33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रविदेश दौऱ्यांवरून आदित्य ठाकरेंनी केली सरकारची धुलाई!

विदेश दौऱ्यांवरून आदित्य ठाकरेंनी केली सरकारची धुलाई!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विदेश दौऱ्यानवरून टीका करत आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर पोस्ट्सचा भडीमार केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 66 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेचा घाना दौरा अचानकपणे रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर या नव्या वादाला आता तोंड फुटले आहे. “परदेशी दौरे आता फॅशन झाली असून मी त्याबद्दल प्रश्न विचारताच बेकायदेशीर मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांनी या आठवड्यात त्यांचे दौरे रद्द केले आहेत,” अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज शनिवारी, (30 सप्टेंबर) 66 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेसाठी 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान घाना येथे जाणार होते. पण त्यांनी त्यांचा हा दौरा अचानकपणे रद्द केला. हा दौरा रद्द करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून यामागचे कारण सांगितले आहे. आदित्य ठाकरे यांनी एकामागोमाग ट्विटस चा भडिमार करत मंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या परदेश दौऱ्याबाबत विचारणा केली आहे.


आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर पोस्टवर लिहिले, “महाराष्ट्रातील बेकायदेशीर सरकारसाठी परदेश दौरे एक फॅशन झाली आहे. महाराष्ट्रातील मिंधे-भाजप राजवटीत मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या सुट्यांसाठी जनतेचा पैसा खर्च केला जात असून, त्याचा राज्यासाठी कोणताही चांगला परिणाम झालेला नाही. याबाबत प्रश्न विचारल्यावर, बेकायदेशीर मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांनी या आठवड्यात त्यांचे दौरे (सुट्ट्या) रद्द केले आहेत.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आदित्य ठाकरे लिहितात, “गेल्या आठवड्यात, बेकायदेशीर मुख्यमंत्री सुट्टीसाठी जर्मनी आणि यूकेला भेट देणार होते, सरकारच्या या अधिकृत दौऱ्यात त्यांच्यासोबत शिष्टमंडळ म्हणुन मोठ्या संख्येने लोक सोबत असणार होते. पण, मी सोशल मीडियावर या दौऱ्याचे तपशील, भेट देणार असलेल्या ठिकाणांबद्दल तसेच गुंतवणूकदारांबद्दल विचारल्यानंतर 30 मिनिटांत हा दौरा रद्द केला गेला.”

“मी योग्य प्रश्न विचारताच, बेकायदा मुख्यमंत्र्यांप्रमाणे विधानसभा अध्यक्षांनी आपला परदेश दौरा रद्द केला. नार्वेकर जी ह्यांच्या वेळकाढूपणामुळे महाराष्ट्रातील लोकशाहीची हत्या होत असताना ते राष्ट्रकुल संसदीय परिषदेला निघाले होते. हाच मोठा विनोद होता. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात विलंब का होतोय, याचे उत्तर नार्वेकर जी ह्यांनी महाराष्ट्राला आधी द्यावे. त्यांची निष्क्रियता केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या लोकशाहीवर आणि मतदानाच्या शक्तीवर विश्वास असलेल्या प्रत्येकावर अन्याय करणारी आहे.” आदित्य ठाकरे पुढे म्हणाले.

आपल्या आणखी एक पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करून आदित्य ठाकरे लिहितात, ” जीआरमध्ये नमूद केल्यानुसार, उपमुख्यमंत्र्यांनी जपान सरकारच्या निमंत्रणावरून जपानला भेट दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सरकारच्या निमंत्रणानंतरही, 5 दिवसांचा दौरा एमआयडीसीने प्रायोजित केली आहे. हे लक्षात घेणे मनोरंजक आहे की एमआयडीसीने प्रवास आणि मुक्कामावरील खर्चास घटनोत्तर मान्यता दिली आहे, अधिकृत निमंत्रण असल्यास सर्व खर्च यजमानांकडून उचलला जातो. इतकेच नव्हे तर, जीआरमध्ये असे नमूद केले आहे की शिष्टमंडळाचे आगमन झाल्यानंतर एक महिन्याच्या आत म्हणजे 25 ऑगस्टपर्यंत तपशीलवार अहवाल दाखल केला जाईल. आता एका महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. उपमुख्यमंत्ऱ्यांच्या मानद डॉक्टरेटशिवाय आम्हाला कोणताही तपशीलवार अहवाल अजून दिसलेला नाही. मानद पदवी मिळवण्यासाठी सहलीचा खर्च एमआयडिसीला का करावा लागतो?”

आदित्य ठाकरे एवढ्यावरच न थांबता पुढे लिहितात, “आता आणखी एका सहलीला मान्यता मिळाली आहे, ती म्हणजे उद्योगमंत्र्यांच्या यूके, स्वित्झर्लंड आणि जर्मनी दौऱ्याची. यूकेमध्ये, ते “राऊंड टेबल कॉन्फरन्स” मध्ये उपस्थित राहणार आहेत, परंतु या परिषदेत कोण उपस्थित राहणार याचा तपशील कोणाकडेही नाही. स्वित्झर्लंडमध्ये ते दावोस येथे पाहणी दौऱ्यासाठी जाणार आहेत. गंमत म्हणजे, ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ साठी अद्याप कोणीही दावोसमध्ये नाही. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ जानेवारीमध्ये होणार आहे तर तिथे हे आता जाऊन काय पाहणी करणार आहेत? हे तर दावोसचे पालकमंत्री देखील नाहीत. दावोस पाहणी दौऱ्याचा जानेवारीत होणाऱ्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ बैठकीशी काहीही संबंध नसल्याने तो रद्द करावा लागेल. ही एक निरर्थक सुट्टी आहे. मग पुन्हा ते दुसर्‍या गोलमेज परिषदेसाठी म्युनिकला जाणार, त्याबद्दलही काही तपशील नाही.”

हे ही वाचा 

नितीश कुमारांचे आता महाराष्ट्रात लक्ष्य; JDU चा मुंबईत संवाद मेळावा

लोकसभेत आंबेडकरांची वेगळी चूल, ४८ जागांवर निवडणूक लढवणार

21 दिवसांनंतर ओबीसींचं उपोषण मागे, फडणवीसांची शिष्टाई यशस्वी

पुढे आदित्य यांनी दौऱ्यांची एक यादी पोस्ट करून दौऱ्यांच्या परिणामाबाबत सरकारकडे विचारणा केली.

दौऱ्याचा कोणताही तपशील न देता विधानसभा अध्यक्षांनी 5 दिवस रशियाला भेट दिली होती. उपसभापतींनी 49 लोकांसह युरोपला भेट दिली, परंतु अभ्यास दौऱ्याच्या कोणत्याही परिणामांबद्दल कोणताही अहवाल मिळालेला नाही. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी 13 ते 27 ऑगस्ट दरम्यान ऑस्ट्रेलिया – न्यूझीलंड दौरा केला पण हा दौरा कोणी प्रायोजित केला हे अद्याप माहीत नाही. या दौऱ्यातून राज्य म्हणून आपण काय परिणाम साधले हे आपल्याला माहीत नाही.

आदित्य ठाकरे शेवटी म्हणतात, “मुद्दा असा की, माझा त्यांच्याशी कोणताही वैयक्तिक वाद नाही. शिवाय, जर त्यांच्यापैकी कोणाला सुट्टीसाठी जायचे असेल तर त्यांनी जावे, परंतु करदात्यांच्या पैशावर नाही. राज्याला करदात्यांच्या पैशावर या सुट्ट्या परवडतील का? हे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट करावे. आणि जर हे परवडत असेल, तर जुनी पेन्शन योजना, शेतकरी समर्थन आणि बऱ्याच विषयायांवर राज्य सरकार का बोलत नाही? दौऱ्यांच्या वेशात सार्वजनिक पैशांचा अशा प्रकारे सुट्ट्यांवर खर्च होत असेल तर राज्याच्या अर्थ मंत्रालय याकडे लक्ष डेल अशी आम्हाला आशा आहे.”


शेवटी, आदित्य ठाकरे यांनी सरकारने सामायिक केलेला जीआरचा फोटो पोस्ट करत ,”सोप्या इंग्रजीत सरकारने स्वीकारले आहे की उपमुख्यमंत्ऱ्यांच्या जपान दौर्‍याचा खर्च एमआयडिसी द्वारे केला गेला आहे.” असे म्हंटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी