33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्र'तो' व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर फिरवणे खोडसाळपणाचे : एकनाथ शिंदे

‘तो’ व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर फिरवणे खोडसाळपणाचे : एकनाथ शिंदे

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करुन आरक्षणासाठी काय करता येईल यावर चर्चा देखील केली. त्यानंतर पत्रकार परिषदेपुर्वीचा एकनाथ शिंदे यांच्या संवादाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने संपादीत करुन व्हायरल करणे हे खोडसाळपणाचे असल्याचे सांगत हे याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे असे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे-पाटील हे काही दिवसांपुर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. मात्र पोलिसांच्या लाठीचार्जनंतर हे आंदोलन चिघळले. राज्यभर मराठा संघटना आक्रमक झाल्या आणि राज्यभर आंदोलनाचे पेव फुटले. दरम्यान जरांगे यांनी प्राणांतिक उपोषण सुरु केले असून आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकारपरिषदेपूर्वी शिंदे यांचा संवाद असलेला एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर शिंदे यांनी हा व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने संपादित करुन सोशल मीडियात चुकीच्या पद्धतीने फिरवणे खोडसाळपणाचे असल्याचे म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांनी या व्हिडीओबाबत ‘एक्स’ (ट्विटर) वर एक पोस्ट केली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, ”मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडीया’वरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे.”

”मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय आहे. आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या घटकांनी जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.”

हे सुद्धा वाचा
भूमीचा फिमेल ऑरगॅजमवर भाष्य करणारा चित्रपट चालला टोरंटोला
मनोज जरांगे पाटील आज उपोषण सोडणार? दिलेल्या पाच अटी सरकार मान्य करणार?
मुख्यमंत्री कार्यालयातील बोगस ओएसडी अधिकाऱ्याची रवानगी मूळ पदावर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी