31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजआदित्य ठाकरेंच्या कोटी कोटीच्या निमित्ताने सहजच...

आदित्य ठाकरेंच्या कोटी कोटीच्या निमित्ताने सहजच…

अॅड. विश्वास काश्यप

आदित्यजी हे त्यांच्या नुकत्याच सुरू झालेल्या राजकीय कारकिर्दीत आमदारकीची निवडणूक लढवीत आहेत. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा.

त्यांच्या सारख्या राजकीय घराण्यात जन्माला आलेल्या मुलांचे हेच भाग्य असते. प्रत्येक पक्षाचे राजकीय घराणे म्हणजे तथाकथित लोकशाहीत असलेली संस्थांन. लोकांनाही आता त्याचे काही वाटेनासे झाले आहे.  ‘यथा राजा तथा प्रजा’ या प्रथेनुसार लोकांनी विचार करणंच सोडून दिलंय. सगळ्या पक्षात कमी जास्त प्रमाणात अंध भक्तांचा महापुरच आला आहे. या अंध भक्तांची पात्रता पहिली तर सतरंज्या उचलणे, अर्धी बिर्याणी आणि अर्धी चपटी…

राजकीय घराण्यातील मंडळींचं एक बरं असतं. त्यांचे पूर्वज सुरवातीला घराणेशाहीवर टीका करता करता स्वतःचेच एक मोठे घराणे तयार करतात. हे इतके सरळ आणि मस्त जमवून आणतात ना की, ज्या घराणेशाहीच्या मुद्यावर ज्या अंध भक्तांनी स्वतःचे हात दुःखेपर्यंत टाळ्या वाजविलेल्या असतात तेच हात वारसाच्या पायाला हात लावून कधी नमस्कार करतात हेच कळून येत नाही. असो.

अशा राजकीय घराण्यातील मुलाला हे विचारणे मूर्खपणाचे असते की,  बाबा, तू कोणताही काम धंदा न करता तुझ्याकडे इतके कोटी आले कुठून ? महागड्या गाड्या कशा आल्या ? तुला इतकी कॅश कोणी दिली ? ही मंडळी बिनधास्तपणे ही कायदेशीर संपत्ती त्यांच्या निवडणूक उमेदवारी अर्जात भरत असतात. कारण त्यांना चांगल्या प्रकारे माहीत असतं की १५ कोटी जनतेपैकी एकही माईचा लाल त्यांना त्या संपत्तीबद्दल विचारणार नाही. बेकायदेशीर संपत्तीचा आवाका तर किती किती मोठा असेल याची कल्पनाच करवत नाही. तेवढी आमची विचारशक्ती सुद्धा नसते. आम्ही मात्र वर्तमानपत्र,  व्हाट्सअप वर वाचून तेवढ्या पुरती क्षणिक पांचट प्रतिक्रिया देऊन तो महत्त्वाचा विषय हसण्यावारी नेऊन उडवून लावतो.

दहा रुपयांचा कटिंग चहा चार दोन मित्रांना पाजताना २ – ३ वेळा खिशाला हात लावून पैशाची चाचपणी करणाऱ्याच्या डोक्यात हा प्रश्न  घोंगावत का नाही की, इतके पैसे आले कुठून ?

तीस दिवस ऑफिसमध्ये, इकडे तिकडे घासल्यानंतर १५ – २०, ३० – ४० हजार रुपये कामविणारे आपण, संपूर्ण आयुष्यभर मर मर काम केले तरी एक कोटीवर किती शून्य असतात हे ज्यांना माहीत नसतं अशी माणसं ह्या गंभीर प्रश्नावर विचार का करीत नाहीत ? कुठून आला इतका पैसा ? अशी कोणती जादू आहे की ती केल्यानंतर इतक्या लहान वयात ही मुलं कोट्याधीश होतात ? ते इन्कम टॅक्सवाले,  ती ईडी का फिडी यांना ही आकडेवारी समजत नाही का ? आम्ही स्वतः या कोटी कोटीच्या आकड्यांवर कधी बोलणार आहोत की नाही ? की वर्तमानपत्रात आलेले आकडे पाहून आम्ही षंढ होऊन गप्पच बसणार आहोत ?

अशीच राजकीय संस्थाने तयार होणार असतील तर कशाला पाहिजे ही तथाकथित लोकशाही ? परत बोलवा त्या ब्रिटिशांना. करू द्या त्यांनाच राज्य आपल्यावर. ऐतिहासिक इमारती बांधणे, शहरांचे योग्य नियोजन करणे, ठरलेल्या सरकारी निधीतच काम करणे हे फक्त ब्रिटिशांनीच करावे हे आपल्याला मान्य करावेच लागेल.

परंतु इतके असून सुद्धा ब्रिटिशांना पुन्हा आणण्याची घाई नको. आम्ही लोकशाहीवादी कितीही निर्लज्ज असलो तरी एक ना एक दिवस आम्ही बंड करून उठणारच. लोकशाहीसाठी जीव देणारच. ज्याला प्रश्न विचारावयाचा आहे मग तो कितीही मोठा असो त्याला प्रश्न विचारणारच. कारण लोकशाही आहे म्हणून आपण सर्वजण आहोत. आमची भूमिका  ‘हिटलर नको संविधान हवे’ अशीच असणार … आमच्या तुमच्या अंतापर्यंत.

फक्त ते कोटी कोटीच्या उड्डाणाचं तेवढं लक्षात असू द्या.

जय हिंद

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी