30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्र...तर 2024 मध्ये मतं मागायला येणार नाही : राम शिंदे 

…तर 2024 मध्ये मतं मागायला येणार नाही : राम शिंदे 

लयभारी न्यूज नेटवर्क 

जामखेड  : मागील पाच वर्षात मंत्रीपदाच्या माध्यमातून मतदारसंघातील मुलभूत प्रश्न मार्गी लावले. त्यासाठी करोडोंचा निधी खेचून आणला. आता पुढील पाच वर्षांत जामखेड तालुक्याच्या हक्काचे पाणी आणणारच. कृष्णा – भीमा – सीना स्थिरीकरण योजनेतून दुष्काळी जामखेड तालुक्यात जलक्रांती घडवून दाखवणार असे सांगत जर येत्या पाच वर्षांत जामखेडला पाणी नाही आणले तर 2024 च्या निवडणुकीत तुमच्याकडे मतं मागायला येणार नाही अशी घोषणा पालकमंत्री राम शिंदे यांनी केली.

पालकमंत्री राम शिंदे हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ जामखेड तालुक्यातील हळगाव, आघी, पिंपरखेड, कवडगाव या भागात आले होते. हा परिसर राम शिंदे यांचा होमग्राऊंड म्हणून ओळखला जातो. यावेळी हळगाव येथे आयोजित सभेत बोलताना त्यांनी वरील घोषणा केली. यावेळी जेष्ठ नेते किसनराव ढवळे, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात, माजी पंचायत समिती सदस्य तुषार पवार, पणन संचालक पांडुरंग उबाळे, माजी सरपंच दिगंबर ढवळे, माजी सरपंच राजेंद्र ढवळे, अहिल्यादेवी पतसंस्थेचे चेअरमन आबासाहेब ढवळे, अरूण पाटील, डाॅ अल्ताफ शेख, डाॅ बाळासाहेब बोराटे, बापुराव ढवळे, अंकुश ढवळे, काशीनाथ ओमासे, करण ढवळे, बंकटराव बारवकर, अरूण वराट आदी पदाधिकारी उपस्थित होते.

गड्याला चितपट करूनच बारामतीला पाठवुन देऊ

यावेळी पुढे बोलताना राम शिंदे म्हणाले की, गेल्या पाच वर्षात काम असं केलं की, दोन्ही तालुक्यातून उमेदवार उभा राहिला नाही, त्यांना बाहेरून उमेदवार आयात करावा लागला.आपलं नशीब बी लैय भारी आहे. आपल्याबरोबर कुस्ती खेळायला लांबून गडी आलाय, आता या गड्याला चितपट करूनच बारामतीला पाठवु. आमदारकीच्या दहा वर्षांत पहिली पाच वर्षे मी विरोधी पक्षाचा आमदार होतो. तेव्हा हिशोब देता आला नाही.पण मंत्रीपदाच्या पाच वर्षांत केलेल्या कामांचा गावा गावात फ्लेक्सबोर्ड लावून हिशोब दिला.आता आपल्या हक्काच्या माणसाला साथ द्या.

पुढील पाच वर्षात वाढीव तीन टीएमसी पाणी आणणारच

राम शिंदे पुढे म्हणाले,  कृषी महाविद्यालय उभारा अशी मागणी माझ्याकडे कुणीही केली नव्हती.मात्र आपल्या दुष्काळी भागातील शेतीला नवे दिवस आणण्याचे व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन हळगाव येथे 65 कोटी रूपये खर्चाचे कृषी महाविद्यालय मंजुर केले. आता पुढील पाच वर्षात वाढीव तीन टीएमसी पाणी आणणारच. हळगाव पिंपरखेड भागाला जोडणारे रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले. मंत्रीपदाच्या माध्यमांतून मी कधीच कुणाला त्रास दिला नाही. आता मलाही कुणी त्रास देऊ नये. गावातलं राजकारण बाजूला ठेऊन गावचा उमेदवार म्हणून मला हक्काने मताधिक्य द्या. निवडून आल्यावर या भागात पाणी आणूयात. दुष्काळी शेती समृध्द करूयात. तालुक्यातील ऊस उत्पादकांना न्याय देण्यासाठी लवकरच नवीन सहकारी साखर कारखाना उभारणार आहे.ऑक्टोबर 2021 मध्ये गळीत हंगाम सुरू होईल. देशात व राज्यात भाजपचेच सरकार येणार आहे. उगच वेगळा विचार करून आपल्या भागाचं नुकसान करून घेऊ नका असे अवाहन यावेळी त्यांनी जनतेला केले.

आष्टीच्या सुरेश धसांसारखा फाॅर्म्युला वापरला असता तर ?

सात खात्यांचा मंत्री होतो.तेव्हा त्या माध्यमांतून कुणालाही त्रास दिला नाही.ऊलट विरोधकांची कामे करत गेलो. जर आष्टीच्या सुरेश धसांसारखा फाॅर्म्युला कर्जत – जामखेडमध्ये वापरला असता तर एकही मत फुटले नसते. पण तुमच्या आमच्यात असलेलं प्रेमाचे नातं टिकलं पाहीजे यासाठी कधीच वेगळा मार्ग निवडला नाही. तुमच्या प्रेमाच्या शिदोरीमुळेच मी मोठा झालोय. कधीच कुणाला त्रास दिला नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी