30 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमहाराष्ट्रभेसळखोरांवर कारवाई होणारच -धर्मरावबाबा आत्राम

भेसळखोरांवर कारवाई होणारच -धर्मरावबाबा आत्राम

राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी भेसळखोरीविरोधात दंड थोपटले आहेत. गणेशोत्सव काळात मिठाईमधील भेसळ रोखत त्यांनी भेसळखोरांना धडा शिकवण्याचा चंग बांधला आहे. सणासुदीच्या काळात भेसळयुक्त पदार्थांनी लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने जोरदार कारवाई सुरू केलीय. त्याचा परिणाम म्हणून आजपर्यंत तब्बल दहा कोटींपेक्षा अधिक किमतीचे अन्नपदार्थ आणि प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. शिवाय नाशवंत अन्नपदार्थांचा साठा घटनास्थळीच नष्ट करण्यात आलेला आहे. ही कारवाई अशीच सुरू राहील, असे आत्राम यांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री म्हणून राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी जबाबदारी घेताच कोकणासह मुंबई, नागपूर, अमरावती इत्यादींचा विभाग स्तरावर आढावा बैठक घेऊन त्यांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर राज्यभरात अधिकाऱ्यांनी कारवाईचं सत्र सुरू केले आहे. कमी कर्मचारी आणि अधिकारी असूनही अगदी सुट्टीच्या दिवशीदेखील कारवाई केली जात आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने खाद्यतेल, दूध तसेच दुग्धजन्य पदार्थ, शिवाय मिठाईमध्ये सर्रास भेसळ केली जाते, असा अनुभव आहे. अशा भेसळखोरांविरोधात सरकाराने ही कारवाईची मोहीम सुरू केली. या भेसळखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले आहेत.

अन्न व औषध प्रशासन विभागात कमी मनुष्यबळ आहे. ते सोडवण्यासाठी मंत्री आत्राम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेतली. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही उत्साह वाढला आहे. गेल्या महिन्यात ८३ कारवायांमध्ये २ लाख ४२ हजार ३५२ किलो भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा जप्त केला. ज्याची किंमत साडेचार कोटी रुपये आहे. त्याचबरोबर गुटखा, पानमसाला आदी प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठ्यावर ४६ ठिकाणी कारवाया करून सुमारे ३ कोटी ६ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि या संदर्भात ३९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा 
संदिपान भुमरे यांचा कामाइतकाच लोकसंग्रह भलताच भारी
Video : दिशा पटानीला मुलांनी नाकीनऊ आणले
आज लता दीदींचा वाढदिवस…’या’ मराठी अभिनेत्रीला लता मंगेशकर बनायचंय

दरम्यान, भेसळीविरोधात कारवाईचा बडगा उगारतानाच ईट राईट इंडिया उपक्रमाअंतर्गत, ईट राईट मिलेट मेला, मिलेट वॉकॅथॉन, क्लीन स्ट्रीट फूड हब, इट राईट कॅम्पस, अन्न व्यावसायिकांना फॉस्टँक ट्रेनिंग, ईट राईट स्कुल, आदी जनजागृतीचे कार्यक्रम व्यापक स्तरावर घेऊन विभागाची प्रतिमा उंचावण्याचे प्रयत्न होत आहेत. गणेशोत्सवाप्रमाणेच दसरा आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कारवाईची व्याप्ती वाढवण्यात येईल, याचे सुतोवाच मंत्री महोदयांनी दिलेत. या संदर्भात तक्रारी असल्यास किंंवा गुप्त माहिती द्यायची असल्यास मुख्यालयातील नियंत्रण कक्षातील टोल फ्री क्रमांक १८००-२२२-३६५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, अन्न व औषध प्रशासनमंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे.

‘जनता दरबार’ तून जनतेशी संवाद
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी आज ( बुधवार) मंत्रालयासमोरील प्रतापगड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘जनता दरबारा’त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जनतेशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच जनतेच्या विविध सूचना व मागण्यांचे निवेदन स्वीकारून प्रश्नांची सोडवणूक केली जाईल,असे कार्यकर्त्यांना आश्वासित केले.

प्रत्येक बुधवारी सायंकाळी ४ ते ६ असे दोन तास पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जनता दरबाराचे आयोजन केल्या जाते. पक्षाने दिलेल्या आदेशानुसार जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी,अडचणी सोडवण्याचे काम जनता दरबारात माध्यमातून केल्या जाते,असे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले. या जनता दरबारात कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी