31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रश्री सेवकांचा मृत्यू अनपेक्षित तापमानामुळे, त्यावर राजकारण योग्य नाही : दीपक केसरकर

श्री सेवकांचा मृत्यू अनपेक्षित तापमानामुळे, त्यावर राजकारण योग्य नाही : दीपक केसरकर

कोकण किनारपट्टीत आजपर्यंत कोणाचाही उष्माघाताने मृत्यू झालेला नाही. रविवारी अनपेक्षितपणे तापमान ४२ अंश सेल्सिअसवर गेले. त्यामुळे श्री सेवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, ही नैसर्गिक घटना असून त्यावर राजकारण करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. अमित शहा यांनी वेळ दिला नसल्यामुळे हा कार्यक्रम संध्याकाळऐवजी सकाळी घेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला.

ते म्हणाले, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा हा राज्यसरकारचा कार्यक्रम होता. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यात त्यांच्या भक्तांची मोठी संख्या आहे. त्यामुळे कार्यक्रमासाठी मोठी गर्दी होईल, हे अपेक्षित होते. त्यानुसार संपूर्ण नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रम सकाळी असताना आदल्यादिवशी रात्रीच सुमारे २ लाख लोक तिथे जमले होते. त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. आरोग्यउपचार, औषधे आणि प्रसाधनाची देखील पुरेशी व्यवस्था होती.

कार्यक्रमस्थळी पिण्याच्या पाण्यासाठी २३०० नळ बसविले होते. ३५० डॉक्टर्स, ८० सुपर स्पेशालिस्ट, १५० नर्सेस, १५० फार्मासिस्ट अशी मोठी चमू तैनात होती. योग्य नियोजनाअभावी श्री सेवकांचा मृत्यू झाल्याची बाब त्यांनी फेटाळून लावली. आप्पासाहेबांबद्दलची आत्मीयता आणि शुद्ध भक्तीभावापोटी श्री सेवक लाखोंच्या संख्येने तिथे जमले होते. कोणीही त्यांना उन्हात थांबण्याची सक्ती केलेली नव्हती.

कोकण किनारपट्टीत कधीही उष्माघाताने कोणाचा मृत्यू झालेला नाही. या भागात दमट वातावरण असते. येथील शेतकरीवर्ग उन्हातान्हात काम करतात, पण त्यांना उष्माघात झाल्याचे पहायला मिळाले नाही. नागपूर, विदर्भात अशी स्थिती असते. मात्र, त्यादिवशी तापमानाचा पारा तब्बल ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचला. पश्चिम बंगालमधून गोव्यापर्यंत उष्माघाताची लाट आलेली होती.

कधी नव्हे अशी अनपेक्षित परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचा फटका श्री सेवकांना बसला. जाणूनबुजून कोणीही हे केलेले नाही. या दुर्दैवी घटनेबद्दल सर्वांनाच अतीव दुःख झाल्याने याबाबत आता राजकारण करणे योग्य नसल्याचे केसरकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः श्री सेवक आहे. त्यांच्या पत्नी आणि चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे स्वतः श्री सेवकांसोबत उन्हामध्ये बसलेले होते. काही श्री सेवकांना जुना आजार असल्याने त्यांना ऊन असह्य होऊन उष्माघाताचा फटका बसला. हा आत्मीयता आणि भक्तिभावाचा विषय असल्याने त्यावर अधिक बोलणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. २६ लाख लोक कार्यक्रमाला हजर होते. एवढ्या मोठ्या गर्दीसाठी मंडपाची व्यवस्था करणे अशक्य होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवार हे राष्ट्रवादीतील मोठे नेते आहेत. त्यांच्या मतदारसंघात ते १ लाख ८० हजारांच्या विक्रमी मतांनी निवडून आले. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असेल तर त्यांनी कुठल्या पक्षात जावे, हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. ज्या पक्षात ते जातील, त्यांच्यासाठी ते फायद्याचेच ठरणार आहे.
अजित पवार उपमुख्यमंत्री असतानाच्या काळात त्यांनी शिवसेनेला डावलून आपला पक्ष मोठा केला. त्यांच्या पक्षाच्या हिताचे निर्णय ते घेत होते. आम्ही त्यांच्याविरोधात आवाज उठविला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले नव्हते. अजित पवार भाजपमध्ये जातील, हे संजय राऊत यांनी सांगणे योग्य वाटत नसल्याचे केसरकर यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा

कार्यकर्त्यांच्या तक्रारींसाठी भाजपच्या प्रदेश कार्यालयात तक्रारपेटी !
सदाभाऊ खोत यांनी पुणे महापालिका कार्यालयासमोर विकले कांदे-बटाटे
“अन्याय संपला, आम्हाला फाशी झाली तरी…”, अतिक-अश्रफच्या मारेकऱ्यांचा जबाब

एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व जबरदस्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्या कामावर खुश आहेत. सार्वजनिक कार्यक्रमात दोन्ही नेते शिंदे यांना सन्मान देऊन जवळ घेतात. आगामी निवडणूक युतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाईल, असे खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.

नागपुरातील वज्रमूठ सभा ही काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केली होती. उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी कोणी आले नव्हते. त्यामुळेच काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि इतर नेत्यांचे भाषण लोकांनी ऐकले. उद्धव ठाकरे यांनी भाषण करायला सुरुवात करताच लोक बाहेर पडायला लागले, अशी टीका केसरकर यांनी केली.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी