30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयप्रतिभाताई पवार आत्मचरित्र लिहितील का ?

प्रतिभाताई पवार आत्मचरित्र लिहितील का ?

शरदचंद्र पवार हे भारतीय राजकारणातील एक असं नाव जिथे मी मी म्हणणारे गलितगात्र होतात. पण गेल्या काही दिवसांपासून पवारांवर चोहोबाजूंनी हल्ले होत आहेत. त्यातच आता त्यांचे पुतणे अजित पवार यांनी त्यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. इतकेच काय पण पवारांनी ज्यांना बोट धरुन राजकारणाचे धडे गिरवायला शिकवले असे दिलीप वळसे-पाटील, पवारांचे विश्वासू रामराजे नाईक निंबाळकर, छगन भुजबळ यांनी देखील पवारांची साथ सोडली आहे. गेली 50 वर्षे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात आपला दबदबा ठेवणारे पवार सख्ख्या आणि विश्वासू साथीदारांनी त्यांची साथ सोडली आहे.

या सगळ्यातून पवार खचणार नक्कीच नाहीत. परवाच त्यांना पत्रकार परिषदेत ‘पक्षाचा आश्वासक चेहरा कोण?’ असे विचारले असता हात वर करुन ”शरद पवार” असे म्हणत त्यांनी पत्रकाराची गुगलीवर विकेट घेतली होती. पण राजकीय प्रवासात त्यांच्यासोबत आणखी एक जो कधी राजकारणाच्या पटावर सहसा दिसला नाही असा विश्वासू साथीदार राहिला आहे, तो म्हणजे त्यांची पत्नी प्रतिभाताई पवार!

शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीत प्रतिभाताई तशा खुपच कमीवेळा राजकीय कार्यक्रमात त्यांच्या सोबत दिसल्या. शरद पवार यांच्या ”लोक माझे सांगाती” या आत्मचरित्राच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात त्या त्यांच्यासोबत होत्या. याच कार्यक्रमाला उपस्थित असलेले ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी प्रतिभा पवारांनी आत्मचरित्र लिहावे असे म्हटले होते. याच कार्यक्रमात शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्या त्यांच्यासोबत होत्या. सगळ्या गदारोळात प्रतिभाताई पवार शांत होत्या. त्यानंतर शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा यासाठी अनेकांनी विनवण्या केल्या. त्यानंतर शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला.

यापूर्वी देखील सन 2019 साली अजित पवार यांनी बंड करत फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी शरद पवार हे बंड मोडून काढण्यात यशस्वी ठरले होते. मात्र अजित पवार आपल्या काकी प्रतिभाताई पवार यांचा शब्द डावलत नाहीत असे म्हटले जाते. प्रतिभाताई पवार यांच्यासोबत बोलणे झाल्याने अजित पवार परत आल्याच्या चर्चा देखील त्यावेळी माध्यमांमध्ये झाल्या. प्रतिभाताई पवार शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीत जरी जास्त प्रकाश झोतात राहिल्या नसल्या तरी अलिकडे मात्र त्या नेहमी पवारांसोबत दिसून आल्या. अजित पवारांनी पवारांची साथ सोडल्यानंतर  दोन्ही गटांच्या मुंबईत बैठका होणार होत्या. त्या  बैठकीच्या आदल्या दिवशी सायंकाळी  पुण्याहून पवारांसोबत त्यांच्या गाडीत प्रतिभाताई पवार देखील त्यांच्या सोबत आल्या होत्या. यावेळी माध्यमांनी कॅमेरे त्यांच्यावर रोखले त्यावेळी कार्यकर्त्यांची गर्दी, प्रेम पाहून प्रतिभाताई पवार यांना आपला दाटून आलेला हुंदका आवरता आला नाही. त्यांच्या बाजूला 83 वर्षांचे शरद पवार देखील होते.

इतक्या वर्षात प्रतिभाताई पवार यांना कधीही पवारांच्या राजकारणाबाबत कमीअधिक बोलावे वाटले नाही. आज मात्र त्या त्यांच्या पाठीशी ठामपणे असल्याचे दिसून आले. कारण फोडाफोडीचे हे राजकारण कुटुंबापर्यंत आले होते. पवार कुटुंबावर आलेल्या अशा बिकटवेळी प्रतिभाताई पवार मोठ्या हिंमतीने शरद पवारांसोबत दिसून येत आहेत. एका बाजूला मुलगी सुप्रिया सुळे यांचे राजकीय भवितव्य, पती शरद पवार यांचे वय, आरोग्य आणि करावा लागत असलेला राजकीय संघर्ष आणि पवार कुटुंब. ही सगळी प्रतिकुल परिस्थिती त्यांच्यासमोर आहे.

शरद पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक डाव-प्रतिडाव केले. ते राज्याचे चारवेळा मुख्यमंत्री होते. केंद्रात संरक्षणमंत्री, कृषी मंत्री अशापदांवर देखील त्यांनी काम केले. अतिशय उमेदीच्या काळात असताना त्यांनी वसंतदादांचे सरकार पाडून पुलोदचा प्रयोग घडवून आणला. 1999 साली काँग्रेसमधून निलंबन झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. काँग्रेसी विचारधारेला वाहिलेलाच हा पक्ष राहिला असला तरी पवारांच्या अनेक राजकीय भूमिकांवर वेळोवेळी संशय व्यक्त केला. 2014 साली मोदींचे सरकार आल्यानंतर त्यांनी भाजपसोबतचे संबंध वाईट होऊ दिले नाहीत. मात्र 2019 मध्ये पवारांनी राज्यात महाविकास आघाडीचा मोठा प्रयोग घडवून आणला. सबंध देशात या प्रयोगाची चर्चा झाली. शिवसेनेसोबत काँग्रेसला त्यांनी एकत्र आणून सत्ता स्थापन केली. हे सरकार अडीच वर्षांनी पडले. ज्यापद्धतीने शिवसेनेत फुटाफुट झाली तशीच फुटाफुट एकवर्षांनी आता राष्ट्रवादीत झाली, आणि उतारवयात पवारांना संघर्षासाठी बाहेर पडावे लागले. यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचे दर्शन घेऊन ते रणात उतरले देखील.

हे सुद्धा वाचा

रिषभ पंतनंतर या भारतीय माजी वेगवान गोलंदाजाचा अपघात, मुलगाही जखमी

छगन भुजबळांच्या टीकेला जयंत पाटलांचे तोडीसतोड उत्तर

भुजबळ पवारांना म्हणाले, तेव्हा त्यांना देखील असेच वाईट वाटले असेल

मात्र पवारांसोबतचा प्रतिभाताई पाटील यांचा भावूक चेहरा पवारांच्या निष्ठावानांचे मन हेलावून गेला. जितेंद्र आव्हाड, दिल्लीतील युवा नेत्या सोनिया दुहान यांनी हे फोटो सोशल मीडियावर देखील पोस्ट केले. काळजाचा पहाड असलेले शरद पवारांच्या मानाला देखील प्रतिभाताईंचा गहिवरलेला चेहरा पाहून कष्ट झाले असेल. राजकिय आयुष्यात कधीही पवारांनी कधीही असा प्रसंग कदाचित पाहिला नसावा. पवारांच्या या संबंध राजकीय आयुष्यात त्यांच्यासोबत कुठेही पुढे न येता पाठीशीच राहिलेल्या प्रतिभाताई पवार यांचे देखील अनेक अनुभव असावेत. त्यांनी देखील अनेक प्रसंग पाहिलेले असावेत. आता वयाच्या अशा टप्प्यात पवारांचा संघर्ष पहावा लागत आहे. पवार यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन कार्यक्रमात प्रतिभाताई पवार यांनी देखील आत्मचरित्र लिहावे असे कुबेर यांनी म्हटले होते. प्रतिभाताई पवार या तशा सार्वजनिक ठिकाणी खुपच कमी बोलतात. दिसतात. मात्र आपले अनुभव खरेच त्या आत्मचरित्रातून खरेच मांडतील का?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी