32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यपालांच्या भेटीला भाजपचे शिष्टमंडळ

राज्यपालांच्या भेटीला भाजपचे शिष्टमंडळ

टीम लय भारी

मुंबई : काही दिवसांपूर्वी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यासाठीच भाजपचे शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. यावेळी भाजपकडून राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली असण्याची शक्यता आहे. भाजपचे शिष्टमंडळ मुंबईतील राजभवनात सकाळी ९:३० वाजता दाखल झाले. यानंतर त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. भाजपच्या या शिष्टमंडळात देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा हे नेते सहभागी आहेत. तासभर भाजपचे शिष्टमंडळ आणि राज्यपालांची खलबते सुरु होती.

परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर वेगवान घडामोडी

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत अनिल देशमुख यांची तक्रार केली. अनिल देशमुख यांनी पोलीस सहायक यांना १०० कोटी रुपये वसूल करायला सांगितले, असा आरोप त्यांनी पत्रात केला. ही बाब उघड झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. विरोधक महाविकास आघाडी सरकारवर तुटून पडले.

या दरम्यानच्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या निर्मितीत महत्त्वाचे दुवा ठरलेले शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील सत्ताधाऱ्यांनी आत्मपरिक्षण करण्याची वेळ आलीय, असे म्हटले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर दबाव वाढला. विरोधकांकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन देशमुखांचा राजीनामा मागितला.

भाजपकडून राजीनाम्याची मागणी

तसेच परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने लावून धरली आहे. त्यावरुन राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांत हे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर चर्चिले जात आहेत. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारची बदनामी होत आहे. तर शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली आहे.

‘देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नाही’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मंगळवारी काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. दीड तासांपेक्षा अधिक काळ ही बैठक चालली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. सरकारची किंवा काँग्रेसची प्रतिमा खराब होण्याचे काही कारण नाही. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन प्रकरणाची चौकशी व्हावी आणि ती चांगल्या रितीने व्हावी, असे देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी