35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजउद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांवर नाराज, भाजपविरोधात आक्रमक भूमिका

उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांवर नाराज, भाजपविरोधात आक्रमक भूमिका

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : सरकार स्थापनेबाबत अमित शाह आणि आमच्यात जे ठरले आहे, तेच होईल. आम्ही स्थिर सरकार देऊ. मित्र पक्ष हा शत्रू नाही. पण दिवाळी दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. त्यांनी असे बोलायला नको होते, अशी नाराजी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत आज उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. या बैठकीत विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची, तर पक्ष प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका मांडताना मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. सरकार स्थापनेबाबत कोणताही प्रस्ताव भाजपकडून आलेला नाही. मीडियातून प्रस्ताव येत असल्याचीही चर्चा या बैठकीत झाली.

सरकार स्थापनेबाबत शिवसेना व भाजपमध्ये 50:50 टक्के फॉर्म्यूला व मुख्यमंत्रीपदाबाबत काहीही ठरलेले नसल्याचे फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी वक्तव्य केले होते. त्यानंतर शिवसेनेने भाजपसोबत होणारी बैठकही रद्द केली होती. शिवसेनेची ही नाराजी लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी सारवासारव केली होती. अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली असेल तर मला माहित नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.

सत्तेत 50 टक्के वाटा, व अडिच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद यासाठी शिवसेना आग्रही आहे. याबाबतचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्याचे आजच्या बैठकीत ठरविण्यात आले आहे.

या बैठकीनंतर शिवसेनेचे सगळे आमदार राज्यपालांना भेटायला जाणार आहेत. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याबाबत राज्यपालांनी दौरा करून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घ्यावा, या मागणीसाठी सेनेचे आमदार राजभवनवर जाणार आहेत. पण राज्यपालांना भेटायला जाण्याची ही कृती भाजपवर दबाव आणण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी