30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रThackeray government : एसटीवर आघात : जळगाव आणि रत्नागिरीत एसटी कर्मचा-यांच्या आत्महत्येने...

Thackeray government : एसटीवर आघात : जळगाव आणि रत्नागिरीत एसटी कर्मचा-यांच्या आत्महत्येने ठाकरे सरकार हादरले

टीम लय भारी

रत्नागिरी/जळगाव : पगार थकल्याने आर्थिक गर्तेत सापडलेल्या एसटीच्या दोन कर्मचा-यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली असतानाच या घटनेने राज्य सरकार (Thackeray government) खडबडून जागे झाले आहे. परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी एसटी कर्मचा-यांच्या खात्यात तातडीने एक महिन्याचे वेतना जमा करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.

Thackeray government : एसटीवर आघात : जळगाव आणि रत्नागिरीत एसटी कर्मचा-यांच्या आत्महत्येने ठाकरे सरकार हादरले

‘काळ जरी कठीण असला तरी, आत्महत्येसारखे अघोरी पाऊल कर्मचा-यांनी उचलू नये’, असे नमूद करत भावनिक साद अनिल परब यांनी कर्मचा-यांना घातली आहे व पगाराबाबतची वस्तुस्थितीही समोर ठेवली आहे. गेले ३ महिने एसटीच्या सुमारे ९७ हजार अधिकारी व कर्मचा-यांचे थकीत असलेल्या वेतनापैकी ऑगस्ट महिन्याचे वेतन कर्मचा-यांच्या बँक खात्यावर आजपासून जमा होईल, ज्या कर्मचा-यांना दिवाळी सणानिमित्त अग्रीम (बिनव्याजी उचल) हवा असेल त्यांना तातडीने आग्रीम देण्याचा प्रयत्न केला जाईल. उर्वरित २ महिन्यांच्या वेतनापैकी एक वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येणार असून, बाकी एक महिन्याचे वेतन देण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे, अशी माहिती मंत्री परब यांनी दिली.

anil parab

टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. त्यामुळे याकाळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणा-या सुमारे ३ हजार कोटी रुपये महसुलावर पाणी सोडावे लागले. परंतु, याकाळातील इतर खर्च , जसे कर्मचा-यांचे वेतन, गाड्यांची देखभाल, बसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकीत रक्कम वाढत गेली. २० सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण क्षमतेने एसटीची वाहतूक सुरु झाली आहे. परंतु, करोना महामारीच्या भीतीमुळे सर्वसामान्य प्रवाशांनी सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्याचे टाळले आहे. याचा विपरीत परिणाम एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर झाला आहे. त्यामुळे टाळेबंदीपूर्वी दररोज सुमारे ६५ लाख प्रवासी वाहून नेणा-या एसटीकडे सध्या केवळ १३ लाख प्रवाशांचा चढ-उतार होत आहे. यातून दररोज ७ कोटी रुपयांचा महसूल मिळत असून टाळेबंदीपूर्वी दररोज २२ कोटी रुपये महसूल मिळत असे. प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे त्यामुळे लवकरच एसटी पूर्वपदावर येईल, असा विश्वासही परब यांनी व्यक्त केला.

तिकीट विक्रीतून मिळणा-या महसुलाव्यतिरिक्त इतर मार्गाने एसटीचा महसूल वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मालवाहतूक, सर्वसामान्यांसाठी पेट्रोल – डिझेल पंप, टायर पुन॑:स्थिरीकरण प्रकल्प व्यावसायिक तत्वावर राबवणे, खासगी वाहतूकदारांना बस बॉडी बिल्डिंग करून देणे असे अनेक पर्याय महसूल वाढवण्यासाठी एसटीने निर्माण केले आहेत. परंतु, त्यासाठी देखील निधीची आवश्यकता असून एसटीची आर्थिक स्थिती भक्कम होईपर्यंत, शासनाने मदत करावी अशी विनंती आपण शासनाला केली असल्याचे मंत्री परब यांनी यावेळी सांगितले.

जळगाव आणि रत्नागिरीतही कर्मचा-याची आत्महत्या

 

जळगावमध्ये मनोज अनिल चौधरी या ३० वर्षीय वाहकाने आजच आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असताना रत्नागिरीतही तशीच घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चौधरी याने आपल्या सुसाइड नोटमध्ये आत्महत्येस ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे सरकारवर चौफेर टीका होऊ लागली आहे. यावर कर्मचा-यांना संयम दाखवण्याचे आवाहन परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी केले आहे. काळ जरी कठीण असला तरी, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कर्मचा-यांनी उचलू नये, अशी साद परब यांनी घातली आहे.

रत्नागिरी एसटी डेपोतील चालकाने रविवारी दुपारी आत्महत्या केल्याचे उघड झाले असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी गेले तीन महिने पगार न मिळाल्याने तणावातून त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता एसटी कर्मचा-यांसह संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पगार नसल्याने कटुंबाचा चरितार्थ कसा चालवायचा या विवंचनेतूनच या चालकाने आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला असावा, असे त्याच्या सहका-यांनी सांगितले.

पांडुरंग संभाजीराव गडदे (वय ३५) असे आत्महत्या करणा-या चालकाचे नाव आहे. ते मूळचे बीड जिल्ह्यातील परळी येथील असून रत्नागिरीतील माळनाका येथे रेंटवर राहत होते. रविवारी सकाळी नांदेड-रत्नागिरी असा प्रवास करून ते परतले होते. ड्युटी आटोपून ते आपल्या माळनाका येथील घरी गले होते. दरम्यान, दुपारनंतर त्यांचा सहकारी खोलीवर गेला असता दरवाजा ठोठावूनही आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर शेजा-यांना याबाबत कल्पना देऊन लगेचच पोलिसांनाही कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दरवाजा उघडला असता पांडुरंग हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातून वैदयकीय अहवाल आल्यानंतरच पुढील तपासाची दिशा ठरेल, असे रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक अनील लाड यांनी पत्रकारांना सांगितले.

पांडुरंग गडदे यांचे बीड येथील कुटुंबीय आज रत्नागिरीत दाखल झाले असून गडदे यांचा मृतदेह त्यांच्या मूळ घरी परळी येथे नेण्यात येणार आहे, अशी माहिती एसटीचे अधिकारी अनंत जाधव यांनी दिली. मागील काही महिन्यांपासून एसटी कर्मचा-यांना पगार मिळत नसल्याने तसेच दिवाळी तोंडावर असूनही मागील तीन महिन्यांचा पगार मिळाला नसल्याने सर्वच कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आत्महत्या केलेल्या पांडुरंग गडदे यांनी सुसाइड नोट लिहून ठेवली नाही, असे सांगण्यात आले असले तरी एसटी महामंडळातील कमी पगार व अनियमितता यास कंटाळून संबधित कर्मचा-याने आत्महत्या केली असावी, असेच आगारातील अनेक कर्मचा-यांचे म्हणणे आहे. या चालकाची साधारण ७ वर्षे सेवा झाली असून पत्नी व लहान मुलं असल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना भरीव सहाय्य मिळावे, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे.

एसटी महामंडळातील कमी पगार, अनियमिततेला कंटाळून जळगाव आगारात वाहक म्हणून नोकरीला असलेल्या मनोज अनिल चौधरी (३०, रा. कुसुंबा, ता. जळगाव) या कर्मचा-याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजता उघडकीस आली. आत्महत्या करण्यापूर्वी मनोजने चिठ्ठी लिहिली असून त्यात एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसांचे ठाकरे सरकार (शिवसेना) हेच माझ्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा उल्लेख केला आहे.

मनोज परिवारासह कुसुंबा येथे वास्तव्याला होता. सोमवारी सकाळी साडे आठ वाजले तरी वरच्या मजल्यावरुन खाली आला नाही म्हणून भाऊ त्याला उठवायला गेला असता त्याने हॉलमध्ये गळफास घेतल्याचे दिसले. शेजारीच त्याने एका वहीच्या पानावर सात आठ ओळींची चिठ्ठी आढळून आली. भाऊ व मित्रांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात आणले, मात्र तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. यावेळी भाऊ, पत्नी व इतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जिल्हा रुग्णालयात मनोजचा भाऊ सागर याने दिलेल्या माहितीनुसार, मनोज हा चार वर्षापासून एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होता. सुरुवातील मुक्ताईगर येथे ड्युटी होती. त्यानंतर जळगाव आगारात बदली झाली. मनोज याची ड्युटी सतत लांब पल्ल्याच्या गाड्यांवर लावली जात होती. तो अनेकांची ड्युटी विभागून घेत होता, मात्र त्याची वेळ यायची तेव्हा त्याला कोणीच मदत करीत नव्हते. त्यात तीन महिन्यापासून पगार नाही. झाला तर वेळेवर होत नाही. त्यात कमी पगार, अनियमतता. सरकारचा कारभार याला कारणीभूत आहे. हे त्यांनी चिठ्ठीतच लिहीले आहे. माझा भाऊ गेला, त्याला कोण परत आणून देणार असे म्हणत आक्रोश करीत होता.

ठाकरे सरकार गेंड्याच्या कातडीचे : महाजन

जळगावचे भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज चौधरी कुटुंबीयांची भेट घेत सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. सरकार गेंड्याच्या कातडीचे असून कुठल्याच संवेदना या सरकारला नाहीत. एकीकडे दिवाळीचा सण तोंडावर आला असताना, ४-४ महिने तुम्ही लोकांना पगार देत नाहीत. शेतक-यांना सांगितले की दिवाळी गोड करू, त्यांनाही कुणी एक रुपया द्यायला तयार नाही, असे म्हणत आमदार गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

सरकारला लाज नाही का? : पडळकर

राज्यात कोरोनामुळे एसटी कर्मचा-यांचा मृत्यू झाला. त्यातील अनेकांच्या कुटुंबियांना मदत मिळाला नाही. एसटी कर्मचा-यांना पगार ही वेळेवर दिला जात नाही. त्यामुळे त्यांना आक्रोश आंदोलन करण्याची वेळ आता त्यांच्यावर आली आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ म्हणणा-या सरकारला एस.टी. कर्मचा-यांचे कुटुंब आपले वाटत नाही का? त्यांना लाज वाटत नाही का? असा सवाल आमदार गोपीचंद पडळकर यांनी विचारला आहे.

जो न्याय अर्णब गोस्वामींना, तोच अनिल परबांना लावणार काय?

एसटी महामंडळाचे कर्मचारी मनोज चौधरी यांनी आत्महत्या केली असून आपल्या मृत्यूला ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे. ही अत्यंत हृदयद्रावक घटना आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक करणा-या ठाकरे सरकारने इथेही तोच न्याय लावून चौधरी यांच्या मृत्यूला कारणीभूत मानून परिवहन मंत्री अनिल परब यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

आता कुणाला तुरुंगात टाकणार? भाजप नेत्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

राज्यात एसटी कर्मचा-यांचा तीन महिन्यांचा पगार थकीत आहे. त्यामुळे जळगावातील एका एसटी कर्मचा-याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. एसटी कर्मचा-याच्या या आत्महत्येला कोण जबाबदार? सरकार आता कुणाला तुरुंगात टाकणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की परिवहन मंत्री अनिल परब यांना? असा सवाल भाजपचे नेते किरिट सोमय्या आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी