32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रCovid19 : केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात धान्य, मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

Covid19 : केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात धान्य, मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’चा ( Covid19 ) संसर्ग वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रीमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत खालील महत्वाचे निर्णय झाले.

केशरी शिधापत्रिका धारकांना देखील सवलतीच्या दरात धान्य, मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ प्रती व्यक्ती देण्याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यांना 8 रुपये प्रती किलो गहू आणि 12 रुपये प्रती किलो तांदूळ अशा दरात धान्य मिळेल. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजच पत्र लिहून संबंधित मंत्रालयाला आवश्यक ते निर्देश देण्याची विनंती देखील केली.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या 3 कोटी 8 लाख एपीएल शिधापत्रिकाधारकांना याचा फायदा होईल. त्यासाठी सुमारे 250 कोटी खर्च येणार असून मे आणि जून या महिन्यासाठी हे धान्य दिले जाईल.

सध्या जे धान्य केंद्र सरकारकडून मिळते त्या व्यतिरिक्त 1 लाख 54 हजार 220 मेट्रिक टन धान्याची मागणी यासाठी करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये किमान आधारभूत किंमतीच्या दराने धान्य देण्याबाबत केंद्राचे जे धोरण आहे त्याला अनुसरुनच सवलतीच्या दरात धान्य मिळावे अशी मागणी पंतप्रधानांना करण्यात आली आहे.

लॉकडाऊन उठविण्याबाबत 14 एप्रिलनंतर परिस्थिती पाहून योग्य त्यावेळी योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. इतर राज्यातील मजूर, कामगार स्थलांतरीत अशा 5.50 लाख व्यक्तींना दररोज सकाळचा नास्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण देण्यात येत आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

शिवभोजन योजना आता तालुका स्तरावर, पुढील 3 महिने पाच रुपये दरात भोजन मिळणार

शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील तीन महिने 5 रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मजुर, स्थलांतरीत, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी व इतर लोक यांचे जेवणाअभावी हाल होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

सध्या जिल्हा मुख्यालयी ही शिवभोजन केंद्रे चालविली जातात.  आता तालुका स्तरावर सुरु होतील. पुढील तीन महिन्यासाठी शिवभोजनाच्या प्रती थाळीचा दर 5 रुपये इतका करण्यात आला आहे.

शिवभोजन थाळीची किंमत शहरी भागात 50 रुपये प्रती थाळी असून ग्रामीण भागात 35 रुपये इतकी आहे. प्रत्येक ग्राहकाकडून मिळालेल्या 5 रुपये एवढ्या रकमेव्यतिरिक्त उर्वरित रक्कम शहरी भागात प्रती थाळी 45 रुपये आणि ग्रामीण भागात प्रती थाळी 30 रुपये असे अनुदान संबंधित केंद्र चालकाला देण्यात येईल.

Covid19
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र सरकारने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कॅबिनेटच्या बैठकीचे आयोजन केले होते

ही भोजनालये सकाळी 11 ते दुपारी 3 या काळात सुरु राहतील

या शिवभोजन केंद्र चालकांना देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ठेवणे, निर्जंतुकीकरण करून घेणे, कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे तसेच मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना मान्यता

कोरोना ( Covid19 ) प्रादुर्भावामुळे होत असलेला संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात तातडीने विविध उपाययोजना, अधिसुचना व आदेश काढण्यात आले.  या उपाययोजनांना मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात आली.

  • 13 मार्च 2020 च्या अधिसुचनेनुसार राज्यात साथरोग कायदा 1897 लागू केला.
  • उपाययोजनांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 13 मार्च रोजीच उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली.
  • 14 मार्च 2020 रोजी महाराष्ट्र कोविड-19  ( Covid19 ) उपाययोजना नियम 2020 अधिसूचना लागू झाली. त्याअंतर्गत अलगीकरण व विलगीकरण याबाबतचे नियम ठरविण्यात आले. तसेच अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई, खाजगी रुणालयामध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करणे याबाबी या नियमावलीमध्ये आहेत.
  • गर्दीमुळे होणारा ( Covid19 ) संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या.
  • आपत्कालीन परिस्थितीत औषधे व यंत्रसामुग्री व उपकरणे खरेदी करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्त तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान त्याचप्रमाणे संचालक, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये यांच्या स्तरावर समिती गठीत करून त्यांना काही अटी व शर्तीनुसार खरेदी करण्यास मुभा देण्यात आली.
  • वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने गेल्या काही दिवसात विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळा, विविध परिषदांच्या नोंदणीकृत वैद्यक व्यवसायिक, सुश्रुषा सेवा, परावैद्यक व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती यांच्या सेवा अधिग्रहीत करणे.
  • कोरोना विषाणुच्या ( Covid19 ) अनुषंगाने सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयात स्वतंत्र विलगीकरण इमारत / कक्ष निर्माण करण्याच्या मार्गदर्शक सूचना देणे.
  • कोविड आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसर निर्जंतुकीकरण करणे.

मंत्रिपरिषदेची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे

आज कोरोना विषाणू ( Covid19 ) प्रादुर्भावामुळे मंत्रिपरिषदेची बैठक व्हिडिओ कॉन्फरसींगद्वारे घेण्यात आली. वर्षा या शासकीय निवासस्थानाहून या कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री सर्वश्री बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील,  एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे हे मंत्री उपस्थित होते.

मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री सुभाष देसाई,  दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, अनिल देशमुख, राजेश टोपे, प्रा.वर्षा गायकवाड, डॉ. जितेंद्र आव्हाड, अस्लम शेख, ॲङ अनिल परब उपस्थित होते.  तर इतर मंत्री तसेच राज्यमंत्री आपापल्या जिल्ह्याहून या बैठकीत सहभागी झाले

या बैठकीत प्रारंभी कोरोना ( Covid19 ) साथीला रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास तसेच मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये चाचणी सुविधा उपलब्ध करणे, वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता, अन्न धान्य पुरवठा, लॉकडाऊन, कम्युनिटी किचन यावर मंत्र्यांनी चर्चा करून सुचना केल्या.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी जलद चाचणीची गरज जिथे जिथे आहे तिथे प्राथम्याने करण्यात येईल असे सांगितले.  होमगार्ड उपलब्ध करून देण्यात येत असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत.  भाजीपाला व इतर आवश्यक दुकानांच्या वेळांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा असे त्यांनी सांगितले.

कोरोना : महाराष्ट्राची सद्य:स्थिती

.महाराष्ट्रात आजमितीस ( Covid19 ) 868 रुग्ण असून 52 मृत्यू आहेत. मृत्यूदर देशात सर्वाधिक म्हणजे 5.99 इतका आहे. मरण पावलेल्या 11 रुग्णांमध्ये इतर कुठल्याही आजारांची लक्षणे नव्हती.

  • एकूण 17563 सॅम्पल्स तपासले असून 15808 निगेटिव्ह आहेत.
  • महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच पावले उचलल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे.
  • मुंबईमध्ये सर्वाधिक 525 रुग्ण असून 34 मृत्यू आहेत. त्या खालोखाल पुणे येथे 131 रुग्ण व 5 मृत्यू तसेच ठाणे विभागात 82 रुग्ण व 5 मृत्यू आहेत.
  • महाराष्ट्रातील एकंदर 11 कोटी 19 लाख 66 हजार 637 लोकसंख्येपैकी 868 कोरोनाचे रुग्ण आढळले असून प्रत्येक 10 हजार लोकसंख्येमागे 0.077 असे रुग्ण आहेत.
  • आढळलेल्या रुग्णांमध्ये 63 टक्के पुरुष आणि 37 टक्के महिला आहेत.  मृत्यू पावलेल्यांमध्ये 39.75 टक्के पुरुष आणि 13.25 टक्के महिला आहेत.
  • दहाव्या आठवड्यात भारतात 4125 रुग्ण आढळले. इतर देशांची दहाव्या आठवड्यातील तुलना केली तर अमेरिकेत 1 लाख 22 हजार 653, फान्समध्ये 37 हजार 145, जपानमध्ये 1 हजार 693 आणि चीनमध्ये 81 हजार 601 अशी आकडेवारी आहे.
  • सध्या राज्यात 3 लाख 2 हजार 795 एन-95 मास्क, 41 हजार 400 पीपीई, 10 हजार 317 आयसोलेशन बेड, 2 हजार 666 आयसीयू बेड आणि 1 हजार 317 व्हेंटिलेटर्स आहेत.

हे सुद्धा वाचा

Coronavirus : सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, वाचा संपूर्ण पत्र

Coronavirus : आमदार रोहित पवारांकडून अहमदनगर व राज्यासाठी 20 हजार लिटर सॅनिटायझरचा पुरवठा

Uddhav Thackeray :‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ताई म्हटले, अन् भाऊच बोलतोय असे वाटले’

कोरोनामुळे ७७ हजार मृत्यू

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी