31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजसरकार स्थापनेचा आजच दावा, नव्या सरकारमध्ये ‘अशी’ असतील मंत्रीपदे

सरकार स्थापनेचा आजच दावा, नव्या सरकारमध्ये ‘अशी’ असतील मंत्रीपदे

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तिन्ही पक्षांचे ‘महाविकासआघाडी’ सरकार आजच सत्ता स्थापनेचा दावा करेल अशी दाट शक्यता आहे. या तिन्ही पक्षांचे सरकार कसे असेल याबाबत गुरूवारी रात्री उशिरापर्यंत शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यात खलबतं झाली. त्यानंतर सत्तावाटपाच्या सूत्राबाबत तिन्ही पक्षांचे एकमत झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गुरूवारी दिवसभर दिल्लीत झालेल्या विविध बैठका, मुंबईत रात्री उशिरा शरद पवार यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची झालेली चर्चा यानंतर सत्तेचा सोपान आकारास आला आहे. आज सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरे यांनी सगळ्या आमदारांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना मार्गदर्शन करतील. राष्ट्रवादी काँग्रेसचीही बैठक सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होणार आहे. काँग्रेसचीही एक बैठक होणार आहे. काँग्रेसच्या गटनेत्याचीही निवड आज होईल. तिन्ही पक्षांच्या स्वतंत्र बैठका झाल्यानंतर एकत्रित बैठक सुद्धा होईल.

काँग्रेस – राष्ट्रवादीचे आघाडीत अनेक छोटे पक्ष सहभागी आहेत. यांत राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, जोगेंद्र कवाडे यांची आरपीआय, शेतकरी कामगार पक्ष इत्यादी पक्षांचा समावेश आहे. या घटक पक्षांच्या नेत्यांसोबतही आज धनंजय मुुंडे यांच्या निवासस्थानी बैठक घेतली जाणार आहे.

या बैठकीनंतर तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते राज्यपालांना भेटायला जातील. या भेटीत तिन्ही पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करतील. तिन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर भारतीय राज्य घटनेतील तरतुदीनुसार राज्यपाल सरकार बनविण्याची संधी देतील. त्यानुसार येत्या सोमवारी किंवा मंगळवारी नव्या सरकारच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

मंत्रीपदे, महामंडळांचे असे असेल वाटप

मुख्यमंत्रीपद शिवसेनेला मिळणार आहे. हे पद पूर्ण पाच वर्षांकरीता शिवसेनेलाच मिळेल. मुख्यमंत्रीपदासह एकूण 16 मंत्रीपदे शिवसेनेला मिळतील. त्यात 11 कॅबिनेट, तर 5 राज्यमंत्रीपदे असतील. उपमुख्यमंत्रीपदे दोन असतील. ही दोन्ही पदे काँग्रेस व राष्ट्रवादीला दिली जातील. उपमुख्यमंत्रीपदासह राष्ट्रवादीला 15 मंत्रीपदे मिळतील. यात 11 कॅबिनेट, तर 4 राज्यमंत्रीपदे असतील. काँग्रेसलाही उपमुख्यमंत्रीपदासह 12 मंत्रीपदे मिळतील. यांत 9 कॅबिनेट, तर 3 राज्यमंत्रीपदे असतील.

खात्यांच्या वाटपावरही तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. यांत शिवसेनेकडे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य व कृषी ही खाती मिळतील. राष्ट्रवादीला गृह, अर्थ, शालेय शिक्षण, सहकार, वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक ही खाती मिळतील. काँग्रेसला महसूल, ग्रामविकास व उच्च – तंत्र शिक्षण ही खाती मिळू शकतील, असे सूत्रांनी सांगितले.

महामंडळ वाटपाचेही सूत्र निश्चित करण्यात आले आहे. यानुसार शिवसेनेला 27, तर काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी 25 महामंडळे दिली जातील, असे या सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

भाजपला सुचले उशिरा शहाणपण, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याची तयारी

VIDEO : हेमामालिनींनी मांडली समस्या, माकडे फ्रुटी – सामोसे – पेढे खातात, अन् त्रासही देतात

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री; तर बाळासाहेब थोरात, अजित पवार उपमुख्यमंत्री

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी