32 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeव्यापार-पैसा२ हजारांच्या नोटांबाबत RBI चा मोठा निर्णय, नोटा बदलण्यासाठी ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

२ हजारांच्या नोटांबाबत RBI चा मोठा निर्णय, नोटा बदलण्यासाठी ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

तुमच्याकडे अजूनही २ हजार रुपयांची नोट किंवा नोटा असतील आणि एवढ्या दिवसांत २ हजारांच्या नोटा बदलण्यासाठी तुम्हाला वेळ मिळाला नसेल, तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे. कारण २ हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सात दिवसांची मुदतवाढ दिली आहे. म्हणजेच आता ७ ऑक्टोबरपर्यंत नोटा बदलता येणार आहेत. त्यानंतर मात्र, २ हजार रुपयांची नोट व्यवहारात चालणार नाही, असे आता रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ७ ऑक्टोबरपर्यंत २ हजारांच्या नोटा व्यवहारात वापरण्याची मुभा सर्वांना मिळाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यंदा १९ मे रोजी २ हजार रुपयांची नोट व्यवहारातून बाद करण्याची घोषणा केली आणि या सर्व परत करण्यासाठी ३० सप्टेंबरची मुदत दिली होती.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या आजपर्यंतच्या मुदतीत ३.४२ लाख कोटींच्या २ हजारांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा झाल्या आहेत. तर म्हणजेच ९६ टक्के नोटा सरकारकडे परत आल्या आहेत. याचाच अर्थ चार टक्के म्हणजेच १४ लाख कोटींच्या नोटा अजून चलनात आहेत. त्या नोटा परत याव्यात यासाठी ही मुदतवाढ दिल्याची चर्चा आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, पुढे या २ हजार रुपयांचे काय होणार? तर सरकारने याबाबत अजून स्पष्ट उत्तर दिलेले नाही. २ हजार रुपयांच्या नोटा ७ ऑक्टोबरनंतर व्यवहारात वापरल्या जाणार नसल्या तरी त्या चलनातून कायमस्वरुपी बाद करणार का, याबाबत लवकरच रिझर्व्ह बँक स्पष्टीकरण करेल, अशी अपेक्षा आहे.

१६ नोव्हेबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची मोठी घोषणा केली होती. एक हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा त्यांनी चलनातून बाद करत असल्याची घोषणा करून देशाला मोठा आर्थिक धक्का दिला होता. काळापैसा रोखण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यावेळी स्पष्ट केले होते. त्यानंतर चलनातून एक हजार आणि ५०० रुपयांच्या नोट बाद झाल्यामुळे भारतीयांचा प्रचंड आर्थिक कोंडी झाली होती. लोक एटीएम, बँकेत रांगा लावत असल्याचे चित्र दिसत होते. लोकांकडे पैसे नव्हते. त्यावेळी चलनातील नोटांची तफावत दूर करण्यासाठी २ हजार रुपयांची नोट व्यवहारात आणण्यात आली होती. आणि आता अवघ्या सात वर्षांत २ हजारांची नोटदेखील चलनातून बाहेर काढली जात आहे. आता मुदतवाढीच्या सात दिवसांत उर्वरित चार टक्के २ हजारांचा नोटा रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीत जमा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी