31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजSamrudhi Highway : समृद्धी महामार्गावरुन १ मेपर्यंत नागपूर-शिर्डी प्रवास सुरू होणार

Samrudhi Highway : समृद्धी महामार्गावरुन १ मेपर्यंत नागपूर-शिर्डी प्रवास सुरू होणार

मुख्यमंत्र्यांकडून समृद्धी महामार्गाची पाहणी

टीम लय भारी

अमरावती : ‘येत्या १ मे पर्यंत समृद्धी महामार्गावरुन (Samrudhi Highway) नागपूर ते शिर्डी प्रवास करता येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री ठाकरे अमरावतीच्या दौ-यावर असून त्यांनी आज समृद्धी महामार्गाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी आज समृद्धी महामार्गाच्या विदर्भातील सुमारे ३४७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला. तसेच त्‍यांनी अमरावती जिल्ह्यातील शिवनी-रसूलापूर येथे सहा किलोमीटर महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावरुन प्रवास करुन सुरु असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करताना या रस्त्याचे काम अप्रतिम झाल्याचा अभिप्राय दिला.

तसेच समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होईल तेव्हा तो सर्वोत्तम महामार्ग असेल, निश्चितच महाराष्ट्राला याचा अभिमान वाटेल, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी महामार्गाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.

‘आज पहिल्यांदाच मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे महामार्ग प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पाचे काम अप्रतिम चालू आहे. प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा ज्याचा महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा आपल्या देशातील सर्वोत्तम महामार्ग बनेल, असे आपण काम केलेले असेल’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

समृद्धी महामार्गावरुन येत्या १ मेपर्यंत नागपूर ते शिर्डी प्रवास सुरू होणार असल्याचीही माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, ‘आपण हे काम ज्या गतीने करतो आहे. लॉकडाउनच्या काळात असे वाटले होते की कामात खंड पडेल किंबहुना काम थोडसे हळुवारपणे होईल पण त्या काळात सुद्धा प्रकल्पाचे काम मंदावलेले नाही. मला खात्री आहे. येत्या १ मे पर्यंत आपण नागपूर ते शिर्डी प्रवास या रस्त्यावरुन प्रवास करू शकू.’ येत्या १ मेपर्यंत नागपूर ते शिर्डी प्रवास समृद्धी मार्गावरुन सुरू झाल्यानंतर पुढच्या १ मेपर्यंत आपण मुंबईपर्यंत पोहोचलेले असू, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

नागपूर- मुंबई शीघ्र संचार दृतगती महामार्ग विदर्भातील चार जिल्ह्यातून जात असून या महामार्गासाठी ८ हजार ३६४ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. या महामार्गाचे बांधकाम सोळा टप्प्यात पूर्ण होत असून सुमारे ६० टक्क्यापेक्षा जास्त रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

महामार्गाच्या बांधकामासोबतच जलसंधारणाच्याही कामांना प्राधान्य देण्यात आले असून अमरावती जिल्ह्यातील ३८ नाल्यांचे ९१ हजार २१० मीटर लांबीचे खोलीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे महामार्गासोबतच जलसमृद्धी देखील झाली आहे.

दरम्यान, समृद्धी महामार्ग दहा जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडत जाणार आहे. हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला होताच नागपूर आणि मुंबई या दोन शहरांमधील अंतर अवघ्या ८ तासांत पूर्ण करता येणार आहे.

समृद्धी महामार्गावर दर ४० ते ५० किमी मार्गावर दोन्ही बाजूला वेसाइड ऍमेनिटीजची उभारणी करण्यात येणार असून प्रत्येक ठिकाणी विजेवर चालणा-या वाहनांच्या चार्जिंगसाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच महामार्गावर इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) ही सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सुविधेच्या माध्यमातून वाहनांचा वेग, लेन कटिंग, वाहन ब्रेकडाऊन होणे इत्यादींवर लक्ष ठेवले जाणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी