30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रCovid19 : सुप्रिया सुळेंचा नरेंद्र मोदींना सवाल : महाराष्ट्राचा फंड घेतलात, पण...

Covid19 : सुप्रिया सुळेंचा नरेंद्र मोदींना सवाल : महाराष्ट्राचा फंड घेतलात, पण तो महाराष्ट्रासाठीच वापरणार का ?

टीम लय भारी

मुंबई : प्रत्येक खासदाराला पाच कोटी रुपयांचा दरवर्षी MP Fund मिळत असतो. पण आता दोन वर्षांचा MP Fund ‘कोरोना’ आपत्तीसाठी ( Covid19 ) वापरला जाणार आहे. लोकसभा व राज्यसभेचे मिळून महाराष्ट्रातील ५५ ते ६० खासदार आहेत. या खासदारांचा निधी केंद्राने घेतला. परंतु या निधीचा वापर पुन्हा महाराष्ट्रासाठीच केला जाणार आहे का ? याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टीकरण द्यायला हवे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

सुप्रियाताई पुढे म्हणाल्या की, खासदार फंडाचा ( MP Fund ) वापर मतदार संघाच्या विकासासाठी आम्ही करीत असतो. माझ्या मतदारसंघात आरोग्यविषयक पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करीत आहे. त्यासाठी खासदार फंडाचा वापर करावा असे मी जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच सांगितले होते. पण आता हा सगळा फंड केंद्राने ‘कोरोना’साठी ( Covid19 ) वळविला आहे.

‘कोरोना’ ( Covid19 ) संकट मोठे आहे. त्यामुळे या निर्णयाला माझा विरोध नाही. या काळात केंद्राला निधीची गरज आहे. परंतु महाराष्ट्राच्या ५५ – ६० खासदारांचा घेतलेला हा निधी कुठे खर्च केला जाणार आहे. तो महाराष्ट्रासाठीच खर्च केला जाणार आहे का, एवढे तरी विचारण्याचा आमचा अधिकार आहे असे त्या म्हणाल्या.

पंतप्रधानांशी आमचे उद्या बोलणे होणार आहे. त्यावेळी आम्ही हा प्रश्न विचारणार आहोत. या अगोदरही केंद्राने महाराष्ट्राच्या वाट्याचा जीएसटीचा निधी पाठविलेला नाही. अडचणी सगळ्यांनाच असतात. केंद्रालाही अडचणी आहेत. महाराष्ट्र सरकारलाही अडचणी आहेत. आपत्तीमुळे महाराष्ट्र सरकारने आर्थिक पॅकेजची मागणी केली आहे. या सगळ्यावर पंतप्रधानांनी काहीतरी सांगितले पाहीजे.

महाराष्ट्राची आर्थिक घडी सुरळीत करण्यासाठी टास्क फोर्स नेमण्यास शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. महाराष्ट्र सरकार जसे काही प्रयत्न करीत आहे. तसे केंद्र सरकार काही करीत असल्यास त्याचीही माहिती लोकांना दिली पाहीजे.

‘मरकज’चे प्रकरण हाताळण्यात दिल्ली पोलिसांना जमले नाही

‘मरकज’चे आयोजकांनी वसई व औरंगाबाद या ठिकाणी परवानगी मागितली होती. परंतु महाराष्ट्र पोलिसांनी ती दिली नाही. पण दिल्ली पोलिसांनी ही परवानगी कशी काय दिली असा सवाल खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केला आहे.

दिल्लीत झालेल्या प्रकारामुळे मला वेदना झाल्या. दिल्लीमध्ये जेव्हा ट्रम्प आले तेव्हा तिथे दंगल झाली होती. त्याच आठ – दहा दिवसांच्या कालावधीत मरकजला परवानगी दिली गेली. वातावरण तंग असताना ही परवानगी कशी काय दिली गेली याचे मला आश्चर्य वाटते. महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा योग्य काम करीत आहे. दिल्लीच्या पोलीस प्रशासनाला हे का जमले नाही. त्यांचे लक्ष नक्की आहे कुठे ? याबाबत मी संसदेतही प्रश्न विचारणार आहे. आता टीका करण्याची ही वेळ नाही. टीका करण्यासाठी आयुष्य पडले आहे असे सुप्रियाताई म्हणाल्या.

सध्या एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे. ‘कोरोना’ची ( Covid19 ) आपत्ती हा राजकीय विषय नाही. मला राजकारण करायचे नाही. मलाही वॉट्सअपवर वादग्रस्त व उलटेसुलटे मेसेज येत होते. पण मी असले मेसेज फॉरवर्ड करीत नाही. कारण ही माणुसकीची वेळ आहे. एकमेकांचा हात धरून लोकांचे आयुष्य वाचविण्याची वेळ आहे. लोकांना सेवा देण्याची ही वेळ असे त्या म्हणाल्या.

या सगळ्या प्रकारात केंद्राच्याही काही चुका असतील. पण मी टीका करणार नाही. महाराष्ट्रातील राजकारणाने एवढी खालची पातळी गाठलेली नाही असे त्या म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

Covid19 : केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात धान्य, मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

Covid19 : ‘कोरोना’ संसर्ग सहज टाळणे शक्य ( डॉ. सुहास सुर्यवंशी )

Coronavirus : सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, वाचा संपूर्ण पत्र

कोरोनाचे ७७ हजार बळी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी