25 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींची तुलना हिटलर, मुसोलिनीशी; आगापिछा नसलेले लोकही धोकादायक

उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींची तुलना हिटलर, मुसोलिनीशी; आगापिछा नसलेले लोकही धोकादायक

‘ज्यांना आगापिछा नाही असे लोकही धोकादायक असतात. हिटलर, मुसोलिनी, स्टॅलिन, पुनीत हे काही घराणेशाहीतून आले नाहीत’ असे दाखले देत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार प्रहार केला. या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची तुलना हिटलर, मुसोलिनी यांच्याशी केली. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर घराणेशाहीचे समर्थन केले. सगळीच घराणेशाही वाईट असतेच असे नाही. मला माझ्या पूर्वजांचा अभिमान आहे. कुटुंब व्यवस्था हा हिंदू संस्कृतीचा पाया आहे आणि हीच कुटुंबव्यवस्था तुम्ही मानत नसला तर तुम्हाला घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, असे खडे बोल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना ऐकवले.

भाजप विघ्नसंतोषी

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार तोंडसुख घेतले. भाजप हा विघ्नसंतोषी पक्ष आहे. आमंत्रण नसेल तरी कुणाच्याही लग्नात जातात. सगळ्यावर ताव मारतील आणि निघताना नवरा-बायकोत भांडण लावतील, अशी यांची वृत्ती आहे. भाजप ही पार्टी अशी आहे, जिथे जाते तिथे वाट लावते, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी भाजपवर केला. संघाचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता. मराठवाडाचा लढा आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत संघ कुठेही नव्हता. पण संयुक्त महाराष्ट्र समितीत सगळ्यात शेवटी जनसंघ सहभागी झाला आणि जागावाटपावरून सगळ्यात पहिला जनसंघ समितीतून बाहेर पडला.

नवा असूर ‘खोकासूर’

रावण शिवभक्त होता, तरीही त्याचा रामाला वध करावा लागला. कारण तो माजला होता. त्याने सीतेचे अपहरण केले होते. आपल्यालाही तसेच करायचे आहे. यांनी पक्ष चोरला आणि धनुष्यबाणही चोरले आहे. त्यामुळे त्यांच्या खोक्यांची लंका दहन करणार, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी यावेळी केला

जरांगे-पाटील यांचे कौतुक
मराठा आरक्षणासाठी जरांगे-पाटील समजूतदारपणे आंदोलन करत आहेत. आज त्यांनी धनगर समाजाला साद घातली आहे. आता या गद्दारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मराठा समाजाचा प्रश्न सोडवावा, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी सरकारला दिले. हे डायन सरकार आहे. आदेश दिल्याशिवाय पोलीस लाठीमार करणार नाही. उपोषणकर्ते मराठ्यावर कुणाच्या आदेशाने लाठीमार केला, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी समाजने आंदोलने करावीत, पण कुणीही आत्महत्या करू नका, असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी केले.

निर्लज्जन सदासुखी
आमदार अपात्रतेचा निकाल कधी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. असे असताना सर्वोच्च न्यायालय दरवेळी यांचे कानफाट फोडतेय तरीही हे निर्लज्जन सदासुखी आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला हा लवाद जुमानत नाही, हे सर्व काय चालले आहे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

…तर उलटे टांगू!

आज आम्हाला त्रास दिला जात आहे. पण आज त्रास देणाऱ्यांना सांगतो, आमचे सरकार आल्यावर तुम्हाला उलटे टांगू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी नेते, अधिकाऱ्यांना दिला.

खबरदार मुंबई तोडाल तर…

जो कोणी मुंबईला महाराष्ट्रातून तोडेल त्याच्या शरीराचे तुकडे आम्ही करू, असा इशारा उद्धव ठाकरेंनी या मेळाव्यात दिला. मुंबई तोडता येत नाही म्हणून दुसऱ्या मार्गाने मुंबईला लुटण्याचे काम सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. येथील कार्यालये मुंबईबाहेर हलवले जात आहेत. पालकमंत्र्यांचे कार्यालय मुंबई महापालिकेत कशाला? पण हे सर्व सुरू आहे. मुंबई महापालिका असताना नीती आयोगाची एन्ट्री कशाला? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

पीएमकेअर फंडाचीही चौकशी करा

कोरोनाकाळात ज्या महाराष्ट्राने अतुलनीय कामगिरी केली आता त्याची चौकशी केली जात आहे. मग चौकशीच करायची असेल तर एकट्या मुंबईचा का, नागपूरचीही करा, ठाण्याचीही करा! आणि हिंमत असेल तर पीएमकेअर फंडाचीही करा. इथल्या भाजप नेत्यांनीही राज्याच्या निधीऐवजी पंतप्रधान निधीला पैसा दिला होता, हे कसले त्यांचे महाराष्ट्रप्रेम?

कोरोनाकाळात महाराष्ट्राचे आरोग्य व्यवस्था उभारली त्यावेळी उत्तर प्रदेशात गंगेत प्रेते टाकली जात होती. गुजरातमध्ये प्रेते जाळली जात होती. जेव्हा तुमचे नेते थाळ्या बडवायला सांगत होते त्यावेळी आमचे सरकार ५ रुपयांत पोट भरून जेवणाची थाळी देत होते. तुम्ही मंदिरे उघडायला सांगत होतात तेव्हा आम्ही गावागावात आरोग्य मंदिरे उघडत होतो, तपासणी वाढवत होतो, उपचार करत होतो आणि हेच आमचे हिंदुत्व आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ते गद्दारच!

ज्यांनी शिवसेना फोडली ते गद्दारच. त्यांच्यावरील गद्दार हा शिक्का कधीही पुसला जाणार नाही. छत्रपतींच्या भगव्याशी गद्दारी करणाऱ्याला महाराष्ट्रात शिल्लक ठेवू नका, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी केले. त्याचवेळी देशाची गुपिते हनी ट्रॅपमध्ये शत्रूंना विकणाऱ्या कुरुलकराबद्दल संघ आणि भाजपची भूमिका काय, हे अजून स्पष्ट झालेलं नाही, याकडेही उद्धव ठाकरेंनी लक्ष वेधले.

सर्व निवडणुका एकत्र घ्या!

सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी लोकसभेसह विधानसभा आणि मुंबई महापालिकेचीही निवडणूक एकत्र घ्यावी. पण हे सरकार घाबरट आहे. त्यांनी निवडणूक घेणे दूरच विद्यापीठांच्याही निवडणुका पुढे ढकलल्या. त्यामुळे या सरकारकडून कोणती अपेक्षा करावी.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी