31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
Homeसंपादकीय21daysLockdown : माजी आयएएस अधिकाऱ्याच्या घरातील वातावरण ( भाग 2 )

21daysLockdown : माजी आयएएस अधिकाऱ्याच्या घरातील वातावरण ( भाग 2 )

‘लॉकडाऊन’मुळे ( 21daysLockdown ) प्रत्येकाचे दैनंदिन जीवन बंदिस्थ झाले आहे. प्रत्येकाचाच दिवस बदलला आहे. सामान्य लोकांना घराच्या खुराड्यात नकोसे वाटू लागले आहे. या पार्श्वभूमीवर माजी आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या सौभाग्यवती अनुराधा प्रभाकर देशमुख यांनी त्यांच्या घरातील वातावरणाबद्दल ‘लय भारी’साठी लेख लिहिला होता ( लेखाचा पहिला भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा ). त्यानंतर दुसरा लेख त्यांनी पुन्हा लिहिला आहे. ‘लॉकडाऊन’चा स्वतःसाठी, नातलगांसाठी व समाजासाठी त्यांचे कुटुंबिय कसा चांगला उपयोग करीत आहे याचे अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले आहेत.

‘लॉकडाऊन’मधील दुसरा दिवस

आज सकाळी मुद्दामच चहाचा ट्रे घेऊन मुलाच्या रूम मध्ये गेले. सकाळचे 6:45 वाजले होते. मुलाने ना खुषीनेच रूमचा दरवाजा उघडला. आई हातात चहाचा ट्रे घेऊन आली आहे  हे त्याने पाहिले. मग पटकन माझ्या हातातील ट्रे घेतला (गुणी बाळ). थोड्याशा नाराजीच्या सुरातच बाळ म्हणाले, आई झोपु दे ना, थोडा वेळ. ऑफिसला माझ्या सुटी आहे. आमचे ‘वर्क फ्रॉम होम’ ( 21daysLockdown ) 10 नंतर सुरू होणार आहे.

मी म्हटले, ब्रश तर कर. आज चहा एकत्र घेऊ. उद्यापासून झोप निवांत.

चहा घेता घेता मुलाशी गप्पा सुरू झाल्या.  ‘ कसं आहे बाळा, आपल्याला 21 दिवस ( 21daysLockdown ) एकत्र राहायचे आहे. खूप मोठा सहवास लाभला, की मग एकमेकांच्या चुकाच आपल्याला दिसतील.  तुला वाटेल, सुटी आहे. उशिरा उठावं. आम्हाला वाटेल, तू लवकर उठून आमच्याबरोबर योगा करावास आणि तुझा दिवस मोठा करावा. तुला वाटेल, काय यांची कटकट. आता कसे राहायचे 21 दिवस यांच्याबरोबर ?.

पण बेटा एक सांगते, मनापासून ऐक.  तुला आमच्या काही सवयी पटणार नाहीत. आम्हाला तुझ्या काही सवयी पटणार नाहीत. त्यापेक्षा आपण एक डील करूयात. तू आम्हाला सहन कारायचेस व आम्ही तुला सहन करणार. आपण छान राहू. मस्त राहू. ‘कोरोना’मुळे ( 21daysLockdown ) आपण सक्तीने एकत्र आहोत. पुन्हा एवढे दिवस आयुष्यात आपण एकत्र असणार नाही. वाईटात चांगले शोधू. सकारात्मक दृष्टीकोन ठेवू. मुलाला पटले व त्याने छान टाळी दिली.

माझे म्हणणे त्याला पटले खरे, पण त्यावर त्याने लगेच टिपण्णी केली, ‘आई आता म्हणतेस अशी. पण चुकून बाथरुमची लाईट चालू राहिली की म्हणू नकोस, लाईट चालूच आहे. लाईट चालू दिसली की, मनातल्या मनात म्हण की, आपण याला सहन करायचे आहे.’ हे वाक्य बोलून तो मिश्किलपणे हसला देखील. खरतर मला त्याने चपराकच मारली होती.

मला सर्वच पालकांना सांगावेशे वाटते की, आपली मुलं अशी कधीच परत आपल्याजवळ थांबणार नाहीत. त्यामुळे हे क्वॉरंटाईनचे दिवस ( 21daysLockdown ) त्यांच्यासाठीही व आपल्यासाठीही सुखावह करूयात. बाथरुमची लाईट का चालू ठेवली, ओला टॉवेल का बेडवर टाकला, नेल कटर जागेवरच का ठेवला नाही, असे उपदेश आपण सतत मुलांना देत असतो.

पण आज आपल्याला त्या लाईटच्या बिलापेक्षा, त्या ओल्या टॉवेलपेक्षा किंवा आणखी कोणते वळण लावण्यापेक्षा, महत्वाचं आहे तो म्हणजे  एकमेकांचा सहवास. सहवास अधिक सुखावह करणे, त्यात गुणवत्ता जोपासणे, एकमेकांची attachment कशी वाढेल ते पाहणे.

प्रत्येक बापाला वाटत असते की, मी माझ्या मुलाला हे सांगायला हवे किंवा आईला वाटत असते मुलीला हे शिकवायला हवे. पण तसे करण्याच्या नादात आपण एकमेकांपासून लांब तर जात नाही ना, हे पाहायला हवे. गप्पा मारताना आई वडिलांनी उगीच मागच्या जुन्या गोष्टी काढू नयेत. गरिबी, कष्ट हे मुलांना सांगत बसायला नको. तुमची मुले तुमच्या पोटी चांदीचा चमचा घेऊन जन्माला आली आहेत. यात मुलांचा काय दोष. त्यापेक्षा त्यांच्या बरोबर बसून त्यांच्या व आपल्या future प्लांनिंगबद्दल चर्चा करा. त्यांचे पुढील प्लॅन काय असणार आहेत त्याबद्दल विचारा.

मुलासोबत गप्पा झाल्या. नंतर घरातील कामेही आटोपून घेतली. आज जरा कुंड्याकडे लक्ष देऊया असे ठरवले. वरती टेरेसवर मी खूप कुंड्या ठेवल्या आहेत. घरातील हेल्पर मावशी व त्यांच्या मुलीला घेऊन टेरेसवर गेले. कुंडीतील झाडांची अवस्था पाहून तर डोळे भरून आले. दोन महिन्यांत आमचा helper च झाडांना पाणी घालत होता. तो पाईप कुंडीत सोडायचा. कुंडीतून पाणी खाली वाहिले की, दुसऱ्या कुंडीत पाईप. त्यामुळे सर्व कुंड्यांमध्ये माती अर्धीच राहिली होती. माझी आई नेहमी आम्हाला लहानपणी सांगायची, जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार संपला. मला आमच्या आईच्या त्या उक्तीची आठवण झाली.

आमच्या हेल्पर – मावशींची मुलगी, सुप्रिया बारावीची परीक्षा देऊन आली, अन् कोरोनामुळे ( 21daysLockdown ) माझ्याकडेच अडकली. तिला मी कुंडीतील झाड कसे बाहेर काढायचे. पुन्हा कुंडीत खाली थोडे विटांचे तुकडे खत – माती मिक्स करून,  झाडांच्या अनावश्यक मुळ्या कट करून झाड पुन्हा कसे लावायचे याचे धडे दिले. काही थोडे दिवस आता सावलीत ठेवायचे व चांगले लागले की, नंतर उन्हात ठेवायचे.

मला नेहमी वाटते, घर कितीही लहान असो वा मोठे, तीन – चार कुंड्या तरी दारात असाव्यात. तुळशीच्या दोन फुलांच्या व दोन हिरव्यागार पानांच्या घरात कुंड्या असल्या की जिवंतपणा असतो. एकटे असले तरी घरात बोअर होत नाही (हा माझा कन्सेप्ट हं ).

सुप्रियासोबत माझे हे सगळे सुरू होते. तेवढ्यात आमच्या समोर राहणारा मुलगा – मधुर वरती आला. मला म्हणाला, काकी आम्ही तुमच्या 4 – 5 कुंड्या घेऊन गेलो आहे. आमच्या फ्लॅटमध्ये. पुन्हा आणून देईन. काही हरकत नाही, मी त्याला म्हणाले. त्या ठेऊन दुसऱ्या घेऊन जा. फक्त सावलीतून आणून डायरेक्ट उन्हात नको ठेवूस असे त्याला सांगितले.

कुंड्यांची काळजी कशी घ्यायची हे सर्व सुप्रियाला सांगून झाल्यावर मी तिला म्हणाले, आपल्या नातेसंबंधाचेही असेच असते. प्रत्येक नात्याची वेळेवर काळजी घ्यावी लागते. झाडांना जसे खत – पाणी घालतो, तसेच नात्यांशीही वेळेवर संपर्क ठेवायला हवा. नात्यांचीही वेळेवर मशागत करायला हवी. झाड उपटून पुन्हा लावले की, त्याला थोडे दिवस जसे सावलीत ठेवावे लागते तसेच जेव्हा एखादी मुलगी लग्न होऊन आपल्या घरी येते तेव्हा तिलाही आपण थोडे दिवस सावली द्यायला हवी. नाही का ?. आणखी महत्वाचे, जी माणसे झाडांवर, प्राण्यांवर प्रेम करतात ती माणसे माणसांवर खूप प्रेम करतात. म्हणून घरात चार कुंड्या तरी हव्याच.

घरी आले. स्वच्छ हातपाय धुतले व पुन्हा जुन्या नात्यांना, मैत्रीला खत – पाणी घालण्यासाठी फोन हातात घेतला.

आपल्या नखाच्या बाजूची एवढीशी साल जरी निघाली तरी सारखे लक्ष तिकडे लागते. तसेच असते नातेसंबंधांचे. आपण कितीही मनाला म्हटले, मला काही फरक पडत नाही एखादे नाते तुटले तरी. तरीसुद्धा सुखाच्या क्षणी त्या तुटलेल्या नात्याची आठवण मनातल्या मनात येतेच. म्हणूनच सारखी मनात रुखरुख ठेवण्यापेक्षा चला, आपले नातेसंबंध सुधारूया. स्वतःच्या मनावरील ओझे कमी करण्यासाठी, स्वतःच्या आनंदासाठी स्वतःच दोन पावले मागे येऊया. मी नेहमी हेच करीत असते.

दुपारी ४ वाजता जरा खाली जायचा विचार केला. पाय मोकळे करणे हा माझा हेतू. पण तिथे आमची कदम साहेबांची मुलगी – सृष्टी त्यांच्या फ्लॅटच्या भिंतीच्या बाजूला काहीतरी पाहत होती. मी विचारले, काही शोधत आहेस का ?.  ‘ नाही हो मावशी, आमच्या एसीच्या होलमधून खूप आवाज येत होता. म्हणून मी थोडे आतून काठीने हलविले तर बाहेर पोपटांचा खूप आवाज यायला लागला. माझ्याकडून त्यांची अंडी किंवा पिल्लं तर होलमधून पडली तर नाहीत ना हे पाहतेय. थँक गॉड असे काही झाले नाही. नाहीतर मला फार वाईट वाटले असते. दिवस चांगला गेला नसता माझा.’ सृष्टीच्या या संवेदनशिलतेबद्दल मला कौतुक वाटले. अशी संवेदनशिलता जगात शिल्लक आहे. म्हणून तर जग चालले आहे.

‘लॉकडाऊन’मधील तिसरा दिवस

आदल्या रात्री आमच्या ओळखीचे आयपीएस अधिकारी प्रवीण इंगवले यांचा फोन आला होता. त्यांचे पोस्टिंग मणिपूरला आहे. त्यांनी मला विचारले, देशमुख साहेबांचा वेळ कसा जातोय. त्यांना तर कधीच निवांत बसलेले पाहिलेले नाही. मी म्हणाले, ते शरीराने पुण्यात आणि मनाने माण – खटावमध्येच आहेत.

गेल्या आठवड्यात – लॉकडाऊनच्या ( 21daysLockdown ) अगोदर प्रभाकर देशमुख साहेब गावी गेले होते. खूप लोक त्यांना घरी भेटायला यायचे. ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी त्यांनी पुण्याला परत येण्याचा नाईलाजाने निर्णय घेतला. ते पुण्यात परत आल्यानंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन ( 21daysLockdown ) जाहीर झाला. त्यामुळे त्यांना पुण्यात थांबण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

माण तालुक्यातील मलवडी गावातून एकजणाचा फोन आला होता. मलवडी गावचे एक पोलिस कॉन्स्टेबल संजय मगर, जे ऑर्थर रोड जेलमध्ये सर्व्हिसला आहेत. दोन दिवसांपूर्वी ते कामावरून बाईकने घरी परत जात होते. तब्बल ४८ तास त्यांनी ड्यूटी केली होती. नाशिकवरून येत असलेल्या एका पोलीस गाडीने त्यांना उडविले. त्यांच्या सहकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. संजय मगर जखमी झाले. अनेक ठिकाणी ते फ्रॅक्चर सुद्धा झाले. त्यांना मुलुंडच्या फोर्टिस रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांचे तात्काळ ऑपरेशन करणे गरजेचे होते. पण पाच लाख रूपये तातडीने जमा करा असे रूग्णालय प्रशासन सांगत होते. यावर काहीतरी मार्ग काढण्यासाठी मगर यांच्या नातेवाईकांनी देशमुख साहेबांना फोन केला होता.

देशमुख साहेबांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे यांना संपर्क साधला. मगर यांच्या अपघाताची सगळी माहिती त्यांच्या कानावर घातली. मगर यांना मदत करणे गरजेचे असल्याचेही सांगितले. मगर हे कामावर असताना अपघात झाला असल्याचेही निदर्शनास आणून दिले. निवृत्त आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनाही देशमुख साहेबांनी संपर्क साधला. बोरवणकर मॅडम यांनी यापूर्वी तुरूंग अधिकारी म्हणून काम केले होते. त्यामुळे देशमुख साहेबांनी त्यांना मगर यांना मदत करण्याची विनंती केली. त्यावर बोरवणकर मॅडमनी काहीतरी हालचाली केल्या. काही वेळानंतर बोरवणकर मॅडमचा परत फोन आला. आमचे अधिकारी हॉस्पीटलमध्ये जाऊन सर्व कार्यवाही करतील. हॉस्पीटल आता पैसे मागणार नाही, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पलांडे साहेबांनीही रूग्णालयापर्यंत सूचना पोहोचविल्या होत्याच.

सरकारी सेवेत असल्यापासूनच देशमुख साहेब सतत सामाजिक भावनेतून काम करतात. निवृत्तीनंतर माण – खटावमध्ये त्यांनी बरेच लक्ष घातले. नंतर निवडणुकही लढविली. त्यामुळे देशमुख साहेबांचा माण – खटावच्या घराघरांत चाहता वर्ग आहे. लोक त्यांच्या विविध समस्यांसाठी देशमुख साहेबांना फोन करीत असतात. देशमुख साहेबांनाही लोकांची कामे करायला आवडते.

परवा मायणीवरून प्रगतशील शेतकरी अनिल दबडे यांचा फोन आला होता. ‘कोरोना’मुळे ( 21daysLockdown ) आमची द्राक्षे मार्केटला जात नाहीत. द्राक्षे काढण्यासाठी मजूर लागतात. कोल्ड स्टोरेजला पाठविण्यासाठी ट्रक नाहीत. तरी आपण कलेक्टर साहेबांना सांगावे. आमची द्राक्षे कोल्ड स्टोरेजला पाठविण्यासाठी ट्रक उपलब्ध व्हावा. मजुरांकडून द्राक्षे काढण्यासाठी व पॅकिंगसाठी आम्हाला कलेक्टरसाहेबांकडून मंजुरी हवी आहे. आम्ही सोशल डिस्टन्शिंग ठेवून मजुरांकडून काम करून घेऊ, असे दबडे यांचे म्हणणे होते.

खरेतर, दबडे यांची ही समस्या महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातीलच अनेक शेतकऱ्यांची आहे. गेल्या वर्षाचा दुष्काळ. त्यानंतर अती पाऊस आणि आता पडलेला अवकाळी पाऊस अशी संकटे शेतकऱ्यांवर आली. त्यातूनही शेतकऱ्यांनी आपली पीके कशीतरी वाचवली. त्यातच ‘कोरोना’मुळे आलेल्या ‘लॉकडाऊन’चे ( 21daysLockdown ) संकट त्यांच्यावर कोसळले.

दबडे यांचे म्हणणे ऐकल्यानंतर देशमुख साहेबांनी सातारा कलेक्टरांना फोन केला. परिस्थितीची सगळी माहिती दिली. द्राक्षं कोल्ड स्टोरेजपर्यंत घेऊन जाण्यासाठी वाहतूकीला परवानगी द्यावी, अशी त्यांना विनंती केली. सातारा कलेक्टर साहेबांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.

दोन दिवसांपूर्वी गावावरून देशमुख साहेबांना एका शेतकऱ्याचा फोन आला होता, आप्पा गहू काढणी चालू आहे. पावसाचे बळ दिसत आहे. गहू मळणीचे मशीन आलेले आहे. परंतु लॉकडाऊनमुळे ( 21daysLockdown ) पेट्रोल पंप वाले मशिनसाठी पेट्रोल देत नाहीत. अवकाळी पावसात भिजला तर गहू वाया जाईल. ते कळकळीनं बोलत होते.

देशमुख साहेबांनी लगेच तहसिलदार मॅडमना फोन लावला. तुम्ही नियमाप्रमाणे बरोबर आहात. परंतु जीवनावश्यक कामांसाठी पेट्रोल द्यायला हवे. तुम्ही सर्व पेट्रोल पंपचालकांना सूचना द्या की, सर्व गहू काढणी व मळणी यंत्रांना पेट्रोल द्यावे. सुदैवाने नंतर राज्य सरकारनेही शेतकऱ्यांच्या अशा यंत्रांसाठी इंधन द्यायचा निर्णय घेतला.

रात्री गावी लोधवडेला सरपंच व उपसरपंच यांना देशमुख साहेबांनी फोन लावला. गावी कसं चाललं आहे याची माहिती घेतली. ‘उद्या सकाळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर्स यांना सकाळी ग्रामपंचायतीत दहा वाजता बोलवा. त्यांच्याशी मी येथूनच स्पीकवरून बोलेन. ‘कोरोना’बाबत गावात काय करायचे याचे मार्गदर्शन करेन’, अशा सुचना देशमुख साहेबांनी त्यांना केल्या.

त्यानंतर त्यांनी माण व खटावमधील काही सरपंचांना व कार्यकर्त्यांनाही फोन लावले. तालुक्यात काय परिस्थिती आहे याची माहिती घेतली. ‘कोरोना’चे ( 21daysLockdown ) गांभिर्य लोकांना समजून सांगा. घरातून कुणीही बाहेर पडू नका. लोकांवर लक्ष ठेवा. बाहेरून आलेल्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून घ्या अशा सुचना त्यांनी सरपंच व कार्यकर्त्यांना दिल्या.

‘कोरोना’मुळे घरात बंदिस्थ ( 21daysLockdown ) असूनही देशमुख साहेबांचे माण – खटावमध्येच लक्ष होते. शरीराने पुण्यात पण मनाने गावाकडे असाच त्यांचा दैनंदिन कार्यक्रम सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

Covid2019 : कोरोना काव्य

Covid-19 : राष्ट्रवादीचा नेता ब्रिटनमध्ये, अडकलेल्या भारतीयांना करतोय मदत

‘कोरोना’बद्दल केंद्र सरकारने दिलेल्या सुचनांची माहिती

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी