31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजशिवसेनेला सरकार स्थापनेसाठी काँग्रेस पाठींबा देणार नाही, सोनिया गांधी यांची भूमिका

शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी काँग्रेस पाठींबा देणार नाही, सोनिया गांधी यांची भूमिका

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेनेची भाजपसोबत चर्चा फिस्कटली तर, महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत काँग्रेस शिवसेनेला पाठींबा देणार नाही, असा निर्णय पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतला आहे. शिवसेना हा हिंदूत्ववादी पक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेला पाठींबा दिला तर काँग्रेसला देशात फटका बसेल, हे लक्षात घेऊन सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षात राहणेच पसंत केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

शिवसेनेने भाजपसोबत काडीमोड घेऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पाठींबा देण्याबाबत विचार करतील, अशी वक्तव्ये यापूर्वी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केली होती. शिवसेनेकडून पाठींब्याचा प्रस्ताव आला तर तो पक्षश्रेष्ठींकडे पाठविला जाईल असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले होते, तर जयंत पाटील व नबाव मलिक यांनीही शिवसेनेने पाठींबा मागितल्यास तो देण्याची तयारी दाखविली होती. मात्र काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आता शिवसेनेविषयी नकारात्मक भूमिका घेतली आहे.

शिवसेनेला पाठींबा द्यायचा किंवा नाही याबाबत महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खर्गे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यावर सोनिया गांधी यांनी हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिवसेनेला पाठींबा दिल्यास तूर्त भाजपला सरकारबाहेर ठेवणे शक्य होईल. परंतु शिवसेनेशी केलेली ही तडजोड भविष्यकाळात डोकेदुखी ठरू शकते. कट्टर हिंदूत्ववाद काँग्रेसला मान्य नाही. भारतीय राज्य घटनेतील तत्वांनुसार काँग्रेस धर्मनिरपेक्ष राजकारण करतो. त्यामुळे शिवसेनेला पाठींबा दिला तर काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष धोरणाला तडा जाईल. काँग्रेस समर्थकांमध्ये नाराजी पसरेल या भीतीने शिवसेनेला पाठींबा न देण्याची भूमिका सोनिया गांधी यांनी घेतली असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी