत्र म्हणून शिवसैनिक गप्प आहेत. ते गप्प बसले नाही तर काय होऊ शकते याची कल्पना करून बघा असेही त्यांनी ठणकावले ( Uddhav Thackeray attacks on Kangana Ranaut, Arnav Goswami ).

जीएसटीप्रणाली फसलेली आहे. त्यामुळे जुनी करप्रणाली पुन्हा लागू करण्यासाठी सर्व राज्यांनी एकत्र यावे असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

भाजपने संधी गमावली

काश्मिरपासून केरळपर्यंत सत्ता स्थापन करण्याची भाजपची महत्वकांक्षा आहे. यात यश आलेही असते. पण भाजपने त्यांच्या वृत्तीमुळे ही संधी गमावली आहे.

भाजपने स्वतःच्या मस्तीने लोकांची नाराजी ओढवली आहे. सत्तेवर कुणी आले तरी चालेल पण भाजप नको, असे आता जनतेला वाटू लागले आहे.

हरियाणामध्ये कुलदीपसिंग बिष्णोई हे पुढचे मुख्यमंत्री असतील अशी निवडणुकीआधी घोषणा केली होती. आता नितीशकुमारांच्या बाबतीत ही घोषणा केली जात आहे. पण बिष्णोई यांना जसे बाजूला सारले तसे नितीशकुमारांना बाजूला सारतील. महाराष्ट्रात सुद्धा हाच डाव खेळण्याचा प्रयत्न केला होता.

सन २०१४ व सन २०१९ मध्ये शिवसेनेसोबत असेच केले. शिवसेनाप्रुखांकडून आपण शिकलो आहे. कुणाच्या पाठीत वार करायचा नाही, आणि कुणी वाटेला गेला तर त्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहत नाही.

शिवरायांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, ‘मी शत्रूला दगा दिला. पण मित्राला दगा दिला नाही’. पण भाजप मित्रांना दगा देते. एनडीएमधून आम्ही बाहेर पडलो. अकाली दल बाहेर पडले. एकनाथ खडसे बाहेर पडले. मोहन भागवतांना राष्ट्रपती करा असे आम्ही यापूर्वी म्हणालो आहे. पण तुम्हाला शिवसेना नको झाली.

संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांच्या गळ्यात गळा घालत आहात. सन २०१४ मध्ये नितीशकुमार पंतप्रधान सेक्यूलर हवा असे म्हणून एनडीएमधून बाहेर पडले होते. पण भाजपसोबतच त्यांनी परत सत्ता स्थापन केली. नितीशकुमारांनी हिंदूत्व स्विकारले की, भाजप सेक्यूलर झाला याचे उत्तर पत्र खरडणाऱ्यांनी द्यावे असा टोला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नाव न घेता ठाकरे यांनी हाणला ( Uddhav Thackeray scathing to Bhagat singh Koshyari ).

भाजपला लाज वाटायला पाहीजे

बिहारमध्ये लस फुकट वाटण्याची घोषणा करता. तुम्हाला लाज वाटायला हवी. जीएसटीचे आमचे पैसे घेता आणि ते बिहारमध्ये वाटता असा सवालही त्यांनी केला.

आहेराची पाकिटे पळवणारे नरेंद्र मोदी

लग्न काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत केले, अन् पैसे बापाकडे ( नरेंद्र मोदी ) मागता अशा आशयाचे विधान रावसाहेब दानवे यांनी केले होते. त्याचाही समाचार ठाकरे यांनी भाषणात केला.

‘ते’ तुमचे बाप असतील. भाडोत्री बाप स्विकारण्याची मला गरज नाही. माझा बाप ( बाळासाहेब ठाकरे ) इथेच आहे. लग्न आम्ही जरूर केले. पण आहेराचे पाकिटे पळवणारे (नरेंद्र मोदी ) आहेत. आहेर मोजायला दिला, आणि सगळेच पैसे घेऊन गेले, अशा शब्दांत जीएसटीच्या निधीवरून त्यांनी टोला हाणला.

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा

‘महाविकास आघाडी’ सरकार सत्तेवर आल्यापासून ते पाडण्याची अनेकजण स्वप्ने बघत आहेत. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. आम्ही गुळाला चिटकलेले मुंगळे नाही. आमचे सरकार पाडण्याऐवजी तुमचे सरकार सांभाळण्याची काळजी घ्या असा सल्ला ठाकरे यांनी दिला ( Uddhav Thackeray challenged to BJP leaders ).

महाराष्ट्र, मुंबई पोलिसांची बदनामी सहन करणार नाही

रावणाला दहा तोंडे आहेत. त्यातील एक तोंड ( कंगना राणावत ) बडबडले, मुंबईची पाकव्याप्त काश्मिरसारखी अवस्था झाली आहे. बिहारच्या सुपुत्राची आत्महत्या झाली म्हणून मुंबई पोलीस, महाराष्ट्राची बदनामी केली. सरकारवर, आदित्यवर चिखलफेक केली. महाराष्ट्राची अशी बदनामी आम्ही सहन करणार नाही.

जगात कोणतेही पोलीस खाते असे नाही की, ज्यांनी जिवंत अतिरेक्याला पकडले. हे काम फक्त मुंबई पोलिसांनीच केले आहे. त्यासाठी तुकाराम ओंबळे यांना बलिदान द्यावे लागले. मी महाराष्ट्राचा व मुंबई पोलिसांचा पालक आहे. अशी बदनामी बिल्कूल सहन केली जाणार नाही.

महाराष्ट्राच्या आड येणाऱ्यांच्या छाताडावर जावून पुढे जाणारा महाराष्ट्र आहे. एक बेडूक आणि त्याची दोन पिल्लं एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात असतात. बेडकाच्या पिलांनी वाघ पाहिला. ते आपल्या बापाला वाघाचे वर्णन करून सांगत आहेत, असे ठाकरे यांनी नारायण राणे यांचे नाव न फटकारले.

मी फेसबुक लाईव्हवरून लोकांशी बोलत असतो. मुख्यमंत्रीपदाचा मास्क बाजूला ठेवून बोलेन असे म्हटले होते. म्हणून मी पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री म्हणून बोलणार आहे. पण संयमाने बोलणार आहे.

शिवसेनेवर आळ घेतले जात आहेत. आरोप केले जात आहेत. चारित्र्यहणन केले जात आहे. तरीही शिवसेना गप्प का आहे असे अनेकजण म्हणत आहेत.

शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून शिवसैनिक माझे ऐकत आहेत. त्यांनी ऐकले नसते तर आरोप करणाऱ्यांचे काय झाले असते असा सवालही ठाकरे यांनी केला. ज्या महाराष्ट्राच्या मातीने औरंगजेब, अफजलखानाला गाडला. त्या महाराष्ट्राची माती तितकीच मजबूत आहे.

मुंबईत गांजाची शेती पिकवली जाते का ?

महाराष्ट्र पुढे जातोय. पण काहीजण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था नाही. मुंबई पोलीस निकम्मे आहेत. इकडे नशिले आहेत. शिवाजी पार्कवर गांजाची शेती फुलली जात आहे. अशा थाटात बदनामी करीत आहेत. एकजणाने आत्महत्या केली. तो बिहारचा पुत्र होता. त्यात काही काळेबेरे असते तर मुंबई पोलिसांनी सोधून काढले असते. पण तोंडात शेण भरून तुम्ही आमच्यावर गोमुत्र टाकले.

शेण व गोमुत्राने भरलेले तोंड आता गप करायची वेळ आली आहे. स्वतः शेण खायचे आणि आमच्यावर थुंकायचे. महाराष्ट्रद्वेष करणारी ही औलाद आहे. हे देश संपविण्यासाठी निघाले आहेत. पण महाराष्ट्राच्या बाबतीत हे आम्ही होऊ देणार नाही. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. आम्ही शांत आहोत पण षंड नाहीत.

हिंदूत्व म्हणजे काय ?

मंदीरे उघडली जात नाहीत म्हणून टीका केली जात आहे. पण पुजाआर्चा म्हणजे हिंदूत्व नाही असे मोहन भागवत यांनी आजच स्पष्ट केले आहे. तुम्ही वाघाला डिवचले तर वाघ फटका मारणारच. बाबरी पाडली त्यावेळी आताचे हिंदूत्वावर बोलणारे शेपट्या घालून बसले होते. आमचे हिंदूत्व सेक्यूलर झाले म्हणून विचारतात. देवळात घंटा बडवणे, ‘कोरोना’ आला की थाळ्या बडवमे हे तुमचे हिंदूत्व असेल. बेडूक उड्या, दोरीच्या उड्या मारणे म्हणजे हिंदूत्व नाही. ‘माय मरो आणि गाय जगो’ हे आमचे हिंदूत्व नाही.

आज तुमच्या राज्यात ( उत्तर प्रदेश ) माया – बहिणींवर अत्याचार केला जातो. त्यांची रक्षा करा. आम्हाला गो हत्येचा कायदा करा म्हणून सांगता, मग गोव्यात का नाही मागणी करीत ? असे ठाकरे यांनी विचारले.

मोहन भागवतांनी सांगितलेले हिंदूत्व आत्मसात करा

सकाळी मोहन भागवतांनी देशाला उद्देशून भाषण केले. काळी टोपी घातलेल्यांना ( संघ व भाजप ) डोकं असेल तर सरसंघचालक यांनी हिंदू, हिंदूत्व, हिंदू राष्ट्राबद्दल कसा भ्रम पैदा केला जात आहे, हे सांगितले आहे. त्यांनी मोलाचे भाषण केले आहे. शिवसेनाप्रमुखांना अपेक्षित असलेले हिंदूत्व भागवत यांनी सांगितले आहे.

संघाच्या राजकीय शाखेने ( भाजपने ) हे भाषण ऐकायला हवे. राजकारण म्हणजे शत्रूत्व नव्हे, विवेक पाळा असेही सरसंघचालकांनी सांगितले आहे.

टोपीखालच्या मेंदूनुसार हिंदूत्व म्हणजे काय हे सरसंघचालकांच्या भाषेत समजून घ्या. शिवसेना व शिवसैनिक नसते, तर मुंबई वाचली नसती. मग तुम्ही आज आम्हाला हिंदूत्व सांगत आहात. जेवढे पक्षाकडे लक्ष देता, तेवढे लक्ष देशाकडेही द्या असा चिमटा ठाकरे यांनी काढला.

‘महाविकास आघाडी सरकार’चे काम जनतेसमोर मांडणार

नरेंद्र मोदी प्रचंड काम करतात. तेवढे उद्धव ठाकरे यांनी करावे असे काहीजण बोलतात. पण काम करणे म्हणजे भोवऱ्यासारखे फिरणे नव्हे. ‘महाविकास आघाडी सरकार’ने ‘कोरोना’ काळातही अवघ्या वर्षातच प्रचंड काम केले आहे. या कामाचा लेखाजोखा पुढच्या महिन्यात मी राज्यासमोर ठेवणार आहे, असेही ठाकरे म्हणाले.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करायची आहे, पण केंद्र सरकार राज्याचे पैसे देत नाही

मी राज्याच्या दौऱ्यावर गेलो होतो. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तरीही आम्ही मदत करीत आहोत. आणकी मदत करायची आहे. पण पैसे आणायचे कुठून ? जीएसटीचे २८ हजार कोटी व इतर १० हजार कोटी असे ३८ हजार कोटी केंद्राकडे आहेत. हे महाराष्ट्राचे हक्काचे पैसे आहेत. हे पैसे दिलेच जात नाहीत.

पैसे मागितले तर सांगतात, कर्ज उभारा. का म्हणून आम्ही कर्ज उभारायचे. जीएसटीचे पैसे देणार नसतील, तर सगळ्या राज्यांनी केंद्राविरोधात एकत्र यावे असे मी आवाहन करतो. जीएसटीची पद्धत फसलेली आहे. पंतप्रधानांनी चूक मान्य करून पुन्हा जुन्या करप्रणालीवर जावे, असे ते म्हणाले.

काश्मिरची एक इंच जमीन तरी घ्या

रावणाच्या दहा तोंडांपैकी एक तोंड मुंबईला पाकव्याप्त काश्मिर म्हणाले. नरेंद्र मोदी बोलले होते, पाकव्याप्त काश्मिर भारतात आणून दाखवू. पाकव्याप्त काश्मिर सोडा. पण जे भारतात काश्मिर आहे तेथील ३७९ कलम तुम्ही हटविले. आता तेथील एक इंच जमीन अधिकारात आणून दाखवा. मुंबईत राहाता आणि तोंड वर करून बोलता.

हजारो कोटींचे करार

‘कोरोना’ काळात बिकट स्थिती असताना आपण अनेक कंपन्यांसोबत हजारो कोटींचे करार करीत आहोत. भाजपने सुद्धा करार केले होते. काय झाले त्याचे ?

आम्ही भूमिपुत्रांसाठी हे करार करतोय. मराठी मातीतील कुशल – अकुशल माणसांना रोजगार देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.

भाजपने महाराष्ट्राच्या मातीशी इमान राखावे

भाजपने किमान या मातीशी तरी इमान ठेवावा. महाराष्ट्रहिताच्या निर्णयाचे फटाके वाजवू नका पण खोटे तरी बोलू नका.

शहरामध्ये जंगल राखण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले. आरे कारशेडला स्थगिती दिली. कांजूरमार्गची जमीन आपण मेट्रोसाठी दिली आहे. कारशेड कांजूरमार्गला झाल्यामुळे मुंबईच नाही तर कल्याण, अंबरनाथकडे जाणाऱ्या मेट्रो मार्गांनाही फायदा होणार आहे.

विलासी राजा, आणि त्याची कळसूत्री बाहुल्या

विलासी राजा, आणि त्यांची अहंकारी मुलं अशी आमची बदनामी केली जाते. पण तुमच्याविषयी काय बोलायचे. ‘विलासी राजा आणि त्याच्या कळसूत्री बाहुल्या.’ या कळसूत्री बाहूल्यांचा खेळ महाराष्ट्राने संपविला आहे. इकडे मर्द मावळ्यांची सत्ता आली आहे.

भाजपला सरकारे पाडण्यात स्वारस्य

देशात विचित्र स्थिती आहे. ‘कोरोना’च्या स्थितीत देशाची अर्थव्यवस्था सुधारणे गरजेचे आहे. पण त्याकडे हे वेळ देत नाहीत. पण सरकार पाडण्यात हे लक्ष घालत आहेत.

पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये चीनच्या घुसखोरीबद्दल विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे विचारणा केली होती. त्यावेळी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे सांगितले होते. मग आता ‘कोरोना’च्या बाबतीत तुम्ही राजकारण का करीत आहात असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

मराठा, धनगर, ओबीसींना न्याय देणार

मराठा, धनगर व ओबीसी समाजाला मी आवाहन करतो की, हे तुमचे सरकार आहे. तुम्हाला मी न्याय देणार आहे. आदिवासी, धनगर, ओबीसी, मराठे सगळ्यांनाच न्याय देवू. कुणाचेही नुकसान न होता हा न्याय दिला जाईल. पण हात जोडून एक विनंती करतो. जातीपातीच्या भिंती तयार करून महाराष्ट्राची एकजूट फोडण्याचा काहीजण प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांना कुणी बळी जावू नका. तुम्ही शिवरायांचे मर्द मराठे आहात. महाराष्ट्राच्या एकजुटीला तडे जाणार नाहीत, याची काळजी घ्या, असेही शेवटी त्यांनी आवाहन केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी