31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजअण्णा हजारेंमुळे राजकीय करिअर उद्ध्वस्त झालेल्या ‘या’ नेत्याचे मंत्रीमंडळात होणार पुनरागमन

अण्णा हजारेंमुळे राजकीय करिअर उद्ध्वस्त झालेल्या ‘या’ नेत्याचे मंत्रीमंडळात होणार पुनरागमन

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सन 2003 मध्ये राष्ट्रवादीच्या तत्कालिन चार मंत्र्यांच्या विरोधात उपोषण आंदोलन केले होते. अण्णांच्या आंदोलनामुळे या चारही नेत्यांचे राजकीय करिअर पणाला लागले. त्यातील एका नेत्याचे आता तब्बल 15 वर्षानंतर मंत्रीमंडळात पुनवर्सन होऊ घातले आहे. एवढेच नव्हे तर, या नेत्याला महत्वाचे मंत्रीपदही मिळू शकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक असे या नेत्याचे नाव आहे.

सन 2003 मध्ये अण्णांनी नवाब मलिक यांच्यासह डॉ. विजयकुमार गावीत, सुरेश जैन, पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात आंदोलन केले होते. विविध प्रकरणांमध्ये सरकारी अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत अण्णांनी हे आंदोलन पेटवले होते. तब्बल 12 दिवस अण्णांनी उपोषण केले. त्यांच्या या आंदोलनाचे मोठे पडसाद राज्यात व देशातही उमटले. त्यामुळे अखेर या चार मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले होते.

अण्णा हजारेंमुळे राजकीय करिअर उद्ध्वस्त झालेल्या ‘या’ नेत्याचे मंत्रीमंडळात होणार पुनरागमन
नवाब मलिक

नवाब मलिक हे त्यावेळी गृहनिर्माण खात्याचे राज्यमंत्री होते. मुंबईतील एका वसाहतीसंदर्भात न्यायालयाने निकाल दिलेला होता. परंतु वसाहतीसंदर्भातील हितसंबंधीय लोकांनी न्यायालयाच्या निकालाविरोधात जाऊन त्या कारवाईला स्थगिती मिळविण्यासाठी मलिक यांची भेट घेतली होती. मलिक यांना त्यावेळी हज यात्रेला जायचे होते. ते यात्रेला जाण्याच्या घाईत होते. त्यामुळे त्यांनी अनवधानाने न्यायालयाच्या निकालाविरोधात संबंधित वसाहतीच्या फाईलवर लेखी निर्णय लिहून टाकला. हे प्रकरण लोकायुक्तांकडे गेले. लोकायुक्तांनी मलिक यांच्या विरोधात प्रस्ताव तयार केला. मलिक यांच्यावर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव लोकायुक्तांनी राज्यपालांना पाठवला. त्यावेळी माहिती अधिकार कायदा लागू झाला नव्हता. तरीही सरकारी यंत्रणेतील काहीजणांनी मलिक यांच्या विरोधातील ही सगळी कागदपत्रे अण्णा हजारे यांच्याकडे पोचविली. त्याच वेळी विजयकुमार गावित, पद्मसिंह पाटील व सुरैश जैन यांच्याही घोटाळ्याबाबतची कागदपत्रे अण्णा हजारे यांच्याकडे पोचविली होती. या चार मंत्र्यांच्या विरोधात अण्णा हजारे यांनी उपोषण सुरू केले होते.

अण्णा हजारेंमुळे राजकीय करिअर उद्ध्वस्त झालेल्या ‘या’ नेत्याचे मंत्रीमंडळात होणार पुनरागमन
सुरेश जैन

अण्णा हजारेंच्या या उपोषण आंदोलनामुळे नवाब मलिक यांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त झाले. त्यानंतर नवाब मलिक राष्ट्रवादीमधील दुर्लक्षित नेते ठरले. आमदारकीच्या निवडणुकीत त्यांचा पराभवही झाला. स्वतःवर संकट कोसळले होते. पक्षातूनही त्यानंतर त्यांना फार कुणाचा आधार मिळाला नाही. तरीही ते शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेससोबत प्रामाणिक राहिले. सगळे नेते मंत्रीपदावर असताना मलिक मात्र पक्षातील दुय्यम दर्जाची कामे करीत राहिले. सन 2014 मध्ये केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आले. राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्ष सोडून भाजप व शिवसेनेमध्ये दाखल झाले. मलिक यांनी मात्र शरद पवारांची साथ सोडली नाही. एवढेच नव्हे तर, राष्ट्रीय प्रवक्ते या नात्याने त्यांनी सलग पाच वर्षे भाजप सरकारवर आसूड ओढण्याचे काम केले. पक्षाला ताकद दिली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या अणुशक्तीनगर मतदारसंघातून ते पुन्हा निवडून आले. तब्बल 15 वर्षांचा विजनवास त्यांच्या वाट्याला आला. पण या काळात त्यांनी आपली प्रतिमा स्वच्छ करून घेतली. पंधरा वर्षांत ते कोणत्याही वादात अडकले नाहीत. उलट पक्ष सत्तेबाहेर असताना पक्षासाठी सतत कष्ट करीत राहिले. गेल्या पाच वर्षांत भाजपवर आरोप करण्यास सहसा कोणी धजावत नव्हते. मलिक मात्र बेधडकपणे भाजपच्या मंत्र्यांवर तोफा डागायचे.

अण्णा हजारेंमुळे राजकीय करिअर उद्ध्वस्त झालेल्या ‘या’ नेत्याचे मंत्रीमंडळात होणार पुनरागमन
पद्मसिंह पाटील

नवाब मलिक यांचे 15 वर्षांत झालेले राजकीय नुकसान त्यांनी पक्षाशी व पवारांशी प्रामाणिक राहिल्यामुळे आता भरून निघणार आहे. शिवसेनेसोबत निर्माण होऊ घातलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या सरकारमध्ये त्यांना महत्वाचे मंत्रीपद दिले जाईल, असे बोलले जात आहे.

अन्य तीन मंत्र्यांचे पुनवर्सन होऊनही त्यांचे करिअर संपुष्टात

नवाब मलिक यांचे मंत्रीपद गेले, त्यावेळी विजयकुमार गावित, पद्मसिंह पाटील व सुरेश जैन यांचीही मंत्रीपदे गेली होती. पण या तिन्ही नेत्यांना पुढील दोन – तीन वर्षानंतर पुन्हा मंत्रीमंडळात स्थान मिळाले. मलिक यांना मात्र तशी संधी आजपावेतो मिळाली नाही. जैन यांचा घरकुलाचा आणखी एक घोटाळा समोर आला. त्यामुळे त्यांचे मंत्रीपद पुन्हा गेले. एका खुनाच्या प्रकरणात पद्मसिंह पाटील यांच्यावर आरोप झाले. त्यामुळे त्यांचे करिअर दुसऱ्यांदा अडचणीत आले.

अण्णा हजारेंमुळे राजकीय करिअर उद्ध्वस्त झालेल्या ‘या’ नेत्याचे मंत्रीमंडळात होणार पुनरागमन
डॉ. विजयकुमार गावित

विजयकुमार गावित यांचे पुनर्वसन व्यवस्थित झाले होते. सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री होते. पण निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. आपल्या मुलीला त्यांनी भाजपकडून खासदारकीची तिकिट मिळविली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डॉ. गावित सुद्धा भाजपवासी झाले. राष्ट्रवादीने डॉ. गावित यांनी मंत्रीपदे दिली होती. पण भाजपात गेलेल्या डॉ. गावित यांना मंत्रीपदाची संधी मिळालीच नाही. पद्मसिंह पाटील सुद्धा दोन – तीन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने या तिन्ही नेत्यांना पुन्हा पुन्हा संधी देऊनही त्यांनी पक्षाशी निष्ठा जपल्या नाहीत. या उलट अडगळीत जाऊन सुद्धा नवाब मलिक यांनी पवार व राष्ट्रवादीशी कायम एकनिष्ठता जपली. त्यामुळे उशिरा का होईना त्यांना न्याय मिळू शकेल असे सध्याचे चित्र आहे.

सुरेश जैन यांनीही अण्णा हजारेंच्या विरोधात केले होते उपोषण

सन 2003 मध्ये चार मंत्र्यांच्या विरोधात अण्णा हजारे आझाद मैदानात उपोषणाला बसले होते. त्यांच्या उपोषण आंदोलनाची धार दर दिवसाला वाढत होती. अशा वेळी सगळे मंत्री व संपूर्ण सरकार हादरून गेले होते. पण सुरैश जैन यांनी शांत राहण्याऐवजी अण्णा हजारे यांच्यावरच उलट आरोप करायला सुरूवात केली. एवढेच नव्हे तर, जैन सुद्धा अण्णा हजारे यांच्या विरोधात उपोषणाला बसले. त्यावेळी आझाद मैदानाच्या एका कोपऱ्यात अण्णांच्या आंदोलनाचा तंबू, तर दुसऱ्या कोपऱ्यात जैन यांच्या आंदोलनाचा तंबू ठोकलेला होता. अण्णांच्या ट्रस्टमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा उलट आरोप जैन यांनी केला. अर्थात एका मंत्र्याने सामान्य समाजसेवकाविरोधात केलेला हा आरोप कुणी फार गांभिर्याने घेतला नाही. पुढे काही वर्षानंतर जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर जळगावमधील घरकुल घोटाळ्यात जैन यांना तुरूंगात जावे लागले.

हे सुद्धा वाचा

सरकार स्थापनेचा आजच दावा, नव्या सरकारमध्ये ‘अशी’ असतील मंत्रीपदे

भाजपला सुचले उशिरा शहाणपण, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याची तयारी

VIDEO : हेमामालिनींनी मांडली समस्या, माकडे फ्रुटी – सामोसे – पेढे खातात, अन् त्रासही देतात

औरंगाबादेत उध्दव ठाकरेंच्या विरोधात फसवणुकीची तक्रार

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री; तर बाळासाहेब थोरात, अजित पवार उपमुख्यमंत्री

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी