31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
HomeराजकीयDevendra Fadnavis : काँग्रेस – राष्ट्रवादीतील सरंजामदारांना वठणीवर आणणारा नेता ( सदाभाऊ...

Devendra Fadnavis : काँग्रेस – राष्ट्रवादीतील सरंजामदारांना वठणीवर आणणारा नेता ( सदाभाऊ खोत )

सदाभाऊ खोत, माजी कृषी राज्यमंत्री

सध्या महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस ( Devendra Fadnavis ) या कर्तबगार राजकीय व्यक्तीमत्वाविरोधात सोशल मीडियावर गांजण्या उठवण्याचं काम पद्धतशीर सुरू आहे. शहरी भाषेत याला ट्रोलींग म्हणतात. आमच्याकडे त्यासाठी गांजण्या उठवणे हा समर्पक शब्द आहे. यासाठी काही प्रस्थापित राजकीय घराणी कार्यरत आहेत.

पूर्वी राजाच्या पदरी भाट, खुशमस्करे असायचे. राजाची स्तुती आणि विरोधकांची निंदानालस्ती केली की त्यांना बिदागी मिळायची. कालांतराने राजेशाही लोप पावली. पण ‘सुंभ जळाला तरी पीळ गेला नाही’ या उक्तीप्रमाणे लोकशाहीतही ही ऐतखाऊ आणि लुटारू सरंजामी अवलाद ठिकठिकाणी जळू प्रमाणे सामान्य बहुजनांचे रक्त शोषित राहिली आहे.

Devendra Fadnavis
जाहिरात

आपले विकृत रूप जनतेसमोर येवू नये, सरंजामदारांचे शोषण बहुजन तरूणांच्या नजरेस पडू नये म्हणून सोशल मीडियावर विकृत विचारांची विषपेरणी होत आहे. विशिष्ट व्यक्तींना लक्ष्य करून दिशाभूल केली जात आहे.

देवेंद्रजी फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्यासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तीविरूद्ध प्रस्थापितांना एकही मुद्दा सापडत नाही. त्यामुळे सत्ताधारी गटाचे भाडोत्री ट्रोलर्स उर्फ टाळकुट्यांना एकच काम देण्यात आले आहे. काहीही करा पण फडणवीसांना ( Devendra Fadnavis ) बदनाम करण्याची एकही संधी सोडू नका. त्यासाठी पैसे देवून माणसं बसवण्यात आली आहेत.

या सरंजामदारांच्या पोटात एकच भिती आहे. सामान्य जनतेसाठी काम करणारे फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्यासारखे बहुआयामी, समाजातील सर्व घटकाना सांभाळून घेणारे नेतृत्व पुन्हा सत्तेवर आले तर काय करायचे. मला काही काळ त्यांच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली. सर्वसामान्यांसाठी सदैव संघर्षाला तयार असणारे नेतृत्व या शब्दांत त्यांचे वर्णन करावे लागेल.

त्यांच्यावर होणारे विकृत मनोवृत्तीचे आरोप बघितले की, मला शरद जोशी यांच्या संघर्षाची आणि त्यांच्यावर झालेल्या जातीवाचक आरोपांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. १९८० च्या नाशिकच्या ऊस आंदोलनामुळे महाराष्ट्रातील सरंजामदारांच्या पारंपारिक गढ्या हादरून गेल्या.

शरद जोशी यांच्या झंझावाती नेतृत्वाने शेतात राबणाऱ्या मराठा समाजातील सर्वसामान्य उस उत्पादकांना भरघोस दरवाढ मिळाली. ऊसाचा दर १४५ रूपयांवरून ३०० रूपये असा दुप्पट झाला. त्यांना मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद बघून सरंजामदारांच्या अवलादी घाबरल्या.

शेतकरी संघटनेचे तुफानी वक्ते आदरणीय माधवराव खंडेराव मोरे अशाना “नमक हराम अवलाद” म्हणायचे. शरद जोशींच्या विचाराने त्याकाळी या अवलादी अशाच पिसाळल्या होत्या. त्यांच्या सभेला होणारी मराठा समाजातील लाखो तरूणांची गर्दी.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याप्रमाणे हातात आंदोलनाची तलवार घेवून प्रस्थापितांविरोधात जिवाची पर्वा न करता मराठमोळा तरूण पेटून उठला होता. आता हे वादळ आपल्याला मुळासकट उपडून टाकतंय या भितीने सरंजामदार गर्भगळीत झाले.

Devendra Fadnavis : काँग्रेस – राष्ट्रवादीतील सरंजामदारांना वठणीवर आणणारा नेता ( सदाभाऊ खोत )

सहकारातील आपली वतनदारी नष्ट होणार या चिंतेने ग्रासलेल्या या सरंजामदारांनी चळवळीत जातीयवादाचे विष पेरून मराठा समाजातील तरूणांना विचलित करण्याचा प्रयत्न केला. शरद जोशी या क्रांतीकारी महामानवाची जात काढली गेली. या बामणाला शेतीतले काय कळतय अशी विकृत हाकाटी पिटण्यात आली. जेव्हा कर्तृत्ववान नेत्याचा प्रतिवाद करता येत नाही तेव्हा जातीचा आधार घेण्याची हीन पातळी गाठली जाते.

आज देवेंद्रजी फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या बाबतीत हेच घडतंय. खरंतर ते आज सत्तेत नाहीत तरीही प्रस्थापितांचे भाडोत्री टाळकुटे त्यांना घाबरून सोशल मीडियावर शंखध्वनी का करत आहेत ? याचे कारण अगदी स्पष्ट आहे. फडणवीसांनी त्यांच्या कार्यकाळात बहुजन समाजाठी घेतलेल्या अनेक निर्णयाने घायाळ झालेल्या मराठा समाजातील सत्तापिपासू ठेकेदारांना अपराधी भावनेने ग्रासले आहे. हे मी मराठा समाजातील एक कार्यकर्ता  म्हणून जाहीरपणे सांगायला तयार आहे.

समाजाचा ठेका घेतल्याचा आव आणणाऱ्यांना माझे खुले आवाहन आहे, त्यांनी एका व्यासपीठावर यावे. ६५ वर्षात जे जमले नाही ते देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadnavis ) करून दाखवले. हे मी पुराव्यानिशी सांगायला तयार आहे. त्यांच्या ५ वर्षाच्या संघर्षमय काळातील अनेक निर्णय सांगता येतील.

काँग्रेसने शेतकऱ्यांचे ऊस उत्पादकांचे रक्त सांडल्याशिवाय ऊसउत्पादकांचा प्रश्न सोडवला नाही. लाठीमार, गोळीबार आणि पोलीस अत्याचाराशिवाय आम्हा ऊसउत्पादकांचा प्रश्न कधी मार्गी लागला नाही. साखर कारखाने कोणाच्या ताब्यात आहेत? समाजाच्या नावाने खोटा गळा काढणाऱ्या या उच्चकुलीन सरंजामदारांची निरंकुश सत्ता तिथे आहे.

पिढ्यान पिढ्या सत्ता उपभोगण्याचा ठेका यांच्याचकडे आहे. मन मानेल अशा पध्दतीने कारखाने चालवून सामान्य मराठा तरूणांना गुलाम बनविण्याचे षडयंत्र या सरंजामदारांनीच रचले. या विरोधात स्वाभिमानाने बोलले तर पाणी बंद, ऊस रानात वाळवायचा, कर्जपुरवठा थांबवायचा,सभासद करून घ्यायचे नाही.

विरोधात बोलले तर सभासदांच्याच पैशावर पोसलेले गुंड शेतकऱ्यांच्या अंगावर सोडायचे. कारखाने जणू यांच्या बापाचीच मालमत्ता झाली होती. सर्वसाधारण सभेत प्रश्न विचारायची सोय नाही. भाडोत्री गुंडांनी लोकशाहीचा गळा घोटायचा. पोलीस नामक यंत्रणा या सरंजामदारांच्याच दिमतीला. देतील तो दर घ्यायचा. संचालक मंडळात यांचीच मुले, पै पाव्हणे अशांचीच वर्णी. नोकरभरतीत महत्वाच्या जागी यांचेच नातलग आणि चमच्यांची भरती.

सामान्य बहुजन कार्यकर्त्यांच्या हाती फराळातील दोन लाडू आणि मऊ पडलेला चिरमुऱ्यांचा चिवडा. यांची दानत एवढी मोठी की, भडंगातील शेंगदाणे ही खवट आणि कडू. चेअरमनकी, आमदारकी यांच्याच घरात. सामान्य मराठा तरूणांच्या हातात झेंड्याच्या काठ्या आणि कधीतर हातात पडणारी जेवणाची आणि दारूची कुपने.

सुतगिरण्या आणि शिक्षण संस्थेत यांचाच गोतावळा. सामान्य मराठा तरूणांची कोंडी या उच्चकुलीन सरंजामदारांच्या राजवटीत झाली होती. अशा खदखदणाऱ्या अवस्थेत मराठा आरक्षणाचे आंदोलन उभे राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्य करणाऱ्या या सरंजामदारांनी सत्तेत असताना कितीतरी दिवस सामान्य मराठा तरूणांना झुलवत ठेवले.

कोंढलेल्या अवस्थेत सापडलेल्या मराठा समाजातील तरूणांनी आरक्षणाची चळवळ उभी केली. या चळवळीला कायदेशीर चौकटीत बसविण्याचे ऐतिहासिक काम देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी कुशलतेने पार पाडले. त्यांचा हा ५ वर्षाचा काळ प्रचंड संघर्षाचा होता. त्यांच्याच काळात शेतकरी संपाचा प्रश्न उभा राहिला.

कर्जमाफीची योजना जाहीर झाली. फडणवीस यांना कोंडीत पकडून त्यांच्या राजकीय कारकीर्दीची कबर बांधण्याचा प्रयत्न झाला. पण देवेंद्रजी या सगळ्यांना पुरून उरले. धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटवण्यात आला. खरेतर ज्यांनी ६० ते ६५ वर्षे सत्ता भोगली त्यांनी हा प्रश्न जाणीवपूर्वक भिजत ठेवला. हातचलाखी करून या प्रश्नाला सतत बगल देण्यात आली.

सत्तेच्या उबेला सोकलेली प्रस्थापित घराणी त्यांच्यावर वार करीत राहिली. मराठा आरक्षणाचे प्रणेते कोण असतील तर ते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांची मराठा समाजाला जाणीव आहे. म्हणूनच सरंजामी वृत्तीच्या बांडगुळांकडून जाणीवपूर्वक त्यांच्या प्रतिमेवर चिखलफेक सुरू आहे.

मराठा आरक्षणाचे श्रेय देवेंद्र फडणवीसांना ( Devendra Fadnavis ) गेले तर मराठा समाजात आपली काही किंमत उरणार नाही. आपले राजकारण संपून जाईल ही भीती या सरंजामदारांना सतावत आहे. म्हणून सामाजिक माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस यांची जात काढण्याचे हीन पातळीवरील राजकारण खेळले जात आहे.

Mahavikas Aghadi

मी ही मराठा समाजात जन्माला आलो आहे. राजकारणातील प्रस्थापित सरंजामीवृत्तीच्या मराठा नेत्यांना माझे आवाहन आहे. गावगाड्यातील जमदाडे, चव्हाण, खोत, सुर्यवंशी, औताडे, धुमाळ, शिंदे, जाधव, बाबर, नांगरे असे अनेक आडनाव असलेले मराठा समाजातील आहेत. अशांच्या बरोबर सोयरीक करायला किती पुढे आले हे आम्ही डोळ्यांनी बघितले आहे.

आमच्यासारख्या सर्वसामान्य मराठा शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी केलेले काम आम्ही विसरणार नाही. ऊसाचा दर पाडून शेतकऱ्यांना दारिद्र्यात खितपत पाडण्याचे कुटिल डाव हे सरंजामदार वृत्तीचे कारखानदार वर्षानुवर्षे खेळले. पण देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadnavis ) केंद्रातून साखरेचा हमीभाव ठरवून आणला आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आयुष्याला एक प्रकारची स्थिरता प्राप्त करून दिली.

कोडोलीला रयत क्रांती संघटनेच्या ऊस परिषदेत बहुसंख्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीला न्याय मिळवून दिला. असे अनेक निर्णय सांगता येतील. सत्तेत आल्यावर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी दूध प्रतिलिटर २७ रूपये दराने खरेदी करण्याचा शासकीय आदेश काढला. पण प्रस्थापित दूध संघवाल्यानी उच्च न्यायालयात जावून स्थगिती आणली.

दूधाचे दर कोसळले. गायीच्या दूधाला १८ रूपये इतका कमी दर मिळू लागला. शेतकऱ्यांना आधार देणारा जोडधंदा अडचणीत आला. दूध आंदोलन झाले. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी लिटरला ५ रूपये अनुदान देवून शेतकऱ्यांना दिलासा दिला. आज पुन्हा तीच स्थिती आली आहे.

दूधाचे दर कमी झाले आहेत. पण दूध संघवाल्यांचे सरकार शेतकऱ्यांच्याकडे ढुंकूनही बघायला तयार नाही. अमूल, मदर डेअरी सारख्या व्यावसायिक पद्धतीने दूध संकलन करणाऱ्या दूध संघांना उत्तेजन देवून प्रस्थापित दूध संघवाल्यांच्या मनमानी नफेखोरीला देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी चाप लावला.

दूध व्यवसायात स्पर्धा लागल्यावर शेतकऱ्यांना लुटण्याचे कुरण कायमचे हातातून जाणार या भितीने सत्तेला सोकलेल्या बोक्यांनी सोशल मीडियात मलई पेरून देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना ट्रोलींग करण्यासाठी टोळके नेमले आहेत पण आता या बोक्यांच्या मिशा उपटण्याचे काम सर्वसामान्य जनता केल्याशिवाय राहणार नाही.

हे सुद्धा वाचा

BJP’sHypocrisy : भाजपचा आणखी एक खोटारडेपणा : जुना व्हिडिओ प्रसारीत करुन ठाकरे सरकारची बदनामी

Gopichand Padalkar MLC : देवेंद्र फडणविसांनी गोपीचंद पडळकरांमधील ‘हे’ गुण हेरले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी