33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यLockdown : मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, ठाण्यातील 'या' १६ हॉटस्पॉटमध्ये आजपासून कडक लॉकडाऊन

Lockdown : मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, ठाण्यातील ‘या’ १६ हॉटस्पॉटमध्ये आजपासून कडक लॉकडाऊन

टीम लय भारी

ठाणे : राज्यातील अनेक शहरांमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. ठाणे शहरातील काही भागातही कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यात कोरोनाचा प्रसार अधिक असलेल्या १६ हॉटस्पॉट भागामध्ये आजपासून कडक लॉकडाऊन (Lockdown) जारी करण्यात आला आहे. यासंदर्भातील आदेश महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी काढले आहेत.

राज्यातल्या अनेक जिल्ह्यांत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने काही जिल्ह्यात निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. तर, काही जिल्ह्यात अशंतः लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने मुंबईही लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे.

ठाण्यात कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने १६ हॉटस्पॉट क्षेत्र जाहीर केले आहेत. या हॉटस्पॉट क्षेत्रात आजपासून ते ३१ मार्च २०२१ पर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. या हॉटस्पॉट क्षेत्रांव्यतिरिक्त अन्य क्षेत्रात मात्र मिशिन बिगीन अगेननुसार इतर सेवा सुरु राहतील.

कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने सरकारने टप्याटप्याने लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात केली होती. मात्र, कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, मुंबई-पुण्यासह मराठवाडा आणि विदर्भातील अनेक शहरांमध्ये कोरोना संक्रमण वाढले आहे. त्यामुळे दररोज राज्यातील रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.

दरम्यान, मुंबईत कोरोना व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणे सातत्याने वाढत असून शहरात नवीन रुग्णांची संख्या मागील चार महिन्यांत उच्चांकावर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाआघाडी सरकार मुंबईत लॉकडाऊनचा विचार करत आहे. परंतु हे लॉकडाऊन 2020 च्या लॉकडाउनसारखे नसून, टप्प्याटप्प्यामध्ये लादले जाऊ शकते. शहराचे पालकमंत्री असलम शेख यांनी सांगितले की जर येत्या 10 दिवसांत संसर्गाची प्रकरणे नियंत्रणात आली नाहीत, तर आंशिक लॉकडाउन लागू केले जाऊ शकते. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली असून, त्यांनी मुंबईत संक्रमणाचे प्रमाण सप्टेंबरच्या पातळीवर पोहोचण्याची चिंता व्यक्त केली आहे.

या भागांमध्ये लॉकडाउन

१) आई नगर, कळवा
२) सूर्या नगर, विटावा
३) खरेगाव हेल्थ सेंटर
४) चेंदणी कोळीवाडा
५) श्रीनगर
६) हिरानंदानी इस्टेट
७) लोढा माजीवाडा
८) रुणवाल गार्डन सिटी, बालकुम
९) लोढा अमारा
१०) शिवाजी नगर
११) दोस्ती विहार
१२) हिरानंदानी मिडोज
१३) पाटील वाडी
१४) रुणवाल प्लाझा, कोरेस नक्षत्र, कोरेस टॉवर
१५) रुणवाल नगर, कोलबाद
१६) रुस्तोमजी, वृंदावन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी