31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजगोपीचंद पडळकरांवर टीका करू नका : अजित पवार

गोपीचंद पडळकरांवर टीका करू नका : अजित पवार

लय भारी न्यूज नेटवर्क

पुणे :  ‘कुणी बाहेरून येऊन आपल्याकडे निवडणूक का लढवावी, असा विचार करणे चुकीचे आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करू नका’, असे आवाहन आमदार अजित पवार यांनी केले आहे. त्यांनी ट्विटरवरून हे आवाहन केले आहे.

गोपीचंद पडळकरांवर टीका करू नका : अजित पवार

अजित पवार व गोपीचंद पडळकर बारामती मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकसाठी लढत देत आहेत. पडळकर हे मुळचे आटपाडी तालुक्यातील आहेत. परंतु संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. विशेषत: धनगर व बहुजन समाजामध्ये त्यांच्या तडफदार नेतृत्वाबद्दल क्रेझ आहे. बारामतीमध्ये धनगर समाजाची मोठी व्होटबँक आहे. ही बाब ध्यानी घेऊन अजित पवारांना शह देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पडळकर यांना बारामतीमधून निवडणुकीचे तिकिट दिले आहे. दुसऱ्या बाजूला बारामती हा पवारांचा बालेकिल्ला आहे. पवार घराण्याने बारामतीचा चौफेर विकास केला आहे. अशा परिस्थितीत ही लढाई चुरसीची होईल असे म्हटले जात आहे.

पडळकर यांनी आपला प्रचार सुरू केला असतानाच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर टीका सुरू केली आहे. पडळकर हे बाहेरच्या मतदारसंघातील आहेत. ते येथून का निवडणूक लढवित आहेत, अशा आशयाचे आरोप त्यांच्यावर होऊ लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी समजूतदारपणा दाखविला आहे. देशाच्या संविधानाने कुणाला कुठूनही निवडणूक लढविण्याचा अधिकार दिला आहे. गोपीचंद पडळकर बाहेरचे आहेत, अशा पद्धतीची विधानं करणं अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे निवडणूक उमेदवारावर टीका करू नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

राष्ट्रवादीच्या उत्साही कार्यकर्त्यांकडून अनुचित प्रकार घडू नये म्हणून पवार यांनी कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी हा संदेश दिला आहे, असे बोलले जात आहे. दुसऱ्या बाजूला बारामतीत धनगर समाजाची मोठी लोकसंख्या आहे. पडळकर यांना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्रास देत आहेत, असा धनगर समाजामध्ये संदेश गेला तर धनगर विरूद्ध राष्ट्रवादी असे वातावरण तयार होईल. धनगर समाज निष्कारण अजित पवारांवर नाराज होईल. ते टाळण्यासाठीही पवारांनी हे ट्विट केले असावे असा कयास बांधण्यात येत आहे.

गोपीचंद पडळकर यांना पूर्ण मोकळीक देवून त्यांना हवा तसा प्रचार करू द्यावा, त्यामुळे आपल्या विरोधी लोकभावना तयार होणार नाहीत. उलट पडळकर यांना नडण्याची भूमिका घेतल्यास लोकभावना विरोधात जातील, असाही अंदाज पवार यांच्याकडून बांधला जात असावा, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी