33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयपक्ष चालवण्यासाठीच उध्दव ठाकरेंचा जन्म, ते प्रशासन चालवण्यासाठी जन्माला आलेले नाहीत

पक्ष चालवण्यासाठीच उध्दव ठाकरेंचा जन्म, ते प्रशासन चालवण्यासाठी जन्माला आलेले नाहीत

उध्दव ठाकरे प्रशासन चालवू शकत नसल्याचे चंद्रकांत पाटील यांचे टीकास्त्र

टीम लय भारी

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रशासन चालवण्यासाठी जन्माला आलेले नाहीत. ते पक्ष चालवण्यासाठीच जन्माला आलेले आहेत. पक्ष चालवणं आणि प्रशासन चालवणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, असं मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कामावर टीका केली.

जे खेचून नेतो, तो नेता, अशी नेत्याची सर्वसाधारण व्याख्या आहे. पण उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तसं होताना दिसत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी वीज बिल वाढीच्या विषयाचा संदर्भ दिला. ‘वीज बिलात सवलत देण्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भूमिका होती. त्यांनी त्यासाठीची फाईल अर्थमंत्री अजित पवारांकडे पाठवली. निधी नसल्याचं म्हणत अजित पवारांनी ती फाईल मागे पाठवली. या ठिकाणी नेता म्हणून उद्धव ठाकरेंनी हस्तक्षेप करायला हवा होता. जनतेला दिलासा देणं आवश्यक आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणचे ५०० कोटी कमी करा. ते इथे वळवा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं होतं,’ असं पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली. ‘एखाद्या विषयाची माहिती घेण्याची, मंत्रिमंडळाला घेऊन एका दिशेनं जाण्याची गरज त्यांना वाटत नाही. कारण ते प्रशासन चालवण्यासाठी जन्मालाच आलेले नाहीत. ते पक्ष चालवण्यासाठी जन्माला आलेले आहेत. पक्ष चालवलं आणि प्रशासनाचा गाडा हाकणं हे पूर्णत: वेगळे विषय आहेत. प्रशासन चालवताना तुम्हाला प्रचंड वेळ द्यावा लागतो. अनेक जुने संदर्भ घ्यावे लागतात. सर्वोच्च न्यायालयाच्या १०० निर्णयांचा अभ्यास करावा लागतो किंवा त्याबद्दलची माहिती संबंधितांकडून घ्यावी लागते,’ असं पाटील यांनी सांगितलं.

प्रशासनाचा अनुभव आणि मनाची तयारी नसताना उद्धव ठाकरे थेट मुख्यमंत्री झाले, असंही ते पुढे म्हणाले. ‘बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष संघटनेकडे लक्ष दिलं. ते लोकांच्या समस्या ऐकायचे आणि संबंधितांशी संपर्क साधून त्यांना मदत करायला सांगायचे. त्यांनी लोकांना वेळ दिला. उद्धव ठाकरेंनी तोच वारसा चालवला. कोणत्याही प्रभागातून निवडून येऊ शकत असतानाही ते कधी नगरसेवक झाले नाहीत. आमदार, खासदार झाले नाहीत. प्रशासकीय अनुभव नसताना ते थेट मुख्यमंत्री झाले,’ असं पाटील म्हणाले. माझं उद्धव ठाकरेंशी वैयक्तिक भांडण नाही. उलट मैत्रीच आहे. मध्यंतरी विश्वासघात झाल्यानं फक्त आता भेटीगाठी कमी होतात, असं त्यांनी पुढे सांगितलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी