33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeआरोग्यकोरोनाच्या विषाणूमुळे शरीरात पू जमा होण्याची भीती

कोरोनाच्या विषाणूमुळे शरीरात पू जमा होण्याची भीती

  • अतुल माने, जेष्ठ पत्रकार

कोरोनाच्या विषाणूमुळे (corona virus) रुग्णाच्या शरीरात आता पू जमा होत असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा विषाणू जनुकीय बदल करून ब्रिटन मधून आलेला आहे की जुनाच विषाणू आहे याचा अभ्यास आता वैद्यक तज्ञाकडून करण्यात येत आहे.

सध्या ब्रिटन मधून जनुकीय बदल करून आलेला बीवनवन सेव्हन हा विषाणू जगभरात धुमाकूळ घालत आहे 70 टक्के वेगाने प्रसार करणारा विषाणू आणि त्याची घातक लक्षणे यामुळे भारतासह जगभरातील सर्वच वैद्यक तज्ञाकडून अभ्यास करण्यात येत आहे.

कोरोना झाल्यावर त्याचा शरीरातील अनेक अवयवांवर परिणाम होत असल्याचं आतापर्यंत आढळून आले होते. पण कोरोना झाल्यानंतर एका महिलेच्या शरीरात पू निर्माण झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे.

या विचित्र घटनेमुळे वैद्यक यंत्रणाही हैराण झाली असून संबंधित महिलेवर तातडीने उपचार करण्यात आले. कोरोना झाल्यावर शरीरात पू भरण्याच्या जगात आतापर्यंत किमान सहा घटना समोर आल्या असून यामध्ये वाढ होऊ शकते.

भारतातील ही पहिलीच घटना असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे.

औरंगाबाद येथील या महिलेची माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे. या महिलेने भारता बाहेर कुठे प्रवास केला आहे का याची माहितीही घेण्यात येत आहे. या महिलेला कोरोनाची लागण झाल्याने आणि पाय दुखू लागल्याने तिला येथील एका रुग्णालयात 29 नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना या महिलेच्या शरीरात पू भरल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आल्याने सर्वांना धक्का बसला. तिचा एमआयआर काढण्यात आल्याने त्यात तिच्या शरीरात मोठया प्रमाणात पू निर्माण झाल्याचं आढळून आलं.

कोरोना झाल्यानंतर शरीरात पू भरण्याची ही देशातील पहिलीच घटना असल्याने या महिलेवर उपचार करणं डॉक्टरांसाठीही मोठं आव्हान होतं. त्यामुळे डॉक्टरांनी या महिलेवर संपूर्ण लक्ष केंद्रीत करून तिच्यावर तातडीने उपचार सुरू केले आणि या आव्हानावर मात करण्यात यशही मिळविलं.

येथील डॉ. श्रीकांत दहिभाते यांनी या महिलेवर यशस्वी उपचार केले. सध्या या महिलेची प्रकृती चांगली असून आता तिला कोणतेही साईड इफेक्ट जाणवत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

या महिलेच्या शरीरातून सुमारे अर्धा लिटर पू काढला गेला आहे. ही महिला पूर्णपणे बरी झाल्यानंतर तिला 21 डिसेंबर रोजी डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनाची लागण झाल्यानंतर शरीरात पू भरण्याच्या जर्मनीतही सहा घटना आतापर्यंत आढळून आल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी