30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयनरेंद्र मोदी मणिपूरला जळत ठेवून अमेरिकेच्या दौऱ्यावर चमकोगिरी करत होते; नाना पटोले...

नरेंद्र मोदी मणिपूरला जळत ठेवून अमेरिकेच्या दौऱ्यावर चमकोगिरी करत होते; नाना पटोले यांची जळजळीत टीका

रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता या प्रवृत्तीलाही लाजवेल असे असंवेदनशील पंतप्रधान भारताला लाभला आहे. विरोधी पक्ष जनतेची विचारपूस करण्यास जात असताना त्यांना रोखले जाते. राहुल गांधी यांना रोखल्याबद्दल भाजपा सरकारचा कॉंग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे. मणिपूरची जनता केंद्र सरकारच्या मदतीची आस लावून बसली आहे; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र मणिपूरला जळत ठेवून अमेरिकेच्या दौऱ्यावर चमकोगिरी करत होते, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. मणिपूर हिंसाचार प्रश्नी केंद्र सरकारला धारेवार धरलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी मणिपूरच्या लोकांचे दुःख जाणून घेण्यासाठी गेले होते. राहुल गांधी यांना रस्ते मार्गाने जाण्यास सुरुवातीला परवानगी दिली, मणिपूरची जनता हजारोंच्या संख्येने राहुल गांधींचे स्वागत करण्यास उभी होती. राहुल गांधी यांची लोकप्रियता पाहून भाजपा सरकार घाबरले व त्यांचा ताफा अडवून त्यांना परत पाठवले. राहुल गांधींना परत पाठवून स्थानिक लोकांवर पोलीसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. मणिपुरी जनता मोठ्या संख्येने राहुल गांधींना भेटण्यासाठी आलेली होती पण भाजप सरकारने त्यांना लोकांना भेटू दिले नाही. मोदी सरकार राहुल गांधी यांना घाबरले आहे. हे पुन्हा स्पष्ट झाले, असे पटोले यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी प्रेम, बंधुभाव आणि शांततेचा संदेश घेऊन मणिपूर येथे पोहचले होते पण मोदी सरकारला मणिपूर शांत व्हावे असे वाटत नसावे म्हणूनच राहुल गांधींना रोखण्यात आले. मणिपूर जळत असताना पहिले 25 दिवस केंद्राचा एकही प्रतिनिधी मणिपूरला गेला नाही. 25 दिवसानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मणिपूरला जाऊन आले पण मणिपुरच्या जनतेचा भाजपा व मोदी सरकारवर विश्वासच नाही म्हणून आजही मणिपूर जळत आहे. मणिपूरच्या आजच्या परिस्थितीला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार असल्याचे नाना पटोले म्हणाले.

हे सुध्दा वाचा:

शिंदे-फडणवीस सरकारकडून आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठींचे निलंबन मागे

संजू राठोडच्या ‘नऊवारी साडी’ या गाण्याने प्रेक्षकांना घातली भुरळ

सदशिव पेठ तरुणी हल्ला प्रकरण; तीन पोलिसांवर कारवाई

मणिपूरमध्ये पोलीस स्टेशनवर हल्ले होऊन शस्त्रे पळवली जात आहेत. प्रार्थना स्थळे जाळली जात आहेत. जीवित व वित्तहानी सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाली आहे पण मनमानी, लहरी, अडेलतट्टू स्वभावाचे केंद्र सरकार मात्र मणिपूरला अग्निकांडात होरपळत सोडून भाषणबाजी, इव्हेंटबाजी व जाहिरातबाजीत मग्न आहेत. मणिपूरच्या लोकांना राहुल गांधींना भेटू न देण्याच्या भाजपा सरकारल्या भूमिकेला केवळ मणिपूरच नाही तर देशातील जनताही माफ करणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी